बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

पुत्र स्वामींचे

आम्ही पुत्र स्वामींचे
अक्कलकोट वासीचे
आम्हा जन्म मृत्यूचे
भय नाही
धन्य आमुचा जन्म
झाले जन्माचे कल्याण
दृढ धरिता चरण
स्वामींचे
तुटली अवघी बंधन
संसार जाहला खेळण 
जाता स्वामींस शरण
संपूर्ण
गेली मनाची तळमळ
सरली बुद्धीची खळखळ
शांती भोगतो निखळ
स्वरूपी
सुख दाटले आत
मावता मावेना मनात
मित्रां सांगतो हि मात
म्हणोनी
मज भेटले काही
वाटे भेटो तुम्हाही
विश्व ओसंडून वाही
कृपा त्यांची

 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

वर्गणी


मंत्र सारे ऋचा साऱ्या
प्रार्थना या व्यर्थ आहे
वर्गणीच्या खंडणीचा 
अर्थ मात्र सार्थ आहे

साऱ्यांचे हिशोब त्यांच्या
दफ्तरात दर्ज आहे
माफीसाठी केले अर्ज 
खारीज ते सर्व आहे

घेवून फुले धूपदीप
देव आत गप्प आहे
ताटातील चील्लरीत 
नि कुणाचे लक्ष्य आहे 

खर्चाचा हिशोब त्यांना
कोण  विचारणार आहे
जाती पिढया उद्धरून
ऐसे पुण्य द्वाड आहे

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

टोलनाका

प्रत्येक चौकात पूल आता
प्रत्येक चौकात टोल आहे
नाही म्हणायची हिंमत कुणा
ऐसे भुजात बळ आहे .
चरफडतोय पैसे तरीही भरतोय
माहित कुणा काय देय आहे
बीओटी च्या कुरणात नव्या
पिढ्यानपिढ्याची सोय आहे .
लुटतात खिसे उघडपणे ते
म्हणती फक्त विश्वस्त आहे
अन राजे या देशाचे
अवघी ओझी वाहत आहे .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.

दंगल


    मैदानाचे झाले रण 
    जळले  नंदनवन
    बेसावध जन गण
    द्रोहास आले उधान

    झाली किती वर्ष तरी
    देश अजुनी विछिन्न

    तिथे एक पाकिस्तान 
    इथेही एक अजून 
     

    द्वेष या मनामनात 
    दाट कडवटपण
    वरवर आच्छादन
    आत जहरी कृपाण

    रटरटणारी भिती  
    वर  मैत्रीचे  झाकण
    उगा जरा   हलविता
    येते हिंसा  उसळून

    विक्रांत प्रभाकर

    http://kavitesathikavita.blogspot.

    शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

    काजू टाकलेल्या बिस्कीटाची जाहीरात

    काजू टाकलेल्या बिस्कीटाची जाहीरात आहे.
    प्रेम असणे मह्त्वाचे आहे.
    पण त्याहून प्रेम दिसणे
    अधिक महत्वाचे आहे.
    लोक नसलेले प्रेम
    आहे असे दाखवतात,
    आणि सारे सारे लाभ
    पदरात पाडून घेतात.
    आमचे सारे काजू पण
    बिस्कीटात विरघळले आहेत,
    पाहणार्‍य़ाला कळत नाही
    बिस्कीटात काजू नाही तर
    काजूचेच बिस्किट आहे.
    पण
    काजू टाकलेल्या बिस्कीटाची जाहीरात आहे.
    काजू दिसणेच अधिक महत्वाचे आहे

    विक्रांत

    देवा

    देवा तुझ्या त्या गोष्टी
    वेगवेगळ्या पुराणातल्या
    मला कधीच नाही पटल्या
    अगदी तुझे ते भागवतही
    मला खर वाटत नाही.
    तुझे प्रसन्न होणे वर देणे
    रागावणे शाप देणे
    पुन्हा उ:शाप देणे
    वाटते जणू चालले
    लहान मुलांचे खेळणे.
    एवढ सारे असुनही
    तुझ्या वानरमुर्तीपुढे
    त्रिमुर्ती वा गजवक्र रुपापुढे
    मी हात जोडून उभा राह्तो
    तेव्हा अंतकरणात वाहतो
    प्रेमाचा नि श्रध्देचा झरा
    बुध्दीलाही जाणवतो
    एक विलक्षण दरारा
    जी वाहून नेते
    सा-या तर्काना, शास्त्रांना
    हतबल करुन टाकत
    मी पणावर उभारलेल्या
    पोकळ ज्ञानाच्या कस्पटांना.

     विक्रांत प्रभाकर

    ज्ञानदेव कृपा

     

     
    ज्ञानदेव शब्दांनी
    माझिया मनी
    गीता उलगडूनी
    कृपा केली..१..
    याचसाठी जन्मलो
    जगलो वाढलो
    मराठी मी झालो
    कृतार्थ आता..२..
    जगण्याचा मंत्र
    साधनेचे तंत्र
    देहाचे या यंत्र
    कळो आले..३..
    उघडली दृष्टी
    उमजली सृष्टी
    सुखाची वृष्टी
    सर्वागी..४..
    भक्तीचे आकाश
    ज्ञानाचा प्रकाश
    उमजलो खास
    काहीतरी..५..
    आनंद उकळ्या
    अंतरी फुटती
    रोमरोम नाचती
    स्वानंदाने..६..

    ********
    © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
    https://kavitesathikavita.blogspot.com 
    *********

    रिक्तत्ता

    रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...