रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

ज्ञानदेव



ज्ञानदेव
******
ज्ञानदेव देही ज्ञानदेव मनी
स्मरणी चिंतनी ज्ञानदेव ॥

मूर्त सुकुमार शब्द सुकुमार 
बोध हळुवार रुजे आत ॥

चांदणे शिंपण पाहून सुंदर 
निवते अंतर आनंदाने ॥

कृपेचा निश्चळ डोह आरपार
तृषेला आवर नको वाटे ॥

वर्ष उलटली मन हे धाईना
नवाई  मिटेना शब्दातील ॥

तयाच्या शब्दात आता मी निजतो 
उठतो जगतो दिनरात ॥

नुठतो चित्तात मोक्षाचा विचार 
जन्म वारंवार यावा इथे ॥

अवघे सरावे अवघे तुटावे 
एकरूप व्हावे ज्ञानदेवे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

भेद


भेद
*****
नर नारीत मांडला देह आकार वेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ॥१

तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला 
पेशी एक एक असे नियमात बांधलेला ॥२

त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक 
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक ॥३

मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे 
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने॥४

त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ 
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ ॥५

रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे उधळे चौखूर नाही धरबंद ठाव ॥६

पाहू जाता पाहतांना ऐश्या निखळ चैतन्या 
दत्त हसला हृदयी शुभ्र मनात चांदण्या ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita. .
☘☘☘☘ 🕉️ .

दिवाळीचे लेणे

दिवाळीचे लेणे
************
दत्त प्रकाशाचे गाणे 
सण दिवाळीचे लेणे
खुले आकाशात तेज 
हे तो अवसेचे देणे ॥

दीप प्रत्येक दारात 
आहे चैतन्य खेळत 
त्याचे आशिष थोरले 
घरा घरात तेवत ॥

दत्त रोषणाई दिव्य 
डोळे मिटता दिसते 
कणकणात फटाके 
कोण कळेना लावते ॥

रूप मनात धरले 
किती अंगानी नटले 
स्वामी गजानन साई 
दीप आवडी सजले ॥

किती अद्भुत सुंदर 
किती नटला अपार 
दत्त व्यापूनिया जग
प्रभा निघोट निश्चळ ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

नाते


नाते
****
भुई खिळलेले डोळे 
भाव पुसलेले खुळे 
तरी गंध परिमळे 
भरुनिया नभ निळे ॥१

नको सखी बाई अशी 
उगाचच शेला ओढू 
पापण्यात अडलेले 
काजळ ते उगा काढू ॥२

भेट तर होणारच 
जग फार मोठे नाही 
कोण भेटे कोण घटे 
नदीला त्या ठाव नाही ॥३

मागील ते जाऊ दे गं
सूर्य उगवतो नवा 
नात्याविन नाते कुठे 
शब्द कशाला ग हवा ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शहर




शहर
*****
आता हे शहर खूप वेगळे असे वाटते 
आकाश इथले आता फाटलेले दिसते ॥१

माणसे आहेत खरी माणसासारखी जरी 
कोष कीटकांची जिंदगी हर दिनी वाढते ॥२

उजाडते कधी इथे कळेना मावळते कधी 
शुभ्र एलईडी प्रकाश घर अहो रात्र वाहते ॥३

आलो होतो इथे मी स्वप्न रेशीमसे पाहत 
कर्म जगण्याचे उरे स्वप्न गर्दीत फाटते  ॥४

सजण्याची स्पर्धा इथे कुणा मारते वाढवते
छाटण्याची भीती अन प्रत्येक फांदीस वाटते ॥५

क्रमप्राप्त आहे जगणे हा देहभार वाहणे
जग वेशी पलीकडचे परी आहे रे खुणावते ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

दत्त स्वप्न


दत्त स्वप्न
******
स्वप्नातला दत्त दिसावा सत्यात 
चिन्मय ते स्मित यावे हृदयात ॥

बालिश मागणे माझे विनविणे 
खरे व्हावे  देवा पाऊली पडणे ॥

सरो तन मन सारे धनमान 
भक्तीचेच देवा मज द्यावे दान ॥
  
अवधूत गाणे गुंजावे रे मनी
तयात सुखाने जावे मी रंगूनी ॥

विक्रांत इवले पाहतसे स्वप्न 
दत्ता तुच व्हावे जगणे जीवन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

स्वामी राया

स्वामी राया
********
जन्म हा विकला तुज स्वामी राया 
तुझ्यावरी काया ओवाळली ॥१

किती सांभाळले आपदी रक्षिले 
येऊनी जपले कुण्या रुपी ॥२

दाखविला पथ यशही दाविले 
अपयशी दिले चटकेही ॥३

परी शिकविले जीवन दाविले 
धरून ठेविले दयाघना ॥४

आता करा देवा एक काम माझे 
दावी मज तुझे रुप डोळा ॥५

राहा निरंतर माझिया मनात 
चित्ती एकारत सर्वकाळ ॥६

विक्रांत जगाला स्वामी जगविला
स्वामीचाच झाला असे व्हावे ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...