गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

असणे

असणे
*****

गर्द आभाळागत 
तुझे आर्द्र डोळे 
गहिवरलेले 
कोसळण्या

ओठ कडावर 
हास्य गहिरे 
होते उमटले 
जीवघेणे

शब्द उच्चार
काही उमटले
बोल तरंगले 
हृदयात 

ते क्षण काही 
नव्हतो मीही 
नव्हतीस तू ही 
अस्तित्वात 

शिव ही नव्हता
नव्हती शक्ती 
असणे जगती
 होते फक्त

असण्याच्या 
त्या काठावरती 
अंधुक सृष्टी 
जाणीवेची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

जीवन

जीवन
*****
सर्वच गोष्टींना शेवट असतो 
सुंदर असो वाईट असो 
प्रिय असो अप्रिय असो 
रामायण ही संपते कधी 
महाभारतही संपते 
औरंग्या मरतो कधी 
जातो पापी अफजलही 
हृदयस्थ छत्रपती ही 
जातात जगत सोडूनी
ज्ञानदेव तुकाराम 
नामदेवादी संत मंडळी 
रामदास ब्रह्मचैतन्य 
संपवतात यात्रा आपली 
****
होय विक्रांत तुझीही 
यात्रा आता संपत आली 
एकदा चित्र पुसल्यावर 
ते चांगले होते की वाईट 
कोणालाच फरक पडत नाही 
त्या चित्रालाही 
ते चितारलें जाणे 
ते मिरवणे 
आणि पुसले जाणे 
या कणभर कालक्रमात 
घडते जगणे 
बस तेवढेच 
तेच असते असणे 
त्या अगोदर अन नंतरही 
असतो कागद असतो फळा 
असते पेन्सिल असतो खडू 
असण्यावरतीच हे असणे अवतरते 
असणे होऊन ही नसणे होते
ही निरंतराची 
बुद्धीच्या कक्षेत न येणारी 
व्यापकता पाहता पाहता 
सोडून देते बुद्धी आपले शोधणे 
आणि होते शरणागत 
प्राप्त जीवनाला 
सोडून मोकळे हात 
करून मोकळे अस्तित्व 
अन् मग जीवन 
जगते  जीवन
होवून जीवन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

संताघरी


संता घरी
********
संता घरी धन नामाचे निधान 
घ्या रे घ्या मागून लाजू नका ॥१

संत वाटतात प्रेम श्रीहरीचे 
किती मागायचे मागा तुम्ही ॥२

हाका मारती ते देण्यास बैसले 
धावा रे धावा रे धावा तिथे ॥३

सोन्याची दगडे हिरा काचखडे 
मातीचे तुकडे मागू नका ॥४

कीर्तीची क्षणिक फुले सुकणारी 
यश ही भाकरी दुसऱ्याची ॥५

असे व्यर्थ धन उगाच मागून 
बघा रे नुकसान करू नका ॥६

विक्रांता दावली चैतन्यांनी वाट 
आता माझा थाट पुसू नका ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

संत देतात

संत देतात
*********

संत देतात शाश्वत 
वेडे तया न पाहत 
जया हाती भगवंत 
तया भाजी मागतात 

देव मिळावा जीवाला 
अशी वृत्ती का न व्हावी 
आर्या वर्यात जन्मुन 
ती कंगाल का राहावी 

संतकृपा वर्षावात 
लोक अंग चोरतात 
भिजा भिजा रे वेड्यानो 
जन्म असा नशिबात

व्हा रे संतांचे विनीत 
जगा दत्ताच्या कृपेत 
मागा तया भगवंत 
आणि पदांची संगत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

भाडेकरू


भाडेकरू
*******

जैसा भाडेकरू मालक घराचा 
म्हणून मिरवे नसून स्वतःचा

 तैसा देहधारी देह म्हणे माझा 
असून काळाचा फक्त वापराचा

 येणे तो नियंता कायदा दंडेल 
पायरी तुजला तुझी दाखवील 

रहावे स्मरण याचेच सतत 
मग तो नुरेल क्लेश या मनात

 घर हे राहाया प्रभूला स्मराया 
चैतन्य सांगती विक्रांत रमाया .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

संत शरण


संत शरण
*********
जावे संताला शरण । तेच करती निदान ।।

भवरोग ओळखून । करतात निवारण ।।

काय कुणाची चुकले । दोष कुठे ते मुरले ।।

नीट पाहाती कृपेने । बरे करती साधने ।।

कोण मोहाने दाटले । कुणा कामने गिळले ।।

कोण क्रोधात जळले । मद मत्सरे पिडले ।।

अति कुशल नेमके । मधु नीटसं मोजके ।।

देती पथ्य आवडते । व्याधी समूळ ती जाते ।।

विक्रांत संताचा ऋणी।  दवा दिली रे बांधुनि।।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

मरण स्मरण


मरण स्मरण
**********

घडे मरण स्मरण होते विरागी हे मन
येता विरक्ती दाटून ठके पाप आचरण 

पाप थांबता थांबता आत जागे सद्वासना 
शुद्ध होताच वासना येई परमार्थ मना

येता परमार्थ ध्यानी मन लागते रे नामी 
मन लागताच नामी होय भगवंत प्रेमी 

प्रेम भगवंती आले अनुसंधानी रमले 
नाम रंगात भिजले चित्त शुद्धतम झाले 

चित्त शुद्धी ती घडता मना साधे एकाग्रता 
मन एकाग्रे जडता काम सरले जगता

ब्रहमचैतन्य वचन ठेवा मरण स्मरण 
हीच पायरी प्रथम असे परमार्थ सोपान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...