शुक्रवार, २ मार्च, २०१८

होळी



॥ होळी ॥


देही प्रकटला
अग्नी जालंधर
होळीचा आकार
थोर झाला ॥


तापलेले शिर
हातात अंगार
होय स्वाहाकार
जाणीवेचा ॥


भरले चैतन्य
सरे देहभान
प्रेमाने पावन
होऊनिया ॥


सरली आकांक्षा
वेडी उलघाल
तृप्तीची मंगल
उषा झाली ॥


ऐसे चोजवले
प्रेमाच्या गाभारी
आभार आभारी
उणे पडे ॥


निरापेक्ष केले
विक्रांत पाहणे
म्हणून जगणे
कळो आले ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

आहे किंवा नाही


आहे किंवा नाही..॥

मीच आहे किंवा नाही
माझे मला उमजेना
मीच ऐकतो पाहतो
परी खरे हे वाटेना

गीत सजले ओठात
सूर भिनले देहात
मीच होऊनि कविता
त्याच रंगलो क्षणात  

उरी दाटल्या उर्मीची
डोळी भिनल्या नशेची
मुग्ध मदिरा मी झालो
जुन मधाळ गंधाची

येई फिरून जीवना
किती अजून मी उणा
तृप्ती अतृप्ती  कळेना
घेता घेता मी उगाणा

शब्द वाहतो मी तुला
माझ्या हृदयी आलेला
वृक्ष सजीव हा झाला
स्तब्ध शिशिरी गोठला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

पश्चिमेचे क्षितिज.


***************
माझे हे क्षितीज
असे पश्चिमेचे
सखये क्षणाचे
रंग धुंद ॥

उधळतो परी
रंग तुजवरी
प्रकाशाच्या सरी
होऊनिया ॥

तुझी गौरकाया
सोनियांची होता
चुंबतो मी माथा
वारा होत ॥

अशी ये किनारी
सावरीत केस
उधाणत हास्य
लाटांवर ॥

कण किरणात
तुज सांभाळून
घेईन झेलून
पापण्यात ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

पाहता पाहणे

पाहता पाहणे

स्वरूपाचे कोडे
ध्यास लावी जिवा
परि मन कावा
आड येई ॥

याचक्षणी इथे
कळे आहे मुक्ती
पाहण्याची युक्ती
सापडेना ॥

चाले झटापट
मनाची मनात
धुळीचा लोटात
अंध दिशा ॥

चतुर चित्ताचे
चालले गुर्‍हाळ
द्वैताचे पाल्हाळ
संपेचिना ॥

पाहा रे विक्रांत
वळूनी मनात
सांगतो श्री दत्त
पुन्हा पुन्हा ॥

पाहता पाहणे
केवळ उरू दे
पुढचे ते पुढे
मग पाहू.॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मुक्ती

मुक्ति


डोईवर हात
ठेवूनिया मुक्त
कुणी काय होत
ध्यानी घे रे ॥


तुझे तुझे आहे
चावण्याचे अन्न
करणे पोषण
देहाचे या ॥


चालायचे दूर
आधी पायावर
उभा राही बरं
धडपणे ॥


नाथांचिया खुणा
घ्याव्यात जाणून
द्यावे ओवाळून
सारे काही ॥


विक्रांता कळले
शहर टाकले
क्षितीज दिसले
मनोहर ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

भेटीचा सोहळा



भेटीचा सोहळा

भेटीचा सोहळा
जाहला आगळा
चंद्र वितळला
डोळीयात ॥

बाहुत भिजला
शरद कोवळा
दवात न्हाईला
सोन सुर्य ॥

जिवाचा जिव्हाळा
पाहिले तुजला
मेघ हा इवला
कोसळला ॥

जणू जीवनाचे
दान ओघळले
पापण्यात आले
दाटूनिया ॥

याच मी क्षणाचा
राहावा सदाचा
तुझिया श्वासाचा
गंध होत ॥

भान जागृतीचे
न यावे जगण्याला
जन्म हरवला
जावा इथे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

मन


मन

मनाचे बंधन
मनाचीच मुक्ती
जगण्याची सक्ती
मनामुळे॥

मनाचीच मूर्ती
मनाचाच देव
उभा तो सावेव
गाभाऱ्यात ॥

मनाचीच माती
मनाचा आकार
घडला साकार
चतुर्भुज ॥

मनाचे बिंदूले
मीपणे सजले
जगत हे झाले
अंतर्बाह्य ॥

मनाच्या संकल्पी
शुन्यात प्रवेश
सुटुनिया वेस
गावाची या॥

मनाचा आधार
घेवून विक्रांत
मनाचे स्वगत
ऐकतसे ॥

ऐकता ऐकता
मीपण जाणले
जाणणे उरले
शब्दातित ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...