शनिवार, ३१ जुलै, २०२१

झोका

झोका 
******
धुंदावल्या मनाचा या
झोका उंचावर जाई 
बांधलेली दोर फांदी
तया मुळी भान नाही .॥

झोक्यावर झोका चाले
गतिला त्या अंत नाही 
तना मना कैफ चढे
काळवेळ बंध नाही  ॥

माझ्यासवे झोका माझा 
माझेपण तया येई 
वर खाली जग होई 
हर्ष शोक येई जाई ॥

पाहतांना खेळ वेडा
झोका दिसेनासा होई 
दोर फांदी झाड झोका
जणू एकरूप होई.॥

आकाशाचे अंग होता
सुख अन दु:ख नाही
निथळतो चंद्र नवा 
उतरणे होत नाही ॥

म्हटले तो झोका होतो 
म्हटले तो रिता होतो 
मन पवनाचा गाठी 
अवधूत  खुणा  देतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

दत्त आत्मतत्व

 दत्त आत्मतत्त्व 
दत्त जन्म सत्व 
दत्त सदोदित 
साक्षी रूप ॥

जरी जाणतो मी
गुह्य  हे प्रकट
होऊ दे प्रचित 
मायबापा ॥

सरो धावा धाव 
जळो उठाठेव 
मायेचे लाघव 
मनीचे या ॥

विक्रांत अलक्षी 
मन हे लागेना 
संसार सुटेना 
जमविला ॥

म्हणोनी धरीतो
हात तुझा दत्ता 
अर्पूनिया चित्ता 
तवपदी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

गुरुवार, २९ जुलै, २०२१

सापड रे मला


सापड रे मला 
******:***:

सापड रे मला 
म्हणतो मी ज्याला 
काय तो दडला
असे कुठे ॥

जाणून जाणतो 
परी न दिसतो 
जीव व्याकूळतो 
तयाने हा ॥

म्हणे जो भेटला 
आम्हा सापडला 
पुसता तयाला 
शोध म्हणे ॥

धावतो कशाला 
शोध रे तयाला 
जो का शोधायला 
उताविळ ॥

बघ सापडता 
तुजला शोधता 
सारा आटापिटा 
संपेल रे ॥

त्याच त्या शब्दांना 
घेऊनी चित्ताला 
विक्रांत निघाला 
कुण्या पथा ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

बुधवार, २८ जुलै, २०२१

शुन्याला भेटाया

शून्य
*****

शून्याला भेटाया 
शून्य हे अधीर 
संमोहाचा तीर 
सोडुनिया ॥

आकाशा आधार 
खांब खांबावर 
बांधून अपार 
चढू पाहे ॥

मिटताच डोळे 
जग मावळले 
एक उगवले 
नवे आत ॥

धरिले देहाला 
मनाच्या भुताला 
प्रतिमे म्हटला 
तूच आत ॥

सुख दुःख वाटे 
खरे भोगतांना
रडू प्रेक्षकांना 
चित्रपटी॥

रोज तीच कथा 
रोज तीच व्यथा 
परंतु पडदा 
कोरा सदा ॥

विक्रांत नसला 
कुठेच कसला
रंगात सजला 
प्रकाशाच्या ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

मंगळवार, २७ जुलै, २०२१

वेदना



वेदना
*****

वेदनाच आहेत त्या 
मस्तकात कळ नेणाऱ्या
फाटलेल्या स्नायूंच्या 
आकुंचनाने होणाऱ्या 
तुटलेल्या स्वप्नांच्या 
काचा रुतून घडणार्‍या

वेदना दिसतात काही 
चेहऱ्यावर पसरतांना 
तर काही जाणवतात
आतल्या आत साहतांना 

शाप असतात वेदना 
काही उ:शाप असतात 
वास्तवात जीवनाच्या 
परत आणून सोडतात 

टाळून लाख वेदना 
टाळता येत नाही
सोसून बहूत वेदना
शहाणपणा येत नाही

जन्म मरण दुःख 
विरह विघटन 
अपघात आजारपण  
या सार्‍यांची 
प्रचंड फौज घेऊन 
येतेच जीवन भेटायला 
अगदी प्रत्येकाला 

आणि एक संधी देते 
वेदनांचे गाणे करायला 
कदाचित 
हेच एक प्रयोजन असावे 
वेदनांचे


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

व्यापार

 
व्यापार
******

उद्याचा व्यापार 
दिला मी सोडून 
टाकले मोडून 
दुकानाला ॥

चोरी गेले सारे 
ज्याचे त्यांनी नेले 
मुद्दल दिधले 
बुडीताला ॥

आता सारी चिंता 
वाहू दे दत्ताला 
जामीन ठेवला 
तयालाच ॥

घालील तो खेटे 
उगा परोपरी 
दृष्टी माझ्यावरी 
ठेवील गा ॥

विक्रांत तोट्यात 
जरी का जगात 
लाभला भाग्यात 
व्यवहार ॥

ऐसा हा उद्यम 
मांडे फायद्याचा 
कृपाळू भिक्षेचा 
याचक मी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  d.

सोमवार, २६ जुलै, २०२१

दत्त प्रेमाची गोष्ट

 
दत्त प्रेमाची गोष्ट 
*************

तुझिया प्रीतीची 
ऐकून कवणे 
भक्तांची वचने 
प्रियकर ॥

प्रेमाने डोळ्यात
आसवे भरती 
उरी उमटती 
प्रेम उर्मी ॥

भावना देऊळ 
अंतरी कोवळ 
अंगी वज्रबळ
संचारते ॥

जीवास आधार 
श्रद्धेला जोजार 
प्रेमास अपार 
पूर येतो ॥

ऐसे तुझे दूत
हक्काचे हकारी 
असे माझ्यावरी 
ऋण त्यांचे ॥

तयांच्या कथेचे 
करतो श्रवण 
ओथंबते मन 
भाव भरी ॥

विक्रांत प्रेमाची 
गोष्ट एक होवो 
दत्तराय देवो
क्षेम प्रेम ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...