सोमवार, ८ एप्रिल, २०२४

भांडे

फुटके भांडे
*****
फुटक्या भांड्याचा सोस भरण्याचा 
तैसा कळण्याचा मार्ग जीवा ॥
भांड्यावर भांडे पडूनिया भांडे 
भरेनाचि भांडे काही केल्या ॥१
सारे साचलेले सरुनिया जाता
ठणाणा कोरडा स्वर उरे ॥२
कळे भरण्याची व्यर्थ उठाठेव 
सरे धावाधाव मग त्याची ॥३
होईल लिंपण मोडीत वा जाण
ठाऊक प्राक्तन नसे कोणा ॥४
जाता भांडेपण विसरून भांडे 
शून्यातले धडे गिरवीत ॥५
आतले बाहेर एकच आकाश 
असण्याचा भास अस्तित्वाला ॥६
विक्रांत आकांत कळे भरण्याचा
येण्याचा जाण्याचा मार्ग नाही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

कैवारी

कैवारी
******
जाणिवेचा डोळा नभाने गिळला
सूर्य वितळला डोईवर ॥१

एक एक पान जळले प्रेमाने
वसंताचे गाणे गात ओठी ॥२

आयुष्य टांगले होते खुंटीवर 
झटकून धूळ नेसू केले ॥३

गेले मिरवित असण्याचे भान 
उमटली तान मणक्यात ॥४

दिसे अहंकार उभा पायावर 
कुबड्याचा भार जन्मावर ॥५

हरवला प्राण वाजवे बासुरी 
श्रीपाद कैवारी गुंजनात ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

जुगार


जुगार
***
खेळतो जुगार तुझिया नावाचा 
 जन्म मी हा माझा 
लावून पणा ॥१
प्रारब्धाचा पक्ष जरी बळकट 
सारी सारा सारीपाट
त्याचा जरी ॥२
तया सारे ठाव पुढील ते डाव 
जिंकणे हवाव 
सदा तया ॥३
माझ्या पाठीराखा परी असे दत्त 
त्याचे महाद्युत 
कुणाकळे॥४
मनी असे खात्री हरेल प्रारब्ध 
जिंकेल श्रीपाद 
श्री वल्लभ ॥५
सारे लिहिलेले पुसतील लेख 
भक्तीची ती मेख 
कळू येता ॥६
भक्तीसाठी भक्ती प्रीतीसाठी प्रीती 
श्रीपादाचे प्रति 
नित्य घडो ॥७
आणिक विक्रांता काय ते जिंकणे 
श्रीपादाचा होणे 
जन्मभर ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

भान


भान
*****
चांदण्याचे 
तुझे हात 
लखलखतात 
माझ्या मनात  ॥
स्पर्श अमृताचे 
ओघळतात 
आतुरल्या
कणाकणात ॥
आल्याविना 
येतेच तू 
गेल्या विना 
जातेस तू ॥
हरवते जीवन 
हरखते जीवन 
तुझ्याचसाठी 
सजते जीवन ॥
प्रकाश प्राशून 
माझा प्राण 
होतेस तूच
हरपून भान ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


बुधवार, ३ एप्रिल, २०२४

श्रीपादराजम शरणं प्रपदे

श्रीपादराजम्  शरणं प्रपदे
******************
श्रीपाद भक्ताचा असे पक्षकार 
करितो सांभाळ रात्रंदिन ॥
जरी येती दुःख प्रारब्धा अधीन
लावी विटाळून सारी प्रभू ॥
जगी दुष्ट शक्ती राहती लपून 
वेष पालटून येती कधी ॥
छळती गांजती भक्तां रडवती 
परीक्षाच घेती जणू काही . ॥
परि जो शरण श्रीपादा केवळ 
तयाचे सकळ इष्ट होते ॥
इह पर लोक दोन्हीही साधती 
सुख वर्षताती अप्राप्यही ॥
विक्रांत शरण श्रीपाद पदाला 
परिस लाधला पूर्व पुण्ये ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २ एप्रिल, २०२४

आमीष


आमीष
*******
थोडी ढील देते ती त्याला थोडे जवळ खेचते
पुन्हा ढील देऊन दूरवर जाऊ देते 
पण आहे ना गळ घट्ट रुतलेला 
सदैव काळजी घेते 
तोंडात धरून आवडीचे आमिष
जितं मया म्हणत मीनाची स्वारी निघते 
तो तिचा खेळ किती वेळ चालणार 
कोणास ठाऊक 
पण जीवनात रंगत आणते 
त्याच्या आणि तिच्याही 
कारण तो आहे म्हणून गळ आहे 
आणि गळ आहे म्हणून ती आहे 
पण जर तीच नसती तर गळही नसता 
आणि तो मासा त्याचा जन्म मरणाचा 
सुखदुःखाचा खेळही नसता 
तसे तर सागरात लक्षावधी मीन असतात 
सारेच कुठे आमिषाला भुलतात 
साऱ्यांनाच कुठे सुखं मिळतात 
आणि सारेच कुठे गळाला लागतात 
पण जे गळात अडकतात 
त्यांनाच प्रश्न पडतात 
त्यांचेच प्राण पणाला लागतात 
म्हणून खरोखर तेच भाग्यवान असतात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १ एप्रिल, २०२४

उंबरा तळी

 उंबरतळी
*******

मनी पांघरून दत्त 
खुळे जग विसरतो
वाटा सोडून श्रेयाच्या 
तळी उंबरी बसतो ॥१

येतो शितलसा वारा 
जलकण शिंपडतो 
जणू हलकेच दत्त 
कमंडलू हिंदळतो ॥२

गंध गोडस मदीर 
आसमंतात व्यापतो 
फळ एक-एक मधु 
क्षुधा तृषा भागवतो ॥३

साऱ्या विसरती व्यथा 
अणू रेणू शांत होतो
मन उन्मन होवून
दत्त नामात रंगतो ॥४

त्याचा सोवळा सोहळा 
जरा दुरून पाहतो 
आत हसतसे दत्त 
संगे ओवळा नाचतो ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...