बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

पैसा

पैसा
*****
हे जग व्यवहाराचे पैशाचे अन कमवायचे 
माझ्या काय कामाचे उगाच ओझे वाहायचे 

पैशात सुख नसते रे पैशात प्रेम नसते 
पैसा हे वेड असते भुतागत मागे लागते 

पाच पन्नास वर्षाचे असते आयुष्य माणसाचे
यात वाया घालवायचे हे तो लक्षण मूर्खपणाचे 

फुगू देत आकडे बँकेचे ढिग जमो त्या कागदाचे 
खुळे स्वप्न गाडी बंगल्याचे पंथ अंध हे निरर्थाचे

प्रेम भरू दे कणाकणात आनंद उसळो हृदयात
गाणे उमटावे ओठात हेच घडावे फक्त जीवनात 

पोटा कपडयासाठी अन कमवावे रे छतासाठी 
पैसे एवढेच कुणी काही जमवावे जगण्यासाठी

बांधूनी हा पैसा उरावर कुणास जाता येत नाही
जग आंधळे डोळा असून त्या कधी दिसत नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

बुडालो नाही

नाही
****

हजारदा डोळ्यात तुझ्या 
बुडूनही मी बुडलो नाही 
किती गोंदले तुज देहावर 
चंद्र सावळा झालो नाही 

कधी हसता खळाळून तू 
भिजलो परी फुटलो नाही 
किती झेलले तुषार हाती 
कड्यावर कोसळलो नाही 

ती नाव कागदी होती जरी 
कधी वादळा घाबरलो नाही 
पडता थेंब तव डोळ्यातील 
पुन्हा कधीच भरारलो नाही 

घेऊन बाजार खिशात फुलांचा 
उधळण्यास कचरलो नाही 
फुले जुईची तुझी इवली 
वेचण्या परी धजावलो नाही 

हात तव जरी देण्यास उतावीळ
झोळी घेऊन मी आलो नाही 
जरी राहिलो आयुष्य भिकारी  
तुझ्याविना कुणा विकलो नाही 

म्हणती जग हे विक्रांत दिवाना 
कुणा विचारत बसलो नाही 
मी माझ्यातच मस्त विरक्त 
स्वप्न तुझे पण विसरलो नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

पालव




पालव
******

भक्तीचा भिकारी दत्ता मी रे बरा 
नको देऊ मला मोठेपणा ॥१

जाणतो मी माझे मूल्य ते इवले 
तार्‍यांनी भरले आभाळ हे ॥२

प्रत्येक पत्थर असे अवनीचा 
भाव हा मनाचा तुझ्यासाठी ॥३

तुच तुझे शब्द देऊनिया ओठी 
धरलेस हाती कौतुकाने ॥४

आता दूर सार शब्दांचे पालव 
रूप ते दाखव शब्दातीत ॥५

याच क्षणासाठी जन्म कोटी कोटी 
विक्रांत जगती घेईल रे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
*********
आलीस तू उधळीत हसू 
मेघ सावळा झालीस तू 
माझ्यासाठी पण कधीच 
नव्हता हा गं वर्षा ऋतु 

लखलख डोळे केस मखमली 
जरी सावरत बोललीस तू
त्या न गावचा होऊन उगा
मज थांबवले मी जाता ऊतू

 मन हे वैरी आपले असते 
स्वप्न दावते भलते सलते 
वारा पिऊन उगाच फिरते 
रित जगाची तया न कळते

जाणून मनीचे व्यर्थ खेळणे
दिले सार्थ त्या काही करणे
मान वळवली वही उघडली 
जगतासाठी लिहिली कवणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

पुराणातील काळ मींमासा

पुराणातील काळ मींमासा
*******************:
आणखी 1 लहानपणापासून मनात येणारी शंका. हरितालिकेच्या कहाणीत उल्लेख आहे की पार्वतीमातेने भगवान शंकरांसाठी 
64,000 वर्षे तप केलै. लहानपणी शंका यायची की इतकी वर्ष कशी? का तेव्हाचा life span आतापेक्षा जास्ती होते? 🙏🙏

