शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

कृपेचा कुरुठा

कृपेचा कुरुठा
***********

ज्ञानदेव कृपेचा कुरुठा मी झालो
ज्ञानदेवी ल्यालो अंगोपांगी  ॥१

ज्ञानदेवी शब्द माझिया पेशीत 
प्राणवायू होत संचारले ॥२

ज्ञानदेवी अन्न माझिया जीवीचे 
रोजच्या भुकेचे बहु गोड ॥३

ज्ञानदेवी जल तृषा करी शांत 
होऊनी अमृत कणोकणी ॥४

ज्ञानदेवी अर्थ नित्य मज नवा 
सूर्य उगवावा नभी जैसा ॥५

ज्ञानदेवी विना नको ग्रंथभार 
परमार्थ सार तिये ठायी ॥६

ज्ञानदेवी प्रिय अशी जीवनात
नित्य हृदयात विक्रांतच्या ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

किती सांभाळू


किती सांभाळू
******

काय कैसे किती सांभाळू या जीवा 
दत्तात्रेय देवा कुठवर ॥१

किती वठवावे नाट्य जीवनाचे 
घोकल्या शब्दांचे रोज रोज ॥२

सुखात हसणे दुःखात रडणे 
यांत्रिक जगणे त्याच वाटा ॥३

मान अपमान देह व्यवधान 
खरे ते मानून अंतरात ॥४

डोळे हे आंधळे पथही अंधारी 
भय उरावरी संपण्याचे ॥५

सांग तुजविण बोलावू कुणाला 
विक्रांता न थारा अन्य कुठे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (६ डिसे. 2023 )


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (६ डिसे. 2023 )
***********************
त्यांनी डॉक्टर आंबेडकर वाचले नाहीत 
त्यांना डॉक्टर आंबेडकर कळलेही नाहीत 
तरीही काहीही फरक पडत नाही 
कारण त्यांना कळत आहे 
त्यांची मोकळे आकाश आणि भरारता मुक्त वारा 
आणि त्यांना हे माहित आहे की 
या निळागर्द आकाशातला 
त्यांचा देव बाबासाहेब आहे .
कारण या निळ्या आकाशाची देण 
हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे .

ते जातीभेदाचे कडवट रसायन 
अजूनही उकळत आहे 
मला हवे मलाही हवे मलाच हवे 
कसेही करून हवे 
जातीच्या कळपापासून हवे 
वा धर्माच्या संघटनेतून  हवे 
हा हव्यास तेव्हाही होता आताही आहे 
कदाचित हा हव्यास अमर आहे 
वा हा हव्यास  मनाचा मूळ गुणधर्म आहे 
पण या हव्यासासाठी लावली जाते मानवता पणाला 
ओढले जाते रस्त्यावर कोणाला 
त्याचे सर्वस्व हिरावून
त्यांचे तनमन मानसन्मान मातीमोल करून 
तेव्हा त्या कृत्याला अमानुषाहूनही अमानुष म्हणणे रास्त ठरते 
परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवते 
किंवा लाचार बनवते जन्म नाही 
हे गळी उतरवणे अशक्य असूनही 
त्यांनी ते केले आणि मग आत्मग्लानीचे 
मणा मणाचे हजारो वर्षाचे ते लोढणे 
फेकून देता आले 
हजारो लाखो करोडो पिचलेल्या लोकांना
त्यांच्या त्या अद्वितीय अवर्णनीय महन्मंगल पवित्रेक  कार्याला शतकोटी प्रणाम !
त्यांच्यासाठी महामानव विश्वरत्न 
या पदव्याही किती लहान वाटतात 
कधीकधी वाटते ते जर असते तर 
त्या माझ्या जगदबंधुला मी फक्त एकदा 
कडकडून मिठी मारली असती 
आणि शब्दावाचून माझी भावना व्यक्त केली असती .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

आरंभ नव्याचा

आरंभ नव्याचा
************

हरवले माझे पण कण इवला होऊन 
गिरनारी पहाडी मी जाहलो आनंदघन ॥१

पाठीवरती ओझे ते नव्हते मोठेपणाचे 
चिंता व्यथा काळजीही नव्हते नाव कशाचे ॥२

असे इथलाच जणू मी बहु रे युगा युगांचा 
मज दाखवी ओळख पत्थर पाया खालचा ॥३

वेढून पहाडा होता तो गंध रानाचा ओला 
चिरपरिचित किती अनंत जन्मी हुंगला ॥४

ती वाट कितीदा होतो चढूनी मी उतरलो 
अन शिखरावरती अवधूता त्या भेटलो ॥५

 रे थांब इथेच जीवा हा गाव से मुक्कामाचा 
इथेच पडावा देह घडो आरंभ नव्याचा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कृपा


गिरनार परिक्रमा ३
***************

इवलाली कृपा आकाश होऊन 
माझिया मनात आली ओघळून ॥१
सहज घडले असे जे वाटते 
सहज परि ते कधीच नसते ॥२
विश्वसुत्रधार सांभाळतो भक्ता 
अनन्य शरण  तया पदा येता ॥३
तयालागी असे भक्तांचे व्यसन 
कळू कळू आले संतांचे वचन ॥४
पाहता वळून दिसे त्याच्या खुणा 
घेई उचलून पदोपदी देवराणा ॥५
देता हेतूविन तया प्रेम कणभर 
जहाला देव तो सुखाचा सागर ॥६
अगा विश्वंभरा कृपा सरोवरा 
ठेवी सदोदित मज तुझ्या दारा ॥७
हरखुन भाग्य पाहतो विक्रांत 
तयाच्या प्रेमात सुखाने डोलत ॥८

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

निरोप

निरोप
******

धुणीचा निरोप समिधास आला 
वन्ही धडाडला आकाशात ॥१

वाजे पडघम तुतारी सनई 
मिलनाची घाई बहू झाली ॥२

उधळली फुले रांग तोरणाची 
रंन्ध्र  सुगंधाची घर झाली ॥३

झगमगू आले सप्तरंगी दीप 
अरूपात रूप मावळले ॥४

जरी घडीभर विरह वेदना 
किती जीवघेणा काळ वाटे ॥५

विक्रांत पिकल्या फळा देठ झाला 
पडला राहिला कुणा ठाव  ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

गिरणार परिक्रमा २


गिरनार परिक्रमा २
***************
पायाखाली खडे टोचतच होते 
पाऊल पुढे परी चालतच होते ॥
घेता घेता नाम अपशब्द कधी 
मस्तकात कळ जाता येत होते ॥

नाही कसे म्हणू घडत जे होते 
अजूनही देहासवे नाते घट्ट होते ॥
वेदनांचे सुख या देही होत होते
वेदनांचे फुल देवा तव पदी होते ॥

आणिक नजर खिळली खालती
पावलो पावली  रुप तुझे होते ॥
हजारो सोबती कुणी ते नव्हती 
तूच फक्त चित्ती मज पुरे होते ॥

अशी जगण्याची दावलीस रीत 
अफाट इवले अस्तित्व हे होते ॥
झाली शिकवणी झाली उजळणी 
विक्रांत जगणे किती सोपे होते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...