सोमवार, २९ जुलै, २०२४

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
*********

तुझ्यासाठी माझे गाणे 
माझ्या मध्ये झंकारते 
तुझे शब्द तुझे हास्य 
कणोकणी खळाळते 

तुझी साद वेडी खुळी 
मज पुन्हा बोलावते
किनाऱ्याला लाट लाट 
पुन्हा पुन्हा आदळते 

आकाशात विखुरले 
रंग माझे स्वप्न होते 
पाण्यावर परावर्ती 
रूप तुझे त्यात येते

जगण्याला जीवनाची
लसलस डिरी येते 
धमन्यात निजलेले 
प्राण पुन्हा जागे होते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

आम्ही खूप काम करतो .

आम्ही खूप काम करतो .
**†***************
जरी आम्ही हातावर हात ठेवून बसतो 
जरी आम्ही गप्पाटप्पात वेळ घालवतो 
जरीआम्ही कधीही येतो कधीही जातो 
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आम्ही दारी चा माणूस परत पाठवतो 
आम्ही इर्मजन्सीला महिन्याची तारीख देतो 
आम्ही आमची काम दुसरीकडे पळवतो
 तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आम्ही दिवसाला अर्धा एक तास काम करतो आम्ही दोन तीन होताच पार थकून जातो 
मान्य पगार जरी पाव पावून लाख घेतो .
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आमचा साहेब 
रात्री अपरात्री  रावूंड घेतो
अन आमच्यावर वचक ठेवतो 
तो येताच आम्ही कामा लागतो 
पण साहेब येत अन् जातच राहतो
पण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आता ही गोष्ट वेगळी आहे की 
माणुसकी हरवून गेलोय आम्ही 
नोकरीच्या शाश्वतीत  सुखावलोय आम्ही 
पण आमचे कोण बिघडू शकतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

संघटित आहोत आम्ही सही करून काम करतो 
अहो आम्ही असू निर्ढावलेले 
अन सरकारी पाणी प्यायलेले  
 सांगा आम्हा कोण सुधारतो 
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

हा जर कधी काही झालेच तर 
आणि कुणी कुठे सापडले तर 
एखाद दुसरा घरी बसतो संघ आमचा जोर धरतो
त्याला पुन्हा इथे आणतो आम्हा समोर कोण टिकतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

ही नियमांची घट्ट घडी ही नोकरीची शाश्वती 
आणि आमच्या संघाची मजबुती 
आमचे कोण वाकडे करतो 
खरंच आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

काम आमचे संथगती मिरवीत चालते लाल फिती 
अडली नडली इथे येती त्यांना लायकी दाखवतो
आणि जणू उपकृत करतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

शनिवार, २७ जुलै, २०२४

जीवलगा विन

जीवलगा विन
************
देहास बांधले या ते 
नव्हतेच माझे नाते 
देहधर्मा जागलेले
आदीम संस्कार होते ॥१
येताच फुले वेलीस 
जपणे तयास होते 
वाघीण धेनू वा घार 
मातृत्व एक असते ॥२
ते स्पर्श नको नकोसे
परके अजून खोटे 
ते शब्द ओल नसले 
बाजार घरात होते॥३
मनी आस ही कुणाची 
अजूनही आत जळते 
स्मरतात कुणा कधी 
गात्रात वीज पेटते ॥४
ही असेलही वंचना 
कुणी काहीकाही म्हणा 
जिवलगा विन जन्म 
तो मिळू नयेच कुणा ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

स्पष्ट सूचना

स्पष्ट सूचना
******
मागील सूचना सटीक होत्या 
आताही तशाच आहेत .
पुढील सूचना वेगळ्या शब्दात
पण त्याच राहणार आहेत .

कारण सूचनांना आकृतीबंध नसतात
सूचना अवलंबून असतात 
देणाऱ्याच्या मनस्थितीवर
आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीवर
वस्तुस्थितीचे आणि त्याचे
काही संबंध नसतात .

