मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

तमाचे पथिक


तमाचे पथिक
**********
कुठे धन अर्जित कुठे धन अनार्जित
सुखाचे अर्थ इथे कुणा न कळतात ॥१
ते संगीतात बेहोश होवून जातात
परी टेबला खालून सहज पैसे घेतात ॥२
ते समाजाची रात्रंदिन सेवा करतात 
परी टक्केवारीत हाथ ना आखडतात ॥३
त्याचे तर नाव थोर तो कैवारी दिनाचा 
किती पण आग्रह तयाचा तो पावतीचा ॥४
तो भक्त महान टेबलावरती भगवान 
बुद्ध महावीर कृष्ण व्यर्थंची संविधान ॥५
नाही हात जळत त्याचे नाही पापे फळतम 
नाही मन तळमळत  कशासही घाबरत ॥६
जाऊनिया देवाला ते सहज टक्का देतात 
हुंडीमध्ये पापाचे परिमार्जनच करतात ॥७
घनघोर होवून पूजा तो देव जागत नाही 
खरंतर त्यांनाही काही फरक पडत नाही ॥८
दार बंद घट्ट मनाचे तिथे काज ना प्रकाशाचे
अंधारात येती जाती पथिक अभागी तमाचे ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .
 

भेट

भेट
*****
माझे शब्द तुला कळतीलच असे नाही 
माझे चित्र तुला उमजतीलच असे नाही 
त्यांनी फारसा फरक पडत नाही 
पण मग तेवढे एक काम कर 
स्वल्पविरामातील क्षणात 
दोन ओळी मधील अंतरात 
जरा वेळ थांब मला आठव 
अन् सापडलेला भाव मनात साठव 
दोन किनाऱ्यामधील सेतू 
तो कसलाही असू देत 
माती सिमेंट वाळू लाकूड लोखंड 
तो ओलांडणेच महत्त्वाचे असते 
किनारे मिळणे महत्त्वाचे नसते 
किनारी कधी मिळतच नसतात 
नाही का ?
पण सेतू ओलांडणे आपल्या हातात असते 
शब्द निरर्थ आहेत न कळू देत न वळू देत 
मी शब्दात असेलही वा नसेलही 
पण शब्द शून्यत्वाच्या अवकाशात 
नक्की भेटेल तुला
कारण तिथे तिसरे कोणीच असणार नाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!





दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
*******************

सर्व मित्र-मैत्रिणींना ,आप्त, स्नेही, शुभचिंतकांना डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे आणि परिवार यांच्या कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

हा सुखाचा प्रवास 
राहो अविरत वाहत
आनंदाचे दीप उजळो 
सदैव तुमच्या हृदयात ॥१

स्वकर्माची वाट दिसो
तुम्हा सदैव प्रशस्त 
कर्तव्याच्या आकाशात 
रहा दृढ ध्रुवा गत ॥२

देव देश अन् धर्म 
हेच आपले रे इष्ट 
कवडी दमडीसाठी 
कुणी न व्हावे भ्रष्ट ॥३

देई शुभेच्छा विक्रांत 
नांदा सदैव सौख्यात 
दत्त दावो तुम्हा लागी
सदा प्रकाशाची वाट ॥

*****🪔
        ******🪔
                  ******🪔






शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

व्यथा सांगताना


व्यथा सांगताना
************

एक एक मनाचा पट उलगडतांना 
तुला मी माझ्या व्यथा सांगताना ॥

वेदनेचा मोहर तुझ्यात डवरून 
बरसलीस तू जणू बकुळ होऊन ॥

मग ओंजळीत मी तया घेऊन 
चुंबले हलकेच श्वास माझा देऊन ॥

उतरलीस तू माझ्या कणाकणात 
बहरले दुःख माझे गंधित होऊन ॥

अन् रेशमी त्या तुझ्या सावलीत 
हरवत गेलो मी माझे अस्तित्व ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

देई



देई
****

दारी आल्या भक्ता घेई पदरासी 
देई सुख त्यांसी 
दयाघना ॥१

रंजले गांजले कामना दाटले 
धुर्त कुणी भोळे 
तुझेच हे ॥२

असू देत कामी असू देत लोभी 
परी आले पदी 
शरण ते ॥३

देई घोटभर देई घासभर
द्वैत दूर कर 
सकलांचे ॥४

विक्रांत मनीचे पुसून मागणे 
मर्जीने जगणे
घडो तुझ्या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

मान्य आहे मला (गुरुद्वादशी)

मान्य आहे मला (गुरुद्वादशी)
***********

ठीक आहे महाराज 
माझे येणे आणि जाणे 
सारे तुझे ठरवणे 
मान्य आहे मला

तुझी कृष्णा तुझा घाट 
तुझ्या तीरावरील पहाट 
नाही माझ्या नशिबात 
मान्य आहे मला 

तुझी भूपाळी काकड आरती 
तुझी पालखी तुझी शेजारती  
नच पाहिल मी दृष्टी 
मान्य आहे मला 

तुझा जप करीत करीत 
चालणे प्रदक्षणा घालीत 
नाही होणार कदाचित 
मान्य आहे मला 

तुझे प्रिय भक्तगण
त्यांच्या सहवासाचे क्षण
नाही भेटणार भगवन
मान्य आहे मला 

कारण मी आहे जाणून 
नाही चुकणार तुझे नियोजन 
मी लक्ष्य योजना करून 
मान्य आहे मला

तुझी इच्छा असेल तेव्हा 
नेशील मजला ओढून 
किंवा देशील सोडून 
मान्य आहे मला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

स्वप्न

स्वप्न
*****

हे तुझे भेटणे झाली एक गाणे 
मनी पाझरले शरद चांदणे ॥१

स्निग्ध मुग्ध मंद नित्य शितलसे 
तृष्णेला तृष्णेचे जिथे लागे पिसे ॥२

पुन्हा पुन्हा मन होवून चकित 
सांगते स्वतःला स्वप्न हे खचित ॥३

होते  भाग्य कधी असे मेहरबान 
पुण्य येथे फळाला लाभते वरदान ॥४

मागण्याचा माझ्या साऱ्या अंत झाला 
याहून मधू काही न भेटले जीवाला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...