बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

पूजन

पूजन
******
करावे पूजन लाख रुपयांनी 
माझे न म्हणुनि सर्व फळ ॥१

घडावे पूजन रिकाम्या हातांनी
जीव हा वाहुनी देवापुढे ॥२

तर ते पूजन अन्यथा व्यापार 
घडे स्वाहाकार स्वार्थासाठी ॥३

खरे ते पूजन येतसे घडून 
कामने वाचून ऐहिक रे॥४

करावे पूजन घडण्या स्मरण 
देवास जाणून घेण्यासाठी ॥५

सगुण निर्गुण अवघे मिटून 
माझे मी पण जाण्यासाठी ॥६

विक्रांत शरण दत्ताचिया दारी 
वळून अंतरी मागे भक्ती ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

साहस

साहस
******
ओठावरी कुणाच्या ते  
शब्द होते अडलेले 
मनी होते युद्ध तरी 
पराभव ठरलेले ॥
नको नको म्हणे मन 
बंधनात अडकले 
उडायचे होते पण 
पंख कुणी कापलेले ॥
तेच भय पुरातन 
अणुरेणू  व्यापणारे 
तहानले प्राण परी 
पाणी नको म्हणणारे ॥
सुरक्षेची जीत झाली
साहसाचा जीव गेला 
जी जी म्हणे धनी कुणी
ठरलेल्या शृंगाराला ॥
मेले जरी मन तरी 
जगणे ते प्राप्त होते 
अन खुळे स्वप्न निळे 
तुटलेली वाट होते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

भक्ती प्रकार


भक्ती
****:
धनिकाची भक्ती देव रावुळात 
राहे मिरवत ऐश्वर्याने ॥१
रत्न हिरे मोती बहुत सजती 
पहारे बसंती शस्त्रधारी ॥२
परी ती ही असे देवा दारी भक्ती 
कृतज्ञता व्यक्ती रूपा आली ॥३

जया न ऐपत पैसा न खिशात 
तया सुमनात तीच श्रद्धा ॥४
भाव हाच देव अंतरी नांदतो 
बाकी साधने तो अर्थ नाही॥५
होवून याचक देवाच्या दारात 
तया ही भक्तीत न्यून नाही॥६

पोटासाठी पूजा पोटासाठी मंत्र 
कमावणे तंत्र व्यवहारी ॥७
करती पुजारी तयाही अंतरी 
नांदतो श्रीहरी त्याची कृपा ॥८
घडते पुजाही देवाच्या मर्जीने
कुण्याही हाताने उगा नाही॥९

देवालागी सारी सारखी लेकरे 
देवा जो हाकारे तया भेटे ॥१०
विक्रांत भक्तीत नसे छोटा-मोठा 
मुंगी ऐरावता एक लाभ ॥११
अनन्य शरण  होताच देवाला 
देव ये हाताला  सहजीच ॥१२

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

दिवा


दिवा
*****

जळतो दिवा तेल भरला 
चिंता उद्याची नच तयाला ॥१

उजेडाने सारे भरे आसमंत 
निर्धास्त निवांत जळे वात ॥२

सरते घंटा सरती पळ 
दिसू लागतो समई तळ ॥३

क्षीण प्रकाश येई झाकोळ 
सरे कर्तव्य जमे काजळ ॥४

तोही प्रकाश हाही प्रकाश 
दिप म्हणे उजळीत  आकाश॥५

आणि क्षणात वात वाढते 
घर प्रकाश वादळ होते ॥६

झरझर प्रभा पुन्हा निमते
तैल गंध अन  सोडून जाते॥७

अंधार होतो तवंग सरतो 
दीप अंधारी डोळे मिटतो ॥८

असेच जगणे असते बाई 
कळते कोणा कळत नाही ॥९

दिप दगडी जरी देवाचा 
विक्रांत वाहतो जन्म रोजच॥१०

काचा

काचा
*****

फुटक्या काचांनीही 
काही चित्र बनतात 
तर फुटक्या काळजांनी 
काही कविता होतात 

फुटली म्हणून काय झाले
तुटले म्हणून काय झाले
सुंदर तर ते तेव्हाही असते
वर वर पाहता दिसू न येते 

तसे तर नसते कधी जरुरी 
लिहिणे काही या घटनेवरी 
पण कुणी लिहितो म्हणजे 
नक्कीच मिळते काहीतरी 

ते सदैव जीवा सुखावते 
अन लडीवाळ स्मृतीत नेते 
म्हणून काचा जपणे असते 
टोचल्या तरी राखणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

जाणे

जाणे
****
आता घडेल रे तुझे जाणे 
पुन्हा पाहणे वा नच पाहणे 
सताड शून्यात उगा बसणे
त्या क्षणांना फक्त आठवणे 

का ही कथा अशीच असते 
लाट येताच पाणी भरते 
पाणी अखेर पाणी असते 
पुन्हा वाहून जाणार असते 

किती खोल हे क्षण टोचती 
हाय जीवाला जगू न देती
परी खंत ना मनी उमटती 
रे खरेच केली होती प्रिती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

तुझ्याशिवाय


तुझ्याशिवाय
**********
तुझ्याशिवाय 
कविता लिहिणे 
स्वप्न पाहणे होत नाही 

बळे बसवतो 
कुणास मनात 
भावभावनात उगा जरी 

परी तो आवेग
आस ना उत्कट 
जीवास चिरत जात नाही

तू दिलेस जे 
सुख सोनेरी 
घाव दुधारी  जगण्याला

ते जगणेही 
मागे पडले 
आणिक उरले शून्य पाही

रिक्त एकटे 
फक्त असणे 
शाप भोगणे जसा काही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...