शनिवार, १६ एप्रिल, २०१६

चार कण अमृताचे




चार कण अमृताचे
प्रभू तुझ्या पाऊलांचे
श्रेय मज जगण्याचे
देई फक्त प्रेम तुझे

कर्मफळी गोवू नको
मानपानी घालू नको
पुरवण्या जोडूनिया
ग्रंथ हा वाढवू नको

अंतरात मोह जरी
आर्तीची धनीच नाही
उतरण जन्मोजन्मी
आधार कुणीच नाही

जरा कळू आलास तू
दिसे पावूलांची खुण
हरवून पुन्हा आता
करू नको भाग्यहीन

जन्मांतरी हृदयात
पेटलेली सूक्ष्म ज्योत
सदा राहो तेवणारी
जन्म मृत्यू प्रारब्धात

जगण्याच्या बाजारात
जरी धावतो विक्रांत
दत्त चिंतनात चित्त
मग्न राहो दिनरात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

श्रीरामचंद्र आणि मी


श्रीरामचंद्र आणि मी
**************
इयत्ता  ४ थीत असतांना
श्रीरामचंद्र मला भेटले
लायब्ररीतील मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकात .
सात आठ भागातील ते पुस्तक
त्याने माझे आयुष्य उजळून गेले
प्रभू श्रीरामचंद्र माझ्या हृदयात खोलवर जावून बसले
आता  ४० वर्ष उलटून गेली तरीही
ते तिथून मुळीच हललेले नाहीत  
भक्ती कळायचे वय नव्हते ते
पण देव याहून वेगळा असूच शकत नाही
हे तेव्हा कळलेले तथ्य
जीवनातील प्रत्येक वळणावर
अधिकाधिक स्पष्ट आणि दृढ होत गेले
तसे देवाकडे काही मागायचे नसते
हे कळून ही देवाकडे सतत
काही न काही मागत राहिलो मी
दत्ताकडे वैराग्य मागितले
हनुमंताकडे भक्ती
कृष्णाकडे प्रेम मागितले
शिवाकडे ज्ञान
गणेशाकडे बुद्धी
पण रामाकडे काय मागितले 
हे आठवू लागताच 
लक्षात आले  
रामाकडे काही मागावे लागलेच नाही
रामचरीत्रातील प्रत्येक कथा
जीवन शिकवत होती
काहीतरी देत होती मला
श्रीरामाने मातृपितृ भक्ती शिकवली
बंधू प्रेम दाखविले
मित्रप्रेम हृदयी ठसवले
पत्नी प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावयाची
निरतिशय प्रेमाची सीमा दाखवली
दृढता अन सत्यनिष्ठा दिली
औदार्य दिले करुणा दिली
कर्तव्य कठोरता सांगितली
निर्मोहता बिंबवली
ज्ञान शौर्य नम्रता धाडस
प्रसंगावधान समयसूचकता
अश्या अनंत गुणराशीचा सागर समोर ठेवला
या दोन हाताच्या ओंजळीत नाही भरता आले सारे
मनाची क्षमता संस्कारांच्या मर्यादा या फटीतून
खूप काही ओघळून गेलेही  
पण तरीही कळत न कळत या गुणांचे
काही कण हाती आले
त्यांनी जीवन भरून पावले  
प्रभू जर मला भेटले नसते
तर कदाचित मी राहत असतो आज
अश्याच एका लंकेत
स्वार्थाच्या लोभाच्या पापाच्या
अहंकार आणि व्यभिचाराच्या
मी अनंत ऋणी आहे
त्या भेटीचा त्या पुस्तकांचा
अन प्रभू श्रीरामचंद्रांच्या करुणेचा !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

|| बाबासाहेब आंबेडकर ||



माझ्या रक्तातील शुद्रत्व नाकारणारा
दशादिशात पसरून दुमदुमणारा
टणत्कार आहेत आंबेडकर
प्रत्येक देशातील सीमा
आणि प्रत्येक गावातील वेस ओलांडून
माणूसपण नाकारणाऱ्या
तथाकथित माणसांच्या दांभिकतेला
ठाम नकार आहेत आंबेडकर
या देशातीलच नव्हे तर जगातील
प्रत्येक माणसा माणसांत
समानता सौख्य सौदार्ह नांदावे
हे विशाल स्वप्न आहेत आंबेडकर
निरुपायाच्या कर्दमातून
अगतिकतेच्या भयातून
लाचारीच्या प्रारब्धातून
स्वतः:ला विसरून गेलेल्या बांधवांना
स्वबळाने बाहेर खेचून काढणारे
पराक्रमी हात आहेत आंबेडकर
विषमतेच्या ,अन्यायाच्या अंधश्रद्धेच्या
मगरमिठीतून आम्हाला बाहेर काढणारे
ज्ञानदूत आहेत आंबेडकर
आमच्या पायाखालील जमीन आहेत आंबेडकर
आमच्या डोक्यावरील आकाश आहेत आंबेडकर
आमच्या खिश्यातील पगार आहेत आंबेडकर
आमच्या घरतील सौख्य आहेत आंबेडकर
आमच्या मनातील आत्मसन्मान आहेत आंबेडकर
हे महापुरुषा
तुमच्यामुळे मी, मी आज आहे खरोखर !!