सर्व सुचनेचे ध्येय एकच असते
संसार चालवायचा कमीत कमी खर्चात 
फाटके तुटके घालू नका 
पण नवीन मात्र घेऊ नका
शिळे पाके खाऊ नका
पण ताजे आणून जेऊ नका
नोकर चाकर ठेऊ नका 
घर खराब होऊ देऊ नका

थोडक्यात
लग्न काही करू नका 
बायको घरी आणू नका 
पोरे होऊ देऊ नका
पण संसार मात्र टाकू नका

तुम्हीच जा बाजारात 
तुम्हीच स्वयंपाक करा 
भांडीकुंडी साफ करा 
झाडू पोछा सारा मारा
आणि रात्री छताकडे 
पाहत पाहत डोळे मिटा .

सूचना तशा स्पष्ट आहेत
दोन ओळीतील रिकाम्या जागेत
स्पष्टपणे दिलेल्या आहेत .
जे वाचतील त्याला कळतील 
बाकी सारे बोंबलत बसतील
अन पुन्हा पुन्हा सूचनाचे 
डोंगर  मात्र उपशीत राहतील

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २४ जुलै, २०२४

बस थांब्यावर


थांब्यावर
*******
एक दिवस अचानक ती
हायवेच्या बस थांब्यावर 
दिसली मला उभी रस्त्यावर
 घेऊन बॅग खांद्यावर 
थोडी  दिसत होतीअस्वस्थ 
बेचैनीही होती चेहऱ्यावर 
पुन्हा पुन्हा तिची नजर 
जात होती घड्याळावर

काही क्षण मनात भिरभिर 
थांबावे की जावे पुढे 
काय म्हणावे काय सांगावे
कळल्या वाचून द्विधा मी होवून
परंतु का न कळे
 पाय नाहीच पडले ब्रेकवर 
अन हात राहिले एक्सीलेटरवर 
गतीवर त्या होऊन स्वार 
गेलो थोडा मी दूरवर 
मग  डाव्या बाजूचा मिरर 
पाहणे टाळीत गाडी हाकीत
तसाच आपल्या ड्युटीवर

किती छान ती दिसते अजून
 ड्रेस सेन्स नसल्या वाचून
 केस तसेच पिंगट काळे 
चष्म्या मागील घारे डोळे
 पण लाली हसऱ्या गाली 
थोडी फिकट होती झाली 

गेले होते धागे सुटून
गाठी काही बसल्या वाचून  
जखमाही गेलेल्या भरून 
व्रणही ते केव्हाच मिटून 
कथा सुरू झाल्या वाचून 
गोष्ट गेली होती संपून

पण तरीही दुसऱ्या दिवशी 
त्या थांब्यावर
का गाडीची गती मंदावली 
खुळी नजर जरा विखुरली 
हातालाही कळले नाही 
पायालाही कळले नाही 
उरी श्वास  का जडावले 
मनाला या वळले नाही .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २३ जुलै, २०२४

व्यापूनिया

व्यापूनिया
********
व्यापूनिया जीवनाला
तू अशी राहिली आहेस 
मज चिंब चिंब करणारा 
तू आषाढ झाली आहेस ॥

आयुष्याचे गणित मज
कधीच कळले नाही
वजाबाकीत प्राक्तनाच्या 
तू नशीब झालीआहेस ॥

आकडे बदलती दिवसाचे 
पण सूत्र बदलत नाही 
तीच होऊन सांज सकाळ 
तू मनात ठसली आहेस ॥

येतात ऋतू नि जातात
रंग नभाचे बदलतात 
स्मृतीमध्ये घन मेघांच्या 
तू चंद्रकोर झाली आहेस ॥

किती भेटले मित्र मैत्रिणी 
आठवतात कधी कुणी 
मनी कायम रुणझुणती
तू गुणगुण झाली आहेस ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...