बुधवार, ३१ मार्च, २०२१

टाहो

टाहो
*****
व्यर्थ माझा टाहो 
जाऊ नये देवा 
सांभाळ या जीवा 
तहानल्या  ॥१

पिल्लू हे अजान 
असे कोटरात 
घास दे मुखात 
उघडल्या ॥२

प्रभू वाहतो हे 
क्षण प्राक्तनाचे 
करुनी आशेचे 
द्वार डोळे ॥३

फुटताच पंख 
आकाश होऊन 
जाईन निघून 
कृपे तुझ्या ॥४

अन्यथा मातीत 
कृमी कीटकात 
जीवनाचा अंत 
ठरलेला ॥५

तुझी आस मज 
लागली दयाळा 
श्री दत्तकृपाळा
त्वरा करी ॥६

विक्रांत व्याकुळ
विनवितो तुज
भेटी देई मज  
एकवार ॥७


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ३० मार्च, २०२१

दशरथ शिंदे

दशरथ शिंदे
********

अंतर्बाह्य जसा आहे 
तसा माणूस जर 
तुम्हाला पाहायचा असेल 
तर तुम्ही दशरथ शिंदेला पहावे.

दशरथ शिंदे यांचे वैशिष्ट्य 
म्हणजे जे काही करायचे 
ते पूर्णपणे करायचे 
मनापासून करायचे 
शंभर टक्के करायचे 

हा माणूस 
जीवाला जीव देण्याइतके 
प्रेम करणार 
गाढ निरपेक्ष मैत्री ठेवणार 
आणि सदैव मदतीला धावणार 
तसेच राग आल्यावर 
तो मुळी सुद्धा न लपवता 
स्पष्टपणे बोलून दाखवणार 

अर्थात असे प्रसंग विरळाच !

या सरळ मनाच्या माणसाचे
प्रेम राग आदर मैत्री दुश्मनी
सारेकाही सरळ आहे 
तिथे लपवाछपवी नाही 
राजकारण नाही 

अशी माणसे 
डावा हात दुखला तरी 
उजव्या हाताने काम करतात 
पण दोन्ही हात आखडून 
कधीच बसत नाही 

खरतर दशरथचा या विभागात 
दशरथदादा म्हणून दबदबा आहे 
आणि मोठ्या भावाच्या 
या प्रतिमेचा त्यांनी रुग्णालयाला
सदैव उपयोगच करून दिला 
कित्येक लहान-मोठ्या आपदा
ड्युटी मध्ये येण्यापूर्वीच 
दूर केल्या आहेत 
त्यामुळे कॅज्युल्टीत काम करताना 
त्याचा मोठा आधार 
प्रत्येक सिअेमोला वाटायचा 

दशरथ आता निवृत्त होत आहे 
त्याचे मोकळेपणी बोलणारे 
सुवर्ण रंगात झगमगणारे
आणि वय होणे थांबलेले
व्यक्तिमत्व 
आपण सदैव स्मरण करत राहू .
त्यांना निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

नाभिकार

नाभिकार
*****

नाभिकार तुझा 
कानी माझ्या पडो 
तुझ्या आड दडो
माया तुझी ॥

भर उजेडात 
मिटलेले डोळे 
तुज विसरले 
उघडी बा ॥

काम क्रोध लोभ 
लहरींचा खेळ 
थांबूनी केवळ 
स्तब्ध व्हावा ॥

मग तूच आत 
बस रे निवांत 
तुजला पाहत 
राहो मी ही ॥

देणे घेणे सारे 
तुटावे जगाचे 
जीणे नर्मदेचे 
जल व्हावे ॥

येई खडखडा 
धरी माझ्या हाता 
सर्व तुझे दत्ता
घेऊनि जा ॥

सुख बुडबुडे 
पाहिले जगाचे 
विक्रांता तयाचे 
कौतुक ना ॥

तुझ्या स्वरूपी 
मन हरवावे
काहीही नुरावे 
तुजविण ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, २८ मार्च, २०२१

