सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

मृत्यू !

मृत्यू !
तसा म्हटला तर
पूर्णविराम असतो
साऱ्या कर्तृत्वाचा 
ऐश्वर्याचा माझेपणाचा
दारिद्रयाचा शोकाचा
आणि यातनेचा
खरतर तो कुणालाच
नको असतो
राजाला दारिद्र्याला
आजाऱ्याला भिकाऱ्याला
त्याला तिला तुला मला
जरी माहित असते
त्याची अटळता
कदाचित म्हणूनच
त्याची आठवण टाळत
असतो आपण जगत
आयुष्य भोगत
सतत अधाश्यागत
आणि होताच दर्शन
चुकून जरी त्याचे
नात्यामध्ये मित्रांमध्ये
शेजारी वा रस्त्यामध्ये
झटपट सारे
सोपस्कर उरकत
शक्य असेल तर
दुर्लक्ष करत
जाऊन बसतो
त्याच विस्मृतीच्या
आश्वस्त कोषात
पण...
आपल्या जाणीवेची
एक किनार
कितीही दडपली तरीही
असते सदैव फडफडत
क्षणा क्षणाचा
हिशोब सांगत
आणि आपण असतो
निरुद्देश धावत 
मृत्यू आपल्याला
गाठे पर्यंत .

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १५ सप्टेंबर, २०१३

तुला माझा मानतो मी




तुला माझा मानतो मी
तुला जाणू  पाहतो मी
अंधारात मीच माझ्या
मला शोधू पाहतो मी

फार काही दूर नाही
वाट जरी चांदण्याची
खिळलेत पाय माझे
भास खरा मानतो मी

केव्हातरी श्वासात या
चंदनाचा गंध होता
तोच श्वास आज पुन्हा
देवळात शोधतो मी

माथ्यावरी अबीर नि
गळा माळ तुळशीची
तोच तो असे मी वा
सोंगात या नटतो मी

लाख लाख यत्न माझे
जप तप ध्यान काही
व्यर्थ खेळ वाटे जरी
करू तेच जाणतो मी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

नर्मदा मैया ...




नर्मदा मैया ...
पाण्याचे खळखळणारे
कुठलेही रूप, माझ्या मनात
तुझी आठवण जागवतात
मी डोळे मिटून घेतो
अन अनुभवू लागतो
तुझ्या शीतल जललहरी
जणू मला गोंजारणारे
प्रेमाने सांभाळणारे
तुझे प्रेमळ हात
तुझ्या दिव्य अथांग कुशीत
मी छोटसं बाळ होतो
अन हुंदडू लागतो
वय देश काळाची
सारी बंधन लया जातात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रेवा माई साद देई




काही नाही काही नाही
इथे माझे कुणी नाही
कासावीस जीव झाला
सारे सारे सोडू पाही

रोज रोज तेच ओझे
भार कमी होत नाही
किती मारू येरझऱ्या
त्याला काही अंत नाही

खुणावते आकाश ते
रेवा माई साद देई
उताविळ पावूलांना
धीर धरवत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अक्कलकोटी म्हातारा





अक्कलकोटी म्हातारा
मज सोडतो न जरा
दृष्टी भेदक ठेवते
मजवरती पहारा

कुठे हरवून जाता
सदा फिरवी माघारा
मोही फसता खचता
नेई पिटाळून घरा

येता संकटांची सेना
मागे सदैव आधारा
हाक मारो न मारो
दत्त उभा सदा दारा

तया पदी वाहिला मी
माझ्या जन्माचा पसारा
तया प्रेमाचा रे ऋणी
देह कणकण सारा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

पाटी




आता शाळा सुटल्यावर
पाटी कधी फुटत नाही
पाटी काय असते खरतर
शाळेलाही माहित नाही
काळीशार गुळगुळीत
लाकडाच्या काठाची
लिहण्यासाठी पुसण्यासाठी
सदा उत्सुक असलेली
पाटीशिवाय शाळाहि
कधी असू शकते
स्वप्नातही आम्हाला
कधी वाटले नव्हते
वही मध्ये लिहिलेले  
जरी वहीमध्ये राहते
कालच्या अभ्यासाचे
पण आज ओझे होते
ओझ्याविना अभ्यास
पाटीच शिकवू शकते
अट फक्त एकच कि
ती कोरी ठेवावी लागते
कोऱ्या पाटीने त्या
अशी सवय लावली
जीवनाशी नवीकोरी
रोज भेट होवू लागली
कोरे मन ठेवायचे
सदा नवे जगायचे
शिकविले त्या पाटीने  
हे ऋण आहेत तिचे
म्हणून जेव्हा मी पाहतो
पाटी नसलेल्या शाळा
ओझी वाहणारे विद्यार्थी
मला त्यांची कीव वाटते
पाटीच्या आठवणीने
मन गहिवरून येते

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

उन्मळलेली अर्धी वेल .





दुखाचे वादळ
घेते वेटाळून
कधी अचानक
आनंदी जीवन

सुरेख सुखद 
घर विस्कटून
जाती क्षणात
नाती कोमेजून

एका विषारी
जहाल थेंबानी
कुठल्या तरी 
बेसावध क्षणी

शब्द निसटून
जातो तोंडातून
कृती काहीतरी 
घडते चुकून

एका छोट्या
छिद्रामधून 
जाते अवघे
धरण वाहून

झाड जळते
काच तडकते
वस्त्र फाटते
न येते जुळून

नंतरही पण
असते जीवन
काही कोठे
जोडून शिवून

बळेच परी ते
चिटकवलेले
उसने हसू
ओठावरले

तरीही निरंतर
आशा जागते
पहिल्या सारखे 
व्हावे वाटते

त्या आशेच्या 
ओली मधून
जीवन राहते
तग धरून

पण उन्मळली
अर्धी वेल

उघडी मुळे
पाने मलूल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...