गुरुवार, २० जुलै, २०२३

सिंधू संगम


सिंधू संगम
********

वाहते सरिता  दुथडी भरून
हिरवे पण का गेले हरवून ॥

वृक्ष तेथ नच झुडप इवले
गालबोट जणू रुपास लागले ॥

आणिक संगम विषण्ण भासतो 
निळा रंग का माती हरवतो ॥

विशाल अद्भुत पहाड दिसती
करूण विदीर्ण निष्प्राण गमती॥

शापित असे का भूमी ही कुठली 
लाभून वैभव उजाड राहीली  ॥

प्राक्तनी सिंधूच्या सदा असे व्यथा
त्याची असे काय आरंभ ही कथा  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

 

बुधवार, १९ जुलै, २०२३

बोलावू नये

बोलावू नये
*********

असे मन  वेड्यागत .
कधी कुणा देऊ नये
मृत माळरानावर 
झाड वृथा लावू नये ॥१

मोजताना तिथी कधी
देहभान भुलू नये
अवसेचे जीणे भाळी 
पुनवेला घेऊ नये ॥२

टिटवेचे गाणं तिथे 
पुन्हा पुन्हा जाऊ नये
रानभरी होऊनिया
मोडुनिया पडू नये ॥३

विखुरले खडे गोटे
मोती त्यास मानू नये
तया खाली विचू काटे 
दंश उगा झेलू नये ॥४

येता कुणी दारावरी
नजर जडावू नये
जाणता अजाणताही
रेषेला ओलांडू नये ॥५

डोळियात जाता बोटे
स्वतःला रागावू नये
झाल्या चुका होऊ दे गे
पुन्हा तशा घडू नये ॥६

तुझे गाणे चांदण्याचे 
पथावर पडू नये 
कोंदनात पडो हिरा 
जन्म गारा होऊ नये ॥ ७

जाणतो विक्रांत जग
कानाडोळा करू नये
दगडाचे हीय होवो 
गेलेल्या बोलावू नये ॥ ८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘




मंगळवार, १८ जुलै, २०२३

सुखाची वाट

सुखाची वाट
*********
सुखाची ही वाट चाललो आवडी 
धरूनिया गोडी दत्ता तुझी ॥१

झाले तुझे सुख पावलो पावली 
अदृश्य सावली सर्वकाळ ॥२

मुखी होते नाम उरी भक्तीभाव 
आनंदाचा गाव देह झाला ॥३

सरले मागणे धावणे रडणे 
केवळ भेटणे उरे मागे ॥४

पातलो शिखर जाहले दर्शन 
संकल्प उत्तीर्ण कृपे तुझ्या ॥५

चैतन्य धबाबा कोसळले देहा 
सहजच स्वाहा मन झाले ॥६

विक्रांता घडली गिरनार वारी 
दत्तकृपा सारी अरे मी नाही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सोमवार, १७ जुलै, २०२३

जीवन


जीवन
*****
जीवन हा शोध असतो 
सदैव सुखाचा सदैव स्वतःचा 
अन् कळत नकळत चाललेला 
एक प्रयत्न आत्मविलोपनाचा 

नेणीवेतून उमटलेला 
देहाचा आकार 
मनाचा व्यापार 
पोटाच्या अनुषंगाने 
रोज घडणारा 
जगण्याचा व्यवहार 
याची सांगड घालताना 
जुळत नाहीत केव्हाच 
काही अदृश्य दुवे 

अतृप्तीचा पाझर 
ठिपकत असतो अस्तित्वात 
कुठेतरी खोलवर 
आणि मी माझे पणाच्या  
खुंटीवर फिरते जाणीव 
गरगर 

संताच्या शिकवणुकीचे 
रवंथ करीत 
कामनांचे शेण 
जगभर पसरवत 
जगतात सारे 
स्वतः ला धार्मिक म्हणवत

आपल्या अस्वस्थतेला 
पूजेत लपवत 
माळेत अडकवत 
जगण्याचा भ्रष्टाचार 
नाईलाज म्हणवत 
आपली असहायता 
देणगीत दडवत 
दानाने झाकत 
आपणच आपले 
डोळे झाकत 
अन् नग्नता नाकारत.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, १६ जुलै, २०२३

हिरो

हिरो
*****
इवलासा गर्व इवल्या देहात 
गाव पेटवत निघे कुणी ॥ १
म्हणे मी रे खरा सेवक जनाचा 
अडल्या कामाचा वाहवता ॥2
चोरी करे त्याची मान पकडीन 
काढेन ओकून आठ आणे ॥३
बाकी महाचोर कोट्यावधी थोर 
याची तिथवर पोच नाही ॥४
बिले बिलावर कोणी फाडतात 
खिसे कापतात साळसूद ॥५
परी त्यांची कर्म घडे नियमात 
वध ही होतात लिहूनिया ॥
तिथे हतबल हिरो खरा खोटा 
पिळतो शेपटा बैलाच्याच ॥७
कुणी म्हणतात असे हेकेखोर 
मोर चोरावर चलाख हा ॥८
कोणी म्हणतात मूर्ख हा अडेल 
जीव घालवेल हकनाक ॥९
अवघा विचित्र दत्ताचा बाजार 
साळसूद चोर कळू न ये ॥१०
विक्रांत कशात जरी काही नाही 
ओढूनिया नेई पूर्व कर्म ॥ ११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, १५ जुलै, २०२३

यमुनातीरी

यमुनातीरी
*********

शब्दाविण शब्दांचे अर्थ मला कळले 
आज सखे मला मी अंबरी पाहिले ॥

पाहताच तया मी माझे नच उरले
होय सावळ बाधा बावरी मी जाहले ॥

काय सांगू तुजला काय कैसे घडले 
नुरले मन माझे तयाचे की जाहले ॥

काय कुठली सांज भलते मज सुचले 
गेले यमुना तीरी पछाडून गे आले ॥

एकटाच तो उगा पाय जळी सोडले 
ओठावरी मुरली सुर दैवी भिजले ॥

तन मन माझे हे सप्तसूर जाहले
भारावले अशी मी  दशदिशात भरले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

पाप आणि पुण्य


पाप आणि पुण्य 
***********
हातामध्ये हात
घालुनिया सदा
चालते जगता 
पाप-पुण्य ॥ १

काय पाप पुण्य 
ठरवती जन 
आपली पाहून
सोय इथे ॥ २॥

करतांना चोरी 
सापडे तो चोर 
साव ते इतर 
शुभ्र वस्त्री ॥३ ॥

एकच ते पाप
सांगतात संत 
परपीड़ा फक्त 
असे घोर ॥ ४ ॥

बाकी रचलेल्या 
साऱ्या नीतिकथा
नरकाच्या बाता
भयावह ॥ ५

तरी करी कृती
परपिडे विना 
सांभाळूनी मना 
आपुलिया ॥ ६

विक्रांत शरण
विनवितो दत्ता 
दावी मज आता
याची वाटा ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘









वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...