मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

भ्रांत

भ्रांत
***"

कुणाचे ऋण इथे कोण फेडत आहे 
सागराचे पाणी सागरात जात आहे 

निर्मिती जीवांची धरतीत होत आहे
धरतीतच अवघ्याचा अंत होत आहे 

पंच महाभूते हेच वास्तव एथ आहे 
खेळ जीवनाचा अन् होत जात आहे 

येतो प्राण देही  कुणास कळत आहे 
सोडवेना देह ही मोठी फसगत आहे 

जाणे न येणे इथून साऱ्यास ज्ञात आहे
आभास असण्याचा नसणे भ्रांत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

ती वाट

ती वाट
*****
ती वाट एकवार दाखव मला अवधुता 
ज्या वाटेची महती संत गातात 
अन् बोलतांना योगी सद्गतीत होतात

असे म्हणतात ती वाट खूप खोल खोलवर जाते
पण किती कुठवर जायचेते कुणा न कळते

कारण तिथे पाट्या नसतात दिवे सद्धा नसतात 
ठरलेले रेखीव आखीव नकाशे ही नसतात 

डोळे मिटून  बसताच कुणासाठी कधी 
दार उघडतात पण 
बहुदा जागेवरच साऱ्यांचे पाय घुटमळतात 

कारण तिथे सोबत काही घेऊन  जाता येत नाही
अन् इथले तर कुणाला मुळी काहीच सुटत नाही 

त्या वाटेची एक गंमत असते 
जाणाऱ्याला जाणू इच्छणाऱ्याला 
जाणण्याच्या इच्छेसकट ती हरवून टाकते

ती वाट तू सहजासहजी दाखवत नाहीस कुणाला 
त्या वाटेच्या अटी शर्ती पचत नाही जगाला 

त्या वाटेची पात्रता येण्यास अजमावत असशील 
अन् फिरवत असशील पुन्हा पुन्हा माघारी मला
तर माझे एवढेच सांगणे आहे तुला 

रे काहीच वाव नाही उरला माझ्या प्रयत्नांना 
आणि मी शरणागत झालो आहे तुला 

त्यावरही तुला जर न्यायचे नसेल 
मला त्या वाटेला तुझी मर्जी मान्य आहे मला 
पण त्यामुळे डाग लागेल तुझ्या प्रतिष्ठेला

तेवढे तू जप तुझ्या पदवीला लपवून ठेव मला 
या माझ्या मागणीला ते तर सहजच जमेल तुला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
कवितेसाठी कविता 

https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

युगे (उपक्रमासाठी )

युगे (उपक्रमासाठी )
**************"
भेटले नाही प्रेम तरीही 
उगाचच म्हणत राहायचे 
तुझे माझे नाते सखी 
आहे बघ युगायुगाचे 

हा जन्म गेला तर काय 
नव्या जन्मी भेटू आपण 
नव्या जन्मी प्रीत पूर्णत्वा
बघ नेऊ नक्की आपण 

कुठल्या टाळक्यात राहणार 
पण कधी जन्मलो मेलो होतो
अन् नक्की हे ही ठाव नसते 
मेल्यावर पुन्हा जन्म असतो

पण जन्म पुनर्जन्माचीही 
सायकोथेरपी काम करते 
तुटल्या हृदयाचे जोडणे 
छान पैकी होऊन जाते 

तिच्या सुखी संसाराचे 
चाक नीट रुळावर राहते 
म्हणून मला ती भगवद्गीता 
तर खूप खूप आवडते 

पण कोणी विचारू नका बरे 
की माझेही असे काय होते ?
की हे तत्त्वज्ञानी युग बहाणे 
मजलागी असे एवढे आवडते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

धावणे

धावणे
.*****
नको नको वाटते आता हे धावणे 
उगाच वाहणे दिनरात ॥

मातीवर माती थापूनिया माती 
होऊनिया माती जाणे-अंती ॥

भंगुर सुखाची मांडली आरास 
झाकून दुःखास ठेवलेली ॥

परी चाखताच चव कळू  येते
गळून पडते आवरण ॥

काय अवधूता सरेल हे स्वप्न 
उजाडून दिन कधीतरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

अधिकार

अधिकार
*******
जाणतो मी दत्ता माझा अधिकार 
झालो भुमिभार तुजविण १

मजहून श्वान बरे भगवन 
पदी ते येवून बसे सुखे २

मज नाही ठाव कुठे तुझा गाव 
ज्ञानाचा अभाव सर्वकाळ३

घर नाही दार फिरे वणवण 
देहाला धरून रात्रंदिन:४

तूच तुझी वाट दाखव रे आता 
सरो आटापिटा संसाराचा ५

विक्रांत निरर्थ फिरे गरगरा 
धाव घे वासरा- साठी  माय ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

सूर्य

सूर्य 
****
दिशा पेटवून सूर्य 
होताच नामा निराळा 
ती वाट दिगंतरीची 
करुनी पायात गोळा ॥

ते स्वप्न चांदण्याचे
त्याला कसे कळावे 
मिरवून भास सारे 
गेले जिरून उमाळे ॥

होतेच रंग ते त्याचे 
ठाऊक त्या का नव्हते 
प्रत्येक अभ्रावरती .
अस्तित रेखले होते ॥

तो हट्ट विरक्त भगवा 
ती उग्र भव्य तपस्या 
चालणार किती युगे 
उरेल कोण पहाया ॥

मिळतो पूर्ण विराम 
हर एक आकाराला
शून्यास अर्थ असतो
का नसे ठाव कुणाला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

बाबा

प्रिय बाबासाहेब 
***********
कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन 
तुम्हाला करतो आहे मी अभिवादन 
कुठलाही रंग कुठलाही झेंडा 
हातात घेतल्या वाचून 
तुम्ही  सागर आहात म्हणून 
तुम्ही आभाळ आहात म्हणून 
मनामनातील मनुष्य धर्माचे
तुम्ही शिल्पकार आहात म्हणून 

तुम्हाला अभिप्रेत असलेले जग 
आहे प्रतीक्षेत अजून 
तुम्हाला हवे असलेले बदल 
तसे जुबबी आहेत अजून 
संपूर्ण एकतेचे समानतेचे 
अवतरण बाकी आहे अजून 

पण इथे जे झाले आहे 
ते ही शब्दातीत आहे
शोषितांचे उत्थापन ही
एक क्रांतीच आहे 

एक चीरा खाली पडतो
तेव्हा बुरुज जातो ढासळत
माणसाला विलग करणारे 
ते तट होतीलच नेस्तनाबुत 

कारण तुमची स्वप्न ही
एका दृष्ट्याची स्वप्न आहे. 
आणि ती पूर्ण करणे हे 
दृष्टअदृष्टाचे कर्तव्य आहे.

माझ्या मनात उमटणाऱ्या 
त्या स्वप्नांच्या प्रतिबिंबासकट 
तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...