त्रिगुणातित

त्रिगुणातित
********

अकारात दत्त 
उकारात दत्त 
मकारात दत्त 
भरलेला ॥१॥

उत्पत्तीत दत्त 
पालनात दत्त 
विनाशात दत्त 
सर्वव्यापी ॥२॥

असण्यात दत्त 
नसण्यात दत्त 
त्या परे ही दत्त 
अस्तित्वात ॥३॥

प्रकाशात दत्त 
अंधारात दत्त 
संधीकाली दत्त 
सजलेला ॥४॥

भूतकाळी दत्त 
भविष्यात दत्त 
वर्तमानी दत्त 
कालव्याप्त ॥५॥

वैखिरीत दत्त 
पश्चंतित दत्त 
परेत ही दत्त 
मातृकात॥६॥

सत्वात या दत्त 
रजात या दत्त 
तमात या दत्त 
गुणातीत ॥७॥

दिनमानी दत्त 
अस्तमानी दत्त 
मध्यरात्री दत्त 
कालातित ॥८॥

सगुणात दत्त 
निर्गुणात दत्त 
शून्यातही दत्त 
साक्षीत्वात ॥९॥

सुक्ष्म देही दत्त 
स्थूल देही दत्त 
कारणात दत्त 
विक्रांतच्या ॥१०॥

शब्दात ही दत्त 
सुरात ही दत्त 
मौनात ही दत्त 
माधुर्यात ॥११॥

उणा कुठे नाही
तरी कुठे नाही 
गिळे आहे नाही 
सामर्थ्यात ॥१२॥

*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, २७ मार्च, २०२१

आनंद

आनंद
******
आता या जखमा मला 
त्रास मुळी देत नाही 
असूनही काटे आत 
कधीच रुतत नाही ॥

असेल तोवर तया 
असू देत तिथे अगा 
चालतो मी अनवाणी 
दोष कुणा देऊ उगा ॥

हवेपणात दुःखाचा 
जन्म जणू होत होता
दु:ख अहंकाराचाच
सुप्त भाग होत होता

आवडणे नावडणे 
मनाच्याच साऱ्या स्मृती 
शोधताच मुळाअंती 
अरे दिसली आसक्ती 

कुरवाळून जखमा 
कुणास काय मिळते 
तृप्तीचा वणव्यात 
भर आणिक पडते 

हवे-नको पण सारे 
दिले  दत्ता सोपवून 
आनंद रे मीच माझा 
धालो अंतरी पाहून 
***


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

भुकेले तान्हुले

भुकेले तान्हुले
***********

भुकेले तान्हुले 
कळते माईला 
उडून स्तन्याला 
देई त्वरे ॥ १॥

गोठ्यात वासरू 
हंबरे क्षुधेने
गावुली वेगाने 
धाव घेई ॥२॥

कोटरात पिले 
आकांत बहुत 
उडे अविश्रांत 
पक्षीनी ती ॥३॥

कळेना मजला 
कुठे दत्त माय 
रिता सर्व ठाय
तियेविन ॥४॥

विक्रांत भुकेला 
बहु दर्शनाला 
येऊन तयाला 
शांत करी॥५॥

****-
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********s


बुधवार, २४ मार्च, २०२१

जळणारी वात

जळणारी वात
*********

लक्ष योनी फिरत 
जाईन मी भ्रमत 
सदोदित  दत्त 
आठवीत ॥१॥

काळाचे ना भान
आकाशाचे मान 
मिटलेला प्राण 
घेवुनिया ॥२॥

याच या क्षणात
जळणारी वात 
होवून सतत
प्रकाशाची ॥३॥

विक्रांता उजेडी 
जळण्याची आस 
कळण्याचा सोस 
उपजून  ॥४॥

देई बापा दृष्टि
ह्रदयात भक्ती 
शब्द नेति नेति 
हरवून॥५॥
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...