मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

विचार


विचार
******

स्वतःत स्वतः असणे किती सोपे असते 
विचाराचे असणे जेव्हा अस्तित्वात नसते

पाहता कळू येते तुझ्या माझ्यात राहणारा 
विचार हा परजीवी आहे ऊर्जा खेचणारा 

अस्तित्वाचा सदोदित दरवाजा रोखणारा 
त्याच त्याच चक्रात पुन:पुन्हा फिरवणारा


मला सुख देणारा हा सुंदरसा विचार 
मला दुःख देणारा त्रासदायक विचार 

स्वप्नांतील प्रियेचा अन देवाचा विचार 
तोच तो एकच असे बहुरूपी आकार 

ओळखून पहावा जरी बहरू द्यावा 
माझ्यातील विचार कधी मी न व्हावा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

ॐ काराचा काटा

ॐ काराचा काटा
************

घोकली मी गीता दिव्य ज्ञानेश्वरी 
अभंग ही उरी खोचले गा ॥१
भजला विठ्ठल नमियला दत्त 
बुद्ध तथागत आदरला ॥२
किती पाठ केली संतांची कवणे 
भक्तांची भजने वारे माप ॥३
बांधली वासना जाळली कामना 
बांधियले मना वेळोवेळी ॥४
परी आता सारे सुटू जात आहे 
मन होत आहे पाठमोरे ॥५
नाम ध्यान पाठ झाले काठोकाठ 
भरुनिया माठ वाहतसे ॥ ६
गेला भक्तिभाव शून्यातील धाव 
नभातला गाव गंधर्वांचा ॥७
विक्रांत ठणाणा ध्वनिविना घंटा 
ॐ काराचा काटा घशामध्ये ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

पार

पार
****
नकारी नटले देवळाचे दार 
भरलेला पार गंजाडानी ||१
भरली चिलीम आदान प्रदान 
धुराने भरून झाड गेले ||२
चालली आरती देवापुढे पेढा 
खाऊनिया वेडा खुश होय ||३
सुखाचे मागणं दुःख आक्रंदन 
गेले हरवून कल्लोळात ||४
मिळे तो हसतो दुसरा रडतो 
नशिबाला देतो दोष उगा ||५
मरतो आतला मरे बाहेरला 
नदीच्या वाटेला गाव जातो ||६
दिसेना कोणाला कोणाची पुण्याई 
पाप भरपाई करी कोण ||७
विक्रांत करतो आत मी बाहेर 
जीव थाऱ्यावर नाही जरी ||८
इथला तिथला कधी म्हणवतो 
घालतो काढतो माळ गळा ||९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

खेळ

खेळ 
****
असा कसा खेळ खेळशी तू दत्ता 
मजला कळता नच कळे ॥१
कुणा संतासवे धाडसी सांगावा 
येई म्हणे गावा आपुलिया ॥२
कुणा शोधुनिया धरून हाताला 
घेवून घराला जात असे ॥३
कुणा जागेवरी देऊनिया बोध 
थांबवसी शोध बाहेरील ॥४
कुणा योगरुढ बसवी निश्चळे
कुणा भक्तीबळे नाचवसी ॥५
आणिक कुणाला धाडसी जगती 
डोळ्यावर पट्टी बांधूनिया ॥६
कळेना कुठे तो चालतो फिरतो .
काय नि करतो कशासाठी ॥७
धावरे दयाळा सोडव ही पट्टी 
पाहू देत सृष्टी तुझ्या रूपे ॥८
विक्रांत तिमिरी चाचपडतसे 
खोडकर हसे थांबवी रे ॥ ९
सरू दे खेळणे उगा लांबलेले 
जीवन आंबले अहंकारी ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

डॉ. प्रशांत मोरे

डॉ.प्रशांत मोरे
+++++++++

काही मित्र सदैव सोबत राहतात 
वृक्षाची फांदी वृक्षाला 
सोबत  करत राहावी तसे 
काही मित्र पालवीसारखे 
एखादे संवत्सर बिलगुन असतात 
तर काही मित्र आम्र वृक्षाच्या 
मोहरा सारखे असतात 
जीवनात येतात अन्
अगदी इवलासा काळ सोबत  राहतात
पण जीवन मोहरून टाकतात 
आपल्या अस्तित्वाने 
आपल्यावर सुगंधाचा सौख्याचा 
आनंदाचा वर्षाव करतात 

डॉक्टर प्रशांत मोरे 
हा असाच एक जीवनात भेटलेला 
मैत्रीने फुललेला मोहर आहे 
अगदी काही काळच जीवनात आलेला 
पण आपुलकीने स्नेहाने सरळपणाने 
आपलासा झालेला 

मोहराला हवा असतो दरवळ 
हवे असते उमलणे 
धुंदपणाने जगणे 
जीवन उधळत जाणे 
आपलं अस्तित्व सिद्ध करणे 
आपल्यासाठीच 
बाकी त्याला फांदीच्या चाकोरीचे 
पानांच्या फडफडीचे 
फारसे कौतुक नसते 
असेच काहीसे त्याचे व्यक्तिमत्व 
मला भासले अन् भावले.

तर असा हा जीवनात 
इवल्याशा काळात बहरून आलेला 
आणि निवृत्तीच्या निमित्ताने 
लगेचच  निरोप देणारा 
मित्र मला भेटला आहे
त्याला  खूप खूप शुभेच्छा 
परिपक्व सुमधुर 
निवृत्त जीवन जगण्यासाठी .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

उर्जा

ऊर्जा
******

शक्तिशाली 
मोटार सायकलच्या 
सीटवर बसलेले 
तुझे स्वप्न !

अंगावर आदळणाऱ्या 
वाऱ्याला हसून झेलत 
विस्कटलेले केस 
वाऱ्यावर उडवत 
तू असतेस कैफ उपभोगत 
तुला गतीचे भय नसते 
तुला घसरायची फिकीर नसते 
तू असतेस एकरूप झालेली 
त्या क्षणाशी 

तो एक क्षण खूप लांबवर 
कित्येक किलोमीटर ताणलेला 
झंझावतागत विखुरलेला 
तू असतेस फक्त ऊर्जा 
मूर्तीमंत
अन् मी असतो
ती अनुभवत तिच्यात हरवत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

उद्दाम


उद्दाम
******

सुटलेला रस्ता चुकलेली चाल 
तुटलेले झाड मोडलेली वेल 

विझलेला जाळ जमलेली राळ 
मोडलेली पेटी तुटलेला टाळ 

संपले कीर्तन उरले नर्तन 
उतरली नशा तरीही झिंगणं

आडोशाचे पाप प्रेमाचे लिंपण
जळती देहात आवेश बेभान

लाटावर लाटा उठती अनंत 
थंडगार खोल तळ शांत शांत

शिव्यांनी भरले जीवन हे कोडं
तरीही जिवास जगण्याचे वेड 

विक्रांत मातीने बहरले झाड 
आटला पाऊस उद्दाम हे खोड

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...