बुधवार, २९ जुलै, २०२०

दक्षिण द्वार

दक्षिण द्वार
**********
द्वार दक्षिणेचे झाले 
भर दिवाळीच्या आधी 
माय कृष्णाई वाहत 
होती भरून दुथडी ॥

स्पर्श चैतन्य जलाचा 
मना होता सुखवित
ओ ढ भेटीची स्पर्शाची 
दत्त होता पुरवीत ॥

किती मारल्या डुबक्या 
भूक सरत नव्हती 
होई जल बा तू आता 
केली देहाला विनंती ॥

मुले खोड्याळ भवती 
उड्या पाण्यात मारती 
तया स्वरात शब्दात 
मज ऐकू ये आरती ॥

दोऱ्या  नव्हत्या बांधल्या 
मंत्र कोंडले ओठात 
दत्त दाटे सभोवती 
होत होती थेट भेट ॥

होय विक्रांत पर्वणी 
देवी प्रेमे घडवली 
इच्छा कितीक वर्षांची  
माझी सफल ती झाली ॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २७ जुलै, २०२०

महावृक्षा

महावृक्षा
******
जर या देहास 
नच तव भेटी 
घाल काळपोटी
दत्तात्रेया ॥
जर या डोळ्यात 
नच तुझी मूर्ती 
घालव रे दृष्टी 
अवधूता ॥
जर या वाचेत 
न ये तुझे नाम 
काय तिचे काम 
देवराया ॥
जर या हातांनी 
न घडे ती सेवा 
कशास रे देवा 
सांभाळशी ॥
विक्रांत निरर्थ 
उडतो पाचोळा 
घेई तया तळा 
महा वृक्षा ॥
****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने 
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २६ जुलै, २०२०

दरी.

दरी
****

किती विचित्र आहे हे जग
जिवंत असताना ज्याच्या
लाख तक्रारी करते
अन् मेल्यावर तो
त्याचेच चक्क भांडवल करते

असे कुणाच्या तरी दुदैवी मरणाला
रंग लावून राजकारणाचे
आपले उखळ पांढरे करू पाहते

हा सोस कसला आहे
स्वताला मोठे म्हणवण्याच्या
अन स्वत:तील क्षुल्लकतेवर
दुसर्‍याच्या अपमानाचे
हलके पांघरूण घालायचा

अन् कधी कधी ते
उपऱयांच्या हातात
काठी  देवून
खुणावतात हळूच
घाला टाळक्यात म्हणुन
अन त्या आपल्याच
लोकांच्या मनातून
जातात पार उतरून

हक्कांसाठी लढतोय मी
असे गोंडस नाव देऊन
फाटलेल्या मी पणाला
अधिक भोके पाडून
मिरवतात ते हतबुद्धीचे
हतकर्माला पराक्रम म्हणून

पण त्याहून आश्चर्य वाटते
ते हात बांधून बसलेल्या
द्युतात हरवल्यागत
दीड:मुख झालेल्या
आपल्याच लोकांचे

आता त्यांना आपले
कुठवर म्हणावे
हा प्रश्न नको असून
उभा राहतो समोर येऊन
अन् पडलेल्या दरीला पाहून
सैतान हसतो खदखदून 
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 

गुरुवार, २३ जुलै, २०२०

अर्ध्या ताटातून



आणि अचानक
जाती हरवून
मित्र प्रियजन
विषाणूने ॥

कुणी काल झाले
इथे रिटायर
गावातले घर
डोक्यामध्ये ॥

कुणी जीवनाच्या
उभा मध्यावर
भार खांद्यावर
संसाराचा ॥

कुणी नुकताच
जाणतो जीवन
कळल्यावाचून
फिरे मागे ॥

तसे तो मरण
ठेवले वाढून
प्रत्येक जण
जाणतसे ॥

अर्ध्या ताटातून
परी हे उठणे
किती जीव घेणे
दत्तात्रया ॥

नको रे नेवूस
कोणा प्रभू आता
जीवनाची वाटा
चालतांना ॥

विक्रांत प्रार्थना
करीतो कृपाळा
येवून सांभाळा
लेकरांना॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २१ जुलै, २०२०

लबाडी

लबाडी 
*****

जग म्हणते हे 
तुझाच मजला 
मी तो लाविला
तुझा टिळा ॥

जग हे म्हणते 
रे भला थोरला 
मी देव चोरला 
शब्द बळे ॥

करूनी तुजला 
बघ बदनाम   
करवून काम 
घेई माझे ॥

आता तू जर का 
मजला टाकले 
तुलाच लागले 
बोल होय ॥

 प्रभू अवधुता 
मी तव शरण 
जीवन-मरण 
तुझ्या हाती ॥

जरी लबाडी 
करीतो थोडी 
हसुनी वेडी 
स्वीकार रे॥ 

लबाड विक्रांता
हसतो ताडतो 
ह्रदयी धरीतो 
दत्त राज ॥
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २० जुलै, २०२०

संवेदना

संवेदना
****
जाहली  बोथट 
माझी संवेदना 
काय हे चालले 
मजला कळेना ॥

मरतात जन 
धडाड येऊन 
श्वास अडकून 
कळल्यावाचून ॥

रोजचे मरण 
रोज आक्रंदन 
रोजचे पी पी ई
प्लास्टिक कफन ॥

 रडतात मुले  
बायका रडती 
धास्तीत पडले
शेजारी पळती ॥ 

येतात सयंत्रे 
मागणी वाचून 
जागा न ठेवण्या 
राहती पडून ॥

नवीन सामग्री 
अर्जंट कंट्राट
परी मरणाचा 
घडे ना रे अंत ॥

जयाची पॉलिसी 
तया मिळे बेड 
रिपोर्ट साऱ्यांचा 
दिसतो कोविड ॥

कुठे चाललेय 
कोणाचे शोषण 
कोण कुठे घेई 
हात  ते धुऊन ॥

तरीही त्या रांगा 
लागती मटना
हुल्लड होतेच 
रोजच्या दुकाना ॥

चालतो व्यापार 
चोरून छुपून
पोट हातावरी 
जाती ते निघून ॥

मरणाच्या वारा 
सुसाट सुटला 
गाठेन आम्हाला 
आज ना उद्याला ॥

कोण रे मरेन 
कोण तो जगेन 
टक्क्यांची गणित 
कुणा न सुटेन ॥

विक्रांत विनवी 
दत्ता अवधूता 
आवरा  सावरा 
आता या जगता.॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १९ जुलै, २०२०

भित्री श्रद्धा

 श्रद्धा
***********

बाजार भितीचा
हिशोब दानाचा 
काल त्या सर्पाचा
त्रिंबकीच्या॥

जुनाट शब्दांचे 
विना कि श्रमांचे
प्रकार तयांचे
कमावयाचे  ॥

होती जाहिरती
दलाल असती
मुळ परि भिती
अनिष्टाची॥

तयारी यज्ञाची
मांडणी पुजेची  
त्याच सामानाची 
सदोदित ॥

झुकती दुनिया
देवा तुझी माया
मज न ये आया
मजेशीर ॥

दत्त काढी मन 
माझे सा-यातून 
अवघे दावून
निरर्थक  ॥

 
 *****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...