रविवार, १४ जुलै, २०२४

ज्ञानदेव कृष्ण

ज्ञानदेव कृष्ण
**********

संत ज्ञानदेव कृष्ण भगवंत 
अगा भेदातित तत्व एक ॥
पटांमध्ये तंतू तंतुचाच पट
 पाहत्या दृष्टीत भेद जन्मे ॥
भजे ज्ञानदेव कृष्ण भगवंत 
रूपाचे गणित सांडूनीया ॥
कृष्ण सांगे तत्व सातशे श्लोकात 
नऊ हजारात ज्ञानदेव ॥
भगवत गीता ज्ञानेश्वरी सार 
गीतेचा विस्तार ज्ञानदेवी ॥
आवडी धरूनी पुरवावी धणी
म्हणून मांडणी करी देव ॥
हृदयी माऊली कृष्ण भगवंत 
ठेवून विक्रांत सुखी झाला ॥
.🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १३ जुलै, २०२४

आळंदी वल्लभ

आळंदी वल्लभ
*************

आळंदी नांदतो माझा गुरुराव
माहेरचे गाव वैष्णवांचे ॥१
होई निरंतर उर्जेचा वर्षाव 
प्रकाशाचा ठाव गाभाऱ्यात ॥ २
समाधी म्हणू की चैतन्यांची वेदी 
भरून वाहती अविरत ॥ ३
रंगाचे तरंग सुगंधाचे लोट 
थेट हृदयात सामावती ॥४
कोमल कोवळा स्पर्श माऊलीचा 
भिजल्या दवाचा हळुवार ॥५
घडता दर्शन झरतात डोळे 
शब्द प्रेम बळे कुंठतात ॥६
देह तुळशीचा होऊनिया हार 
तया पायावर विसावतो ॥७
विक्रांत हृदयी सदा राही माय 
आणि मागू काय प्रेमावीन ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

जावू नको

जावू नको
********
दूर पुन्हा टाळूनिया 
मजला तू जावू नको
जागलेले स्वप्न माझे 
हरवुनि देवू  नको ॥

गेल्याच छेदीत वाटा 
तुझ्या अन माझ्या पुन्हा 
काळवेळ नशिबा त्या
बोल उगा लावू नको ॥

कळल्यावाचून काही 
गुंफले हातात हात 
झिडकारुन तयास 
आसवे तू गाळू नको ॥

का न कळे मिळतात 
वाटा पुन्हा आपल्या या 
उकले ना गूढ मज 
उकलीत राहू नको ॥

दे वाहून या क्षणाला 
घेत हवेत गिरकी 
कोमेजून फांदीवर 
आयुष्य घालवू नको ॥

अक्षरात काळीज का 
लिहिता हे येते कधी 
कोरड्या शब्दात सखी
मजला तू तोलू नको ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

राम


श्रीराम

राम का पुजतो आम्ही 
राम का म्हणतो आम्ही 
दर वर्षी न चुकता 
रामजन्म का साजरा 
करतो आम्ही 

राम होणे कधीही कुणास
इथे जमणार नाही 
जरी जाणतो तरीही
श्रीरामास स्मरतो आम्ही

कुठवर जावे उंच उंच
होत उन्नत आकाशी . 
कळल्या वाजून काही
मन स्वप्न पाही
होवू पाहे तादाम्य रामाशी 
जरी ठाऊक असते
घसरण्याची वृत्ती मानसी

सत्य वचन का
कधी कोण वदती 
त्यागाची लेवूनी वस्त्र 
कोण इथे  जगती 
दुसऱ्यासाठी सारेकाही 
कोण आपले वाटून देती 
असे  शोध शोधूनही कुणी
सापडत नाही या जगती 

तरी ते स्वप्न सत्य व्हावेसे वाटते
मनोमनी खोलवर एक आशा असते 
स्वप्न जे पाहिले ऋषींनी 
अन समाज धुरीनांनी की
रामरूपी व्हावे जग आणि 
रामराज्य यावे अवनी 

त्या स्वप्नाची सदा स्मृती 
ठेवावी अशी जगती 
म्हणूनच कदाचित जग हे
श्रीरामास भजती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कर्ज

कर्ज
****
जीवनाचे ऋण कधी हे फिटेन
मुक्त मी होऊन जाईन रे? ॥१ .
थोडी कर्जमाफी मिळावी म्हणतो 
गाऱ्हाणे घालतो सावकारा ॥२
पण तिथे नाही दया माया काही
फेडीत मी राही पापपुण्या ॥३

दत्ता तुच माझा  तारणहार
घेई कारभार  तुझ्या करी ॥४
दत्ता घेई कर्ज वळते करून
घेई वाढवून व्याज दर ॥५
फेडीत राहीन जन्म मी वाहीन
तुजला नाणिन बट्टा कधी ॥६
मज कमावण्या भक्ती धन साठा 
देई दारवठा काम तुझ्या ॥७
इतुके मागणे मागतो विक्रांत 
तुझ्या दारात जन्म जावो ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० जुलै, २०२४

देव हा चोरला


देव चोरला
********
देव हा थोरला कुणी रे चोरला 
हृदयी ठेवीला गुपचूप ॥

 रूप न तयाला नाव न जयाला
 तरीही ठसला पूर्णत्वाने ॥

अन घेऊ जाता सताड ते उघडे 
दारही दिसते आत रिते ॥

देव तो गिळला आणि पचवला 
काय त्या चोराला म्हणावे गा ॥

भेटवी समर्था महा त्या चोराला 
विद्या ती मजला कळू द्या हो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ९ जुलै, २०२४

पालखी

पालखी
******
पालखी हालते  पालखी डोलते
भजन चालते विठोबाचे ॥१

राम कृष्ण हरी घोष निनादतो 
टाळ दणाणतो भाविकांचा ॥२

ज्ञानोबा तुकोबा मृदुंग बोलतो 
हात कडाडतो वैष्णवांचा ॥३

पाऊल पडते रिंगण चालते 
चित्त हरपते नाद लयी ॥४

पालखीत माय कौतुके पाहते
प्रेम उधळते मायातीत ॥५

पाहता काळीज प्रेमे धडाडते 
डोळ्यात लोटते महासुख ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...