शनिवार, ३१ मार्च, २०१८

तीच वाट


तीच वाट
******

तीच वाट 
तीच पहाट 
तीच आहट 
गोठलेली 

मी माझ्यात 
मी जगण्यात 
मी असण्यात 
मांडलेली

माझे असणे 
माझे नसणे 
माझे कळणे 
तुझ्यामुळे 

थोडा ताप 
थोडा शाप 
थोडा उ:शाप
काही इथे 

तोच गोंधळ 
तीच खळबळ 
तेच पोकळ 
शून्य भरे 

कळल्या विन मी
वळल्या विन मी 
जळल्या विन मी 
चितेवरीं


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

दत्त एक स्वप्न




दत्त एक स्वप्न

दत्त एक स्वप्न
निद्रेला गिळून
अस्तित्वा भरून
उरलेले ||

दत्त एक सत्य
विश्वाला गाळून
काळाला सारून
थांबलेले ||

दत्त एक जगणे
श्वासात भरून
हृदयात येवून
वसलेले ||

दत्त एक प्रार्थना
अवघे सुटून
एकटे उरून
उमटलेली ||

दत्त एक साधन
श्रद्धेत रुजून
शरण होवून
अंगिकारले ||

कृपे वाचूनिया
दत्तास कळणे
कदापि घडणे
नाही नाही ||

म्हणून विक्रांत
मीपण सोडून
उगाच पडून
दत्तपदी ||

डों.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २८ मार्च, २०१८

उधारी


उधारी

गर्द गूढ निळ्या रात्री
घेऊनिया डोह गात्री
माथ्यावरी चंद्र दावी
खुळी स्वप्ने जरतारी

फाटलेले ओठ अन
गाणे उलतेच उरी
तो सुखाचा सोस जून
स्वप्न मानतोच खरी

वेडी फुंकर कुणाची
वेदनांना डिवचते
जाळ रक्तातील तप्त
श्वास शून्य पेटवते

तम देही कोंडलेला
पेशीपेशी हतबल
तीच व्यर्थ कवाईत
तोच चालतोय खेळ

दिवसांची ही उधारी
आता पेलवत नाही
नि सुखाचे उखाणेही
या मना सुटत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २४ मार्च, २०१८

धरिला ध्यास





धरिला ध्यास  

दाटले आभाळ
अभ्राचा प्रवास
परी ते आकाश
गतीविना ||१||

ऐसे माझे मन
करी दयाघन
धाव स्थिरावून
पवनाची ||२||

अंतरी अथांग
हृदय आकाश
पवनाचा ऱ्हास
होवो तिथे ||३||

धरिला हा ध्यास  
पुरा करी देवा
विक्रांतास ठेवा
हाची द्यावा ||४||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २० मार्च, २०१८

स्वामी देव माझा


स्वामी देव माझा 

देव माझा देव माझा 
देव माझा रे 
स्वामी देव माझा रे
समर्थ देव माझा रे 

अक्कलकोटी 
अक्कलकोटी 
राहत आहे रे 
मजला पाहत आहे रे 
सांभाळत आहे रे 

जनी वनी घरी दारी 
घेऊन या कडेवरी 
मजला नेत आहे रे 
सदैव सोबत आहे रे 

रागावून बळे कधी 
जोजारून बळे कधी 
सांगत भक्ती आहे रे
भरवत घास आहे रे

हिंडे फिंडे उंडारे मी 
अडे कुठे भटके मी 
ठेवीत ध्यान आहे रे 
आणत मार्गी आहे रे 

पडतो मी घडतो मी
पुन्हा पुन्हा रडतो मी  
हरतो मी चिडतो मी 
सदा सावरत आहे रे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १७ मार्च, २०१८

दुरावल्या मितास



दुरावल्या मितास
*************

नशिबाने कधीकधी
मित असे मिळतात
न मागता जीवनात
स्वर्ग जे फुलवतात ।

कळत नकळत जे
जिवलगही होतात
तरी का न कश्याने
दूरावलेही जातात ।

काही गैरसमज वा
संशय काही येतात
मैत्रीलाच मैत्रीचे ते
ओझे मानून जातात  ।

त्यांचे जीवनात येणे
जीवन उमलून जाणे
परी कथेहून जणू
असते लोभसवाणे ।

त्याचे निरपेक्ष देणे
जणू वरदान होते
त्याचे सोडून जाणे
प्राप्त प्रारब्ध ठरते ।

मिळता मित म्हणून
सोबत असे तोवर
हा माझा वेडा जीव मी
ओवळतो त्याच्यावर ।

अन गेला दूर जरी
मनी दुवा उमटतो
सदा रहा सुखी यार
आयुष्य तया मागतो ।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)



भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)


काखेमध्ये झोळी
हातात या काठी
नर्मदेच्या तटी
चालतो मी ॥

एकेक पाउली
नर्मदा गजरी
पातकांची सारी
पळे सेना ॥

माईच्या कुशीत
सुखाची पहाट
घरे काठोकाठ
समाधान ॥

अहो भाग्य जणू
जहाले प्रसन्न
घडले दर्शन
मैयेचे हे ॥

इथल्या किनारी
थांबावे वाहणे
घडावे चालणे
विक्रांतचे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...