शुक्रवार, ८ मार्च, २०२४

सर्व्हर

सर्व्हर
********
प्रत्येक माणूस प्रत्येक जीवन 
हे एखाद्या सर्व्हर सारखे असते 
ते अनेक तारांच्या गुंत्यांनी 
अनेक ठिकाणाशी जोडलेले असते 
त्या तारा उर्जेने भरलेल्या असतात
त्यातून वाहत असतात 
विचार ज्ञान भावना अविरत

व्यक्त होत असतात नात्यात प्रेमात
ध्येयात धर्मात स्वार्थात त्यागात 
उदात्ततेत मैत्रीत गरजेत 
त्यापैकी काही असतात खूपच बलवान 
त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही 
त्या सर्व्हर पासून कधीही
तर काही असतात सूक्ष्म तरल 
लक्षातही न येण्यासारख्या कमकुवत 
पण खूप अर्थवाही

या प्रवाहा मधून वाहत असते जीवन 
थरथरत फडफडत नर्तन करत 
हा जो सर्व्हर आहे हा जो कनेक्टर आहे 
त्याला आपण म्हणत असतो " मी ै

खरं तर त्या मी ला ही काही अर्थ नसतो 
तो फक्त असतो एक माहितीचा खजिना 
अन भावनांचं लटांबर 
बस त्यापेक्षा काही नाही 
तो स्वीकारत  अन पाठवत असतो पुढे 
आवड नावड .प्रीत अप्रीत राग द्वेष 
आशा आकांक्षा महत्वकांक्षा
यांचे सिग्नल तरंग

आणि एक दिवस तो सर्व्हर तो कनेक्टर
होऊन जातो फ्युज्ड
जळतात जीवनाच्या अनेक तारा
 परंतु जीवन कधीच थांबत नसते
ऊर्जेचा प्रवाह तसाच वाहत राहतो
सर्व्हर - कनेक्टर  बदलले जातात 
नेटवर्क पुन्हा स्थापित होते 
जीवन पुढे पुढे जातच राहते 
पण त्या एका सर्व्हर शिवाय
कारण प्रत्येक सर्व्हरचा 
एक बॅकअप असतोच कुठेतरी 
अन्  त्या कृत्रिम अमरत्वाची 
सत्ता सुटत नाही कधीही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, ७ मार्च, २०२४

जगणे



जगणे
******
एकमात्र सूत्र असते जीवनाचे 
ते म्हणजे जगत राहायचे 
सर्व स्थितीत परिस्थितीत 
अस्तित्व टिकवायचे 
अस्तित्वाचा अर्थ काय 
काय ते कशाला 
या साऱ्या प्रश्नाला पूर्णतः विसरून 
किंवा सोडून देऊन बुद्धीवर प्रज्ञेवर 

अस्तित्व असेपर्यंतच प्रश्न असणार 
आणि उत्तर मिळणार .
म्हणूनच जगणे महत्त्वाचे असते 
उत्तर मिळतेच असे नाही 

जन्म जरी प्रश्न असला 
तरी मरण उत्तर नसते 
उत्तर जीवनातच असते 
कधी मिळते  कुणा कुणाला 
कधी मिळवले जाते कुणा कुणाकडून 
पण त्यासाठी टिकून राहणे म्हणजे
जगणेच महत्त्वाचे असते जीवनाचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ६ मार्च, २०२४

दत्त स्वरूप


दत्त स्वरूप
**********
अद्भुत विराट असे दत्त रूप 
तयाचे स्वरूप कोणा कळे ॥१

असून निर्गुण भासतो सगुण 
होऊन अधीन भक्ताचिया  ॥२

तयाच्या संकल्पे विश्व जन्म घेई
लयासी ही जाई क्षणार्धात ॥३

लिहिण्या दे बळ शब्दांचा हा खेळ 
विक्रांत केवळ निमित्तच ॥४

अगा प्रेम राशी सर्व गुणविधी 
ज्ञाना तू अवधी दयाघना ॥५

करी मी स्तवन तुझिया कृपेनी
सुमने वेचूनी तुच दिली ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ५ मार्च, २०२४

माय

नर्मदा माई 
*****

जरी जाणतो मी तुझा आहे माई 
जन्म तुझ्या पायी  वाहायाचा ॥

तीच ती पाऊले तोच तो किनारा 
माझिया अंतरा भिजलेला ॥

पण काय असे वेळ ठरलेली 
रेष ओढलेली अदृश्याची ॥

उकळून भाव माझिया जीवाचा 
दाटल्या हाकेचा घोष व्हावा ॥

तुटू दे प्रारब्ध हटू दे अदृश्य 
जीवनाचे लक्ष साध्य होवो ॥

घेई बोलावून तुझिया कुशीत 
कृतार्थ करीत जन्म माझा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


 

सोमवार, ४ मार्च, २०२४

वादळ


वादळ
*******

होय डमडम भरल्या नभात
क्षणोक्षणी पिशी वीज चकाकत 

भरले वादळ लाटा आकाशात 
नव्या नाविकाची होय होलपट

कोण सांभाळतो कुणास कळेना 
वेढून काळोख अवघ्या दिशांना

कुठे.दूरवर दिसतो किरण
असावा भास का जीवन तारण 

काळ हिशोब हा कुणा रे कळला 
हातात क्षण हा आला का गेला
  
खोल खोल असे तळ तो अतळ 
 निस्पंद निष्क्रीय अस्तित्व केवळ

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३ मार्च, २०२४

स्वामी गजानन


स्वामी गजानना 
*************
दत्त अवधूता स्वामी गजानना 
करीसी करुणा भक्तावरी ॥१
देसी भजकांना मनातील सारे 
सौख्याची ती द्वारे उघडशी ॥२
परि भक्ती उणा उभा मी अंगणा 
तुज मागतांना लाज वाटे  ॥३
असुनी जन्माचा भणंग भिकारी 
तुझे पाय शिरी मागतो मी ॥४
केल्याविन पूजा स्मरण नमन 
स्वानंद भुवन मागतो मी ॥५
केल्याविना ग्रंथ तव पारायण 
भक्तीचे जीवन मागतो मी ॥६
देही मिरवतो संसार बंधन 
मुक्तीचे मागणं मागतो मी ॥७
दत्त माझा नाथ तो तू अवधूत 
असे भेदातीत स्वरूप हे ॥८
म्हणूनिया काही प्रेम हक्क सांगे 
तुज लागी मागे प्रेम तुझे ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

तथ्य


तथ्य
****
थांबलेला श्वास विरलेला स्वेद 
जगताचा भेद मावळला ॥१

कागदाची गत जैसी वादळात 
तसे रे अस्तित्व हरवले ॥२

पेल्यातला रंग सांडावा नदीत
तैसे समग्रात मन जाई ॥३

कणकण जणू होतं विघटीत 
देहाचे गणित कळू ये ना ॥४

सारे अट्टाहास उगा असण्याचे 
आजचे उद्याचे व्यर्थ झाले ll ५

आले स्वप्नभान जगता स्वप्नात 
निद्रा जागृतीत भेद नाही ॥६

दिसते म्हणून असते जगत 
तथ्य दिसण्यात अन्य नाही ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...