शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

तुझिया डोळ्यात

तुझिया डोळ्यात
************

तुझिया डोळ्यात दिसे मज गीत 
सुरावते मग माझिया मनात ॥१

शब्द हरवला भाव मनोहर 
ऐकू येतो मग कानी हळुवार ॥२

किंचित लाजरा जरा संकोचला 
स्पर्श अधीरसा होतो सुखावला ॥३

अमूर्त कविता माझी मी बघता 
विसरतो कसा वाहवा म्हणता ॥४

स्तिमित होऊन जग विसरून 
गीत पूर्ण होते तिथे हरवून ॥५

कविता जगणे लिहिल्या वाचून 
असे काही मग येतसे घडून  ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

निळी जाहले

निळी जाहले
**********
प्राण प्राणातले निळे 
खोल जळात सांडले 
होत उर्मी जगण्याची 
निळे कमळ फुलले १

लाख मयुरांच्या केका 
चित्त बधिर जाहले 
एक रव मुरलीचा 
शांत करूनिया गेले  २

मौन निरोपाचे गूढ 
कसे वादळी वाजले 
आणाभाकाचे कुणाचे
 चित्र चौमेरी सांडले ३

सारे विभ्रम लेवून
कोण जगात सजले
रंग हजार नभात 
मूळ रंगात लोपले ४

मग गळली बंधने 
मनी शब्दावीन गाणे 
निळा पाझर आभाळा
निळी जाहली साजणे ५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

बुधवार, १० जानेवारी, २०२४

परांगदा

 परांगदा
********

होते परागंदा जीवनाची कथा 
खुळ्या हरणांचा विखुरतो जथा ॥१

जेव्हा बंद होतो मार्ग वाहणारा
अंधारत उडी घेई धावणारा ॥२

हरवला गाव अस्तित्व पुसले 
सैरभैर होती मागुती उरले ॥३

तयांच्या डोळ्यात प्रतिक्षा व्याकुळ 
जशी अवसेला चंद्राची चाहूल ॥४

मिरविते गौर भाळ चंद्रकोर 
रोज जाणवे का हाता थरथर ॥५

उलटती दिस मास संवत्सर 
वाहते जीवन अंतरी स्वीकार ॥६

परि मनी असे शल्य एक खोल 
बोलायचे होते फक्त एक वेळ ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

माऊली

माऊली
****
माझी आळंदीची माय आली कृपाळू होऊनी
घासातला घास मज दिला प्रेमे भरवूनी ॥१

गेलो भारावून तिच्या प्रेममय करूणेनी
दिशा हरवल्या साऱ्या विखुरलो कणोंकणी ॥२

सारे अतृप्तीचे मेघ गेले आकाशी विरूनी
घनगर्द  तम अंध गेला प्रकाशी वाहूनी॥३

खोल रुतणारी कुठे व्यथा झाली दीनवाणी
आले सुखाचे तरंग सुख भरल्या जीवनी ॥४

वेचतांना शब्द शब्द गेलो अंगण होऊनी 
नित्य नूतन वर्षाव चिंब काळीज भरुनी  ॥५

दिसे मोटकी आकृती नाम रूपात विक्रांती 
खेळविते माऊली ती सजवून भक्ती प्रीती  ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 



रविवार, ७ जानेवारी, २०२४

मोहर

मोहर
*****
उठावी मोहर माझिया मनात
घट्ट खुणगाठ 
बांधुनिया ॥१
याहून काही ते नको मज आता 
उचलूनी हाता
घेई बाबा ॥२
उधळते कधी कळपीचे खोंड 
जाते हुंदडत
दूरवर ॥३
परी तो जाणतो गुराखीच खरा 
आपल्या वासरा
हरवल्या ॥ ४
घेई ओळखून घेई रे ओढून 
आहे ते अजून 
मूढ किती ॥५
पुन्हा हरवता पुन्हा दुरावता 
भेटीची ती वार्ता
केवि घडे ॥६
विक्रांत दाव्याला सदा कंटाळला
राहू दे रे मोकळा 
अंगणात ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

भेट

भेट
****
भेटीवीन भेट 
जीव मिळे जीवा काळजात दिवा 
स्नेहमय ll१
शब्दाविण शब्द 
उधळती मुक्त जीवनाचे सूक्त 
सुखावले ॥२
फुले अंतरात 
आनंद मोहर धुंदी वृक्षावर 
विलक्षण ॥३
तुझ्या प्रेमाला
ऐसा मी विकलो महाग झालो 
स्वतःलाही ॥४
कळली प्रेमाची 
किंचितसी रीत स्वानंदाचे गीत 
जन्मा आले ॥५
श्वासात यमुना 
देही वृंदावन शब्दांचे चंदन 
सर्वांगाला ॥६
जहाले जगणे 
कृपेचे अंगण सुखे तन मन 
स्तब्ध झाले ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

सांभाळ

सांभाळ
*******
जन्म तुजलागी दिला ज्ञानराया  
अन्य कुण्या पाया 
पडू आता ॥१
जिथे जातो तिथे देवा तुझे पाय 
कानी गुरु माय 
मंत्र तुझा ॥२
राम कृष्ण हरी हात खांद्यावरी 
चालवले तरी 
कळेचिना ॥३
संत मुखातून येत असे कानी 
रम्य तुझी वाणी 
अविरत ॥४
किती करीसी रे माझ्यासाठी कष्ट
देऊनिया साथ 
पदोपदी ॥५
विक्रांत चाकर तुझा सर्वकाळ 
देवून सांभाळ 
सेवा तुझी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...