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





सोमवार, ११ एप्रिल, २०१६

शब्द काही लिहितो आहे




मनातून फुटतो आहे
शब्द काही लिहितो आहे
सारे जग माझ्यात अन
मी मलाच पाहतो आहे

कधी छान कधी नकोसे
सारे काही खरडतो आहे
उगा धुमसून पिसाटतो
तरीही शांत होतो आहे

माझे वृथा मिथ्य जिणे
फेकुनी मी देतो आहे
आणि एक नवा चेहरा
गीतात या पाहतो आहे

कधी भाळलो होतो फुलांना
काट्यात आज नाचतो आहे
प्राशतो मधुर विष वर
आणखीन मागतो आहे

जगुनिया मेले सुखानी
फोटो त्यांचे पाहतो आहे
जागा नाही जरी बाजूला
नवा खिळा ठोकतो आहे

पुण्य पर्वत मोठमोठे  
दत्तप्रभूस दावतो आहे
उंच पोखरल्या वारुळी   
अन सुखाने राहतो आहे  

आठवल्या वाचून कधीचे
व्रण जुने दाखवितो आहे
सोसल्याच्या प्रदर्शनात
विक्रांत मिरवतो आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






सोमवार, ४ एप्रिल, २०१६

अनोळखी कविता






गाडी चालवत असतांना सुचलेल्या कविता
वाऱ्याबरोबर उडून जातात
जरी ती क्षण चित्रे नंतर पुसटशी आठवतात
काही शब्द मनात  उगाच तरळून जातात
काही स्वर विरल्या शब्दावर ठेका धरतात
पण ती आता आपली नसतात
बऱ्याच वेळा हायवे वरून जातांना
अश्या माझ्या असंख्य कविता
मला पाहत असतात
अन मी हि त्यांना असतो न्याहाळत
एक दुबळा यत्न करीत
त्यांना त्याच शब्दात पुन्हा मांडण्याचा
जुन्या आठवणीतील फ्रेममध्ये  ठेवण्याचा
पण त्या रहातात तश्याच तटस्थ दूरस्थ
ओळख पुसलेल्या अनोळखी
दुरावलेल्या  प्रेयसीगत
एक खंत जागी ठेवत मनाच्या खळग्यात

विक्रांत प्रभाकर तिकोणे
कवितेसाठी कविता



|| दीप ||



|| दीप ||

असा अंधार कोवळा
गात गात्रात पाझरे
दीप एकच बेडर
भल्या पात्रात लहरे

नच लागावी नजर
माय लपेटे पदर
बाळ डोकावते हळू
येई पुनव बहर

जाई दूरवर कुणी
भेट आता ती कसली
नाही निरोपात व्यथा
वाट पाऊली सजली

क्षण कातर उमले   
वाळू चांदव्यात ओली
किती युगांचा पिंपळ
नवी सळसळ बोली

जन्म देहाचे हे ओझे  
कधी कुणास कळले
धून अवधूत चाले 
ज्याचे त्यानीच पाहीले

विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, ३१ मार्च, २०१६

दत्ताच्या गावात





जगाचा बुडाडा
कळला कळला
फुटला मिटला
आपोआप  

मनाचिया वाटा
तुटल्या विझल्या
डोहात बुडाल्या
एकांतीच्या

अंधारात दीप
लवतो तेवतो
एकटा भिडतो
वादळाला  

मनस्वी जगणे
जनात वनात
नाही कश्यात
घालमेल

कळली जीवास
ठरली चाकोरी
मरण चाकोरी
काळ ओघी

दत्त नाचवितो
उगा इथे तिथे
सत्य गवसते
कणोकणी

विक्रांत जगात
राहतो मनात
दताच्या गावात
कौतुकाने  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे








वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...