गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

ना.धो.महानोर

ना.धो. महानोरांची गाणी
******************

ही गाणी 
पावसाची अन् रानाची 
गर्भार मातीच्या 
सृजनत्वाची 

तिच्यासारखी 
रुजलेली फुटलेली 
फाडीत अंतर 
उफाळलेली 

रानाचे चैतन्य 
रानाच्या भाषेत 
रानाच्या गंधात 
घेऊन आलेली 

ओलीचिंब झालेली 
रानाच्या गंधाने 
दरवळणारी
उत्कतेने भारावली 

ही गाणी
गावाचे दैन्य 
विद्ध शब्दात 
मांडणारी

हृदयाला भिडणारी 
काळीज पोखरणारी 
मातीच्या कुशीत 
शिरून रडणारी 

ही गाणी जेव्हा 
मी वाचली 
तेव्हा माझी नाळ 
माझ्याशी कुजबजली 
म्हणाली 

इथूनच
यायचे असते
रुजून 
या मातीचे अन् आकाशाचे
सत्व घेवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

गरज


गरज
*****
माझिया शब्दाची तुला न गरज 
कळतेय मज दत्तात्रेय  ॥१
लिहिणे हे शब्द माझीच गरज 
कळतेय मज अवधूता ॥२
आता सरू आली शब्दाची ही रास 
लिहिण्याची आस पुन्हा पुन्हा ॥३
वाटते सोडावी आता ही लेखणी 
कृपेची मागणी अर्थशून्य ॥४
मातीच्या फुलाला गंध तो कुठला 
दोष त्या कुलाला मग कैसा ॥५
मिटून ठेवतो तुझ्या पायी वही 
फार दूर नाही होळी आता ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सोमवार, ३१ जुलै, २०२३

प्रेम काय असते

प्रेम काय असते
************
शब्दां वाचून शब्दांनी
बोलणे प्रेम असते
पाहिल्यापासून डोळ्यांनी 
पाहणे प्रेम असते ॥
असू देत क्षणभर 
असू देत कणभर 
परिस स्पर्श जीवनाला 
अरे तो होणे असते ॥
ते कुठे काय मागते 
नि कुठे काय देते 
आकाशच जलाशयी
उमटणे ते असते ॥
प्रेम भेटणे जीवनात 
जीवनाचे ऋण असते 
या मनाने त्या मनाची 
आरती करणे असते ॥
भाज्य भजन भाजक 
हे द्वैत तिथे नसते 
आपल्या वाचून आपले
अस्तित्व एक ते असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, ३० जुलै, २०२३

मज तारियले

मज तारतसे
********
माझं तारतसे पुन्हा पुन्हा स्वामी 
येवसे धावुनी 
हरघडी ॥

आठवता तया  ठाके होत दत्त 
कडेवर घेत 
नेई पार ॥

कुठली पुण्याई मज ना आठवते 
मन हे भरते 
तया कृपे ॥
 
करतो स्मरण हीच त्यांची सेवा 
स्वीकारली देवा 
झालो धन्य ॥

राहू दे ऋणात तुझ्या सदोदित 
वसा हृदयात 
प्रेम भरे ॥

विक्रांत जगात अंध हा चालतो
परी सांभाळतो 
स्वामी राया ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, २९ जुलै, २०२३

श्रावण

श्रावण
*****
मनातला ओला श्रावण 
पंख्या खाली गेला वाळत
किती टाळले भिजायचे 
वितभर छत्री डोई पकडत 

फुटपाथवर पाणी चढले
कुठल्या कुठल्या नाल्यातले 
सारे वेणी फुले हारवाले
कधीचेच ते गायब झाले 

कधी कुठली ट्रेन भेटणार 
मस्टरला वा खाडा पडणार
तो तिचा अन् डबा कुठला 
चढण्याचीच जर मारामार 

रंग गंध अरे भान कसले  
ओले दमट श्वास कोंडले 
डोळ्या मधले चित्र तिचे
धावपळीत जणू ओघळले 

स्वप्नांचेच हे परी असे शहर
स्वप्न जगते मुठीत घेवून 
दिसता ती थकली भिजली
वादळ झेलतो वादळ होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘









दत्त दत्त शब्द


दत्त दत्त शब्द 
**********
दत्त दत्त शब्द आहे निनादत
कडे कपारीत 
सह्याद्रीच्या ॥
दत्त दत्त शब्द वदे भीमा कृष्णा 
पंचगंगा वेणा 
या भूमीत ॥
 दत्त दत्त शब्द गुंजे गिरनारी
वाडी औदुंबरी
गाणगापूरी ॥
दत्त पाखरतो अवघा हा देश 
देऊन आदेश 
नाथपंथी ॥
दत्त दत्त शब्द असे याओठात 
धुन दत्त दत्त 
अंतरात ॥
दत्त जाणिवेत हरावा विक्रांत
होवुनिया सार्थ 
जन्म सारा ॥
.🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

दत्ता राही

दत्ता राही
+*+*+

दत्ता राहि रे माझिया मनात 
कृपा बरसत रात्रंदिन ॥
दत्ता वस रे तू माझीया ओठात 
असता वाहत देहराशी ॥
दत्ता ठस रे माझिया चित्तात 
जागृत स्वप्नात सुषूप्तीत ॥
दत्ता देई रे तू हातात हात 
सर्व संकटात अहर्निशी ॥
 दत्ता राही रे तू सदा जीवनात 
सुखात  दुःखात क्षणोक्षणी ॥
दत्ता होई रे तू सर्वस्वच माझे
काज जगण्याचे जगतात ॥
दत्ता मागू काय तुजलागी आता
देई रे विक्रांता नाव तुझे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...