उत्तर

ही गोष्ट किंवा इतर अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामध्ये तो राजा काही हजार वर्ष राज्य करतो असे लिहिलेले आहे .उदा.कार्तविर्य राजा वगैरे.  सदर कथा ज्ञानी मुनी किंवा ऋषींनी लिहिलेल्या आहेत असे मानले तरी ते इतकी वर्ष का लिहतात ते कळायला मार्ग नाही आणि आपल्या हिशोबाने हि वर्ष म्हणजे काहीच्या काहीच वाटतात तर मग हे लिहिणारे एक प्रकारचे स्वप्नरंजन तर करत नाहीत ? किंवा कुठलीही गोष्ट अंडरलाईन करायची असेल किंवा बोल्र्ड करायची असेल किंवा ती ठसवायची असेल तर तिला मुद्दाम चढवून वाढवून सांगितले जाते .ती पद्धत तर वापरली जात नाही  ना असे वाटते 

जे कोणी चार युगांची हिंदू धर्मातील धारणा मान्य करतात त्यांना तर माहीत असेल सत्य युगामध्ये मनुष्याचे आयुष्य एक लाख वर्ष होते. त्रेता युगामध्ये मनुष्याच्या आयुष्य दहा हजार वर्षे होते द्वापार युगामध्ये मनुष्य हजार वर्षे जगायचा आणि कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्य फक्त शंभर वर्ष आहे.आणि शिवपार्वती हे तर सत्य युगाच्या ही अगोदरचे आहेत त्यामुळे ६४००० वर्ष हा कालावधी तसा लहान असावा .आणि  अमरत्वा पुढे ६४०००  म्हणजे तर किती लहान आकडा आहे

वैज्ञानिक आधार शोधायला गेलो तर. . 
 जयंत नारळीकर यांच्या कथा ज्यांनी वाचल्या असतील त्यांना डायमेन्शनची थेअरी माहीत असेल मराठीत डायमेन्शनला मिती असे म्हणतात त्या थेअरी प्रमाणे एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मिति अस्तित्वात असू शकतात परंतु त्या एका मितितून दुसऱ्या मितिमध्ये प्रवेश करणे साधारणपणे शक्य नसते  (परंतु काही विशेष लोकांना काही विशिष्ट द्वारामधून किंवा वार्म होल मधून मिति  क्रॉस करायची परवानगी असावी..)त्यामुळे असे अनेक विश्व या पृथ्वीतलावर अस्तित्वात असणे शक्य आहे. तर प्रत्येक डायमेन्शन मधील काळ हे परिमाण वेगळं असू शकतं किंवा असावे ..त्याचे स्पष्ट उदाहरण श्रीकृष्णाचे बंधू बलराम आणि त्याची पत्नी रेवती यांच्या विवाहाला लागू होते रेवतीचा पिता रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाकडे  योग्य वराची चौकशी करायला  गेला होता परंतु तेथे तो काही काळ थांबल्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये पृथ्वीवरील शेकडो वर्ष उलटून गेले होते व त्यामुळे त्या काळातील एकही वर रेवतीसाठी जिवंत राहिला नव्हता. ब्रह्मदेवाने तिच्या पित्याला पृथ्वीवर परत पाठवले व बलराम सध्या तिच्या साठी सर्वोत्तम वर आहे असे सांगितले.


या थेअरी वरील कालगणनेला पाठिंबा देतात या कालगणनेच समर्थन करतात . 
अन्यथा हे
मनावर ठसवण्यासाठी वाढवलेली वर्ष.असे मानणेआणि आपल्याला हवा तो चांगला त्यातील अर्थ काढणे हे ही ठिक.

डॉ.विक्रांत तिकोणे


शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

गणेश जन्म रहस्य

गणेश जन्म रहस्य.
डॉ. विक्रांत तिकोणे
**************
श्री गणपतीचा जन्म श्री भगवती पार्वती मातेच्या अंगावरील मळापासून झाला आहे, असे पुराणा मध्ये लिहिले आहे .असे ऐकवून कुणी म्हणतात, की एवढा मळ मातेच्या अंगावर होता की काय ? आणि एक प्रकारची  टर  उडवली जाते  या गोष्टीला हसले जाते. तसेच भगवान शंकरांना सर्व ज्ञानी जगतपित्याला हा आपला पुत्र  आहे किंवा तो पार्वतीपासून झालेला मानसपुत्र समोर आहे हे  पण  कसे कळत नाही याबाबतही दुसरी शंका घेतले जाते. तिसरी शंका म्हणजे इतक्या लहान मुलाचा निर्दयपणे वध करणारा परमेश्वर भगवान कसