शनिवार, ८ एप्रिल, २०२३

कुठे जाण्यासाठी



कुठे जाण्यासाठी
**************

पुन्हा पुन्हा तोच डंख खोल मना होत आहे 
देहाच्या या कवचात जीव गुदमरत आहे ॥१
 
विकारांचे उठतात घोंगावती लोंढे मोठे 
पालापाचोळ्या गत हे मन वाहत आहे ॥२

तेच तेच व्यर्थ भोग त्याच त्याच रिंगणात 
गुलामसे जीवन हे तसेच फिरत आहे ॥३

खिळलेले रूपा डोळे रंगी रममान आहे 
रात्रीच्या या अंधारास उगा घाबरत आहे ॥४

तेच स्पर्श रुळलेले त्याच मऊ पायवाटे 
काट्यांचीच स्मृती उरी का बरे वाहत आहे ॥५

मग्न हे सुरात कान होत मदहोश असे 
अनित्यतेचा आक्रोश का खोल स्मरत आहे ॥६

वेटाळून गंध किती जीवास मोहवती हे 
पण वारा सरणाचा उर दडपित आहे ॥७

अन मश्गुल रसात शब्दात नाचते जिव्हा 
ते शून्य पार्थिवाचे का बळे विसरत आहे ॥८

तोच तेच स्वप्न अन कुठल्या अनाम स्मृती
कुठे जाण्यासाठी जीव हा तळमळत आहे ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

दर्शन

दर्शन
******
स्वप्नी मज दिसले 
स्वामीजी आलेले 
कधी तया पाहिले 
होते मी डोळा ॥
निर्मळ कांती 
डोळ्यात शांती 
सुंदरशी मूर्ती 
मन मोहक ॥
वदले नच  काही 
सुचवले वा काही 
संभाषण तेही 
जाहले ना ॥
घडे दृष्टी भेट 
सुख होत त्यात 
आनंद हृदयात 
ओसंडला ॥
आणले जयांनी 
हातास धरूनी 
सोहम साधनी
कृपामय ॥
तयाचे दर्शन 
गेले सुखावून 
होय शुभ शकुन 
चैत्र नवरात्री ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

हनुमान स्मरा (सवाया )


हनुमान स्मरा (सवाया )
******
महाबळी ब्रह्मचारी 
गदा जया खांद्यावरी 
करतो शत्रूचा नि:पात 
तो हनुमान स्मरा ॥

राम राम ज्याच्या मुखी 
राम भक्ता सदा राखी 
होतो दीना तारणहार 
तो हनुमान स्मरा ॥

जया अंगी अतुल बळ 
सहज उपटे द्रोणाचळ  
शक्ती युक्तीचा प्रनायक 
तो हनुमान स्मरा ॥

लंका जाळी दैत्य मारी 
काम क्रोध लोभ हारी 
साधकां जो आदर्श 
तो हनुमान स्मरा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

ज्ञानदेवांचे आकाश

ज्ञानदेवांचे आकाश
***************
तुझ्या शब्दाच्या या अपार आकाशात 
माझ्या इवल्या अश्या पंखांनी उडतांना ।
मी स्तिमित होतो पुनः पुन्हा ज्ञानदेवा 
विस्तारणारे ते क्षितिज विश्व पाहतांना ॥१

तुझ्या प्रेमप्रकाशात नखशिखात नाहतांना
अन तुझा पैस मनी विस्तीर्ण आठवतांना ।
होतो वेडा उखिताच जणू इथे चालतांना 
विसरतो सार सारेच शब्द शब्द वेचतांना ॥२

मान्य मजला अजूनही नाही येत रे 
मनाची या  नीट आराणूक करतांना ।
चंद्रकलेगत पसरले ज्ञानामृतकण तुझे 
चकोर तलग्यागत मवाळपणे वेचतांना ॥३

पण शब्द उपमा कविते सोबत जाणवतो
तू हळूच माझ्या मनात प्रवेश करतांना ।
तुझ्या प्रेमाने अन औंदर्याने भारलेले मन
सहज शांत होते  कुशीत तव निजतांना ॥४

त माऊली माझी तुच जीवाचा या विसावा 
तुझ्यासाठी जन्मा यावा मजला ज्ञानघना ।
जाणतो मी जन्म कोटी लागतील ओलांडया 
तुझे दर्शन ज्ञान सिंचन होण्यास रे या मना ॥५

तोवरी घडू दे रे हीच सेवा पुन्हा पुन्हा 
ग्रंथ ज्ञानेश्वरी नित्य मिळावा पारायणा  ।
शब्दोशब्दी वाचीत तुजला मनी घेत उगाणा
तुझ्या भेटीसाठी मी तुलाच करील प्रार्थना ॥६

जरी खुरट्या पंखांचे लेकरू विक्रांत हे
देई मज बळ माये कौतुकात हिंडतांना ।
कुर्मदृष्टी ठेवी स्निग्ध बाळ दूर वाढतांना
सदा सदा राख इया जगी मज बुडतांना ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

तुझे मनी



तुझे मनी

******

दत्ता तुझे मनी असे सांग काय 

सरले उपाय सारे माझे ॥१

जडावला देह बधिरसे मन 

अवघे व्यापून दैन्य राही ॥२

मज भक्तीविन जरी नको काही 

कंजूष तरीही का तू होशी ॥३

असू दे विचार असू दे विकार 

भार तुझ्यावर सारा माझा ॥४

असे जरा मृत्यू उभे माथ्यावर 

तव पायावर ठेवियले  ॥५

विक्रांत आवघा जहाला स्वीकार 

सोडून व्यापार चालवला ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, २ एप्रिल, २०२३

कर दत्त



कर दत्त
*******

तू बोलव 
मी येईल 
तू टाळ 
मी जाईल 

तू हास 
मी हसेल 
तू रूस 
मी रडेल 

तू भिजव 
मी बहरेल 
तू सुकव
 मी कोमेजल 

तू जगव 
मी जगेल 
तू तुडव
मी मरेल 

 तू हवाय 
मला सकळ
तुझ्या विना 
शून्य सकळ 

तू दत्त 
मी विक्रांत 
कर दत्त 
हो विक्रांत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १ एप्रिल, २०२३

साद घालते

साद घालते
*********
लोभ हाच रे मजलागी 
सदा स्मरावे तुज लागी
घननिळ या स्वप्नी माझ्या 
सदा राहू दे मज जागी 

हास जरासा डोळ्यातूनी 
काया जाऊ दे मोहरूनी 
तुझ्या कटाक्षासाठी एका 
जन्म घेईल मी फिरूनी 

घेशील कधी जवळ तू  
मयूर पंख देशील तू 
या आशेवर वेड्या मी रे 
देहापार या नेशील तू 

जग म्हणू दे खुळी झाले 
लोकलाज मी विसरले 
झाल्यावाचुनी स्पर्श तुझा 
नकोच जीणे रे इथले 

मी न गोकुळी वृंदावनी 
मी न मथुरा त्या कौडीन्यी
वाटेवरती जन्माच्या या 
साद घालते तव दुरुनी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...