बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

कुणीतरी

कुणीतरी
*******
कुठेतरी कुणीतरी काय असेल पाहत 
वाट दिनरात माझी प्राण आणून डोळ्यात ॥

कुठेतरी कुणीतरी काय असेल मोजत 
दिस हातावर बोटी मनी व्याकुळ रे होत ॥

कुठेतरी कुणीतरी काय असेल जाणत 
माझे जळते हृदय शोध जन्माचा शाश्वत ॥

कुण्या दुरच्या शहरी आडबाजूच्या गावात 
व्याज जन्माचे कुण्या मज देण्यास परत ॥

माझे जळते प्रारब्ध दशा चालती अज्ञात 
काय असेल संपले मज नाही रे कळत ॥

कुणीतरी कुठेतरी माझे आकाश रे होत
काही कळल्या वाचून मज घेईल मिठीत ॥

कुठेतरी कधीतरी प्राण विसावा तो श्रेष्ठ
सखा जिवलग प्रिय माझा पुरवेल हेत ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

ध्यास


ध्यास
*****
माझ्या जगण्याचे गाणे 
आहे दत्ताविना उणे ॥१

जाता शोधू मी तयाला 
फाटे फुटती पथाला ॥२

गंध दरवळे मनी 
वारा जातो सुखावून ॥३

झाड परी रे ते कुठे 
मज मुळी न दिसते ॥४

चंद्र चकोर मिलनी 
येता मळभ दाटून ॥५

डोळा झरते जीवन 
चिंब भिजते हे मन ॥६

चोची टिटवीचे बळ 
नाही मोजत रे जळ ॥७

प्राण लागले पणाला 
तुझा ध्यास या जीवाला ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

तुला पाहिले

 
तुला पाहिले
*********
बटा रेशमी रुपेरी मागे सारतांना 
मी तुला पाहिले 
विजेसम कोसळतांना 

गीत तरल तलम उगा गुणगुणतांना
मी तुला ऐकले 
भैरवीत नाहतांना

रंग सोनेरी बिलोरी डोळी साठवतांना 
मी तुला पाहिले 
गूढ सांज होतांना 

किती ऋतू आले गेले कळेना आठवेना 
मी तुला पाहिले  
हरेक ऋतूत सजतांना 

ती तशीच ओढ तुझी व्यापूनि आहे मना 
मी मला पाहिले 
तुझ्यासाठी जगतांना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

धूळ पाटी

धूळ पाटी 
*******
प्रश्न हे तुझेच जीवना 
अन उत्तरेही तूच दिलेली 
धूळपाटी हे जगणे माझे 
ठाऊक नच  कधी पुसली ॥

परि कणां ही असे स्मृती 
इवली इवली विखुरलेली 
त्या कणांचे क्षण कवडसे 
खोलवर मज दिसती दबली ॥

त्या क्षणांना भानही नसते 
स्वप्न उमटली तुटली फुटली 
कधी कुणाची दिठी बावरी 
कधी कुणाची स्पर्श सावली ॥

कधी सोनेरी चुकली संधी  
कधी बक्षिसे पदरी पडली
मित्र सुटली पाश तुटली 
अन आठवण खोल रुतली ॥

जरी पाटीवर नसती अक्षर 
स्तब्ध सपाट दिसते वरवर 
तुझे हात जरी लिहणारे 
तुला न कळते त्याचे अंतर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

अक्षर

अक्षर
*****
आभाळात घन जीवन भरले 
मातीवरती अलगद पडले 
पोर इवले अंगणामधले 
रडे विसरून हसू लागले 

त्या हसण्याचे सोन कवडसे 
झाड होत एक नभात घुसले 
शाळा हिरवी अंगण हिरवे 
पुस्तक पाटी हिरवी झाले 

पाहता पाहता हिरवाईला 
सुंदर मधुर फळ लागले 
फळात होती अनंत शून्ये 
अनंत अक्षर गुपित दडले 

अक्षर जीवन अक्षर स्वप्ने 
अक्षरात मन हरवून गेले 
सोपे करुनी किती सांगावे 
आरश्यात रे  चित्र उमटले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

कोष

कोष
*****
आपल्यासाठी फक्त आपण जगत असतो 
कोषात सुरक्षतेच्या निवांत राहत असतो 

कधी कधी कोषाला पडतेच एक भोक इवले 
अन् मग वादळ जीवाला स्पर्शून जाते थोरले 

वादळाची झिंग आणि जाणवतो थरार 
उतावीळ जीव होतो त्यावर होण्यास स्वार 

पण तुटलाच कोष जर सुटले सर्व आधार तर 
वाटते भरवसा वादळावर कोणी ठेवायचा बर

येताच भान सुरक्षतेचे स्मरतात सर्व व्यवहार 
येवूनिया हाती सुई दोर  शिवली जातात छिद्र 

घोंगावते वादळ राहते गर्जत कोषावर धडकत
शांत निवांत निर्जीव कोषात कुणी राहते नांदत 

कोण जगले मेले कोषात कुणालाही नाही कळत 
भाग्यवान असती ते ज्यांना वादळ खांद्यावर घेत 

कोषात जगण्यापेक्षा वादळात मरण बेहत्तरअसत
जगण्याला जीवनाचा स्पर्श होणे महत्त्वाचे असतं 

अन वादळ पाहून जाणून जे त्याला नाकारतात 
खरोखर या जगी त्याहून दुर्दैवी कोणीच नसतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

पथावर

पथावर
*****
कधी दिसे वाट कधी रे अंधार 
तुझ्या पथावर चालतांना ॥१

कधी तो प्रकाश डोळा दिपणारा 
जग तुटणारा क्षणभर ॥२

जगाचा कालवा कधी कानावर 
वाट अर्ध्यावर सोडू वाटे ॥३

सरू आले त्राण गात्र थकलेले 
मन आसावले मुक्कामाला ॥४

सवे वाटसरू सखे प्रियकर 
भार खांद्यावर टाकलेले ॥५

तया नेणे पार कर्तव्य ते एक 
दिले तूच नेक पार पाडे ॥६

तूच चालविता तूच थांबविता 
अन्यथा विक्रांता काय येते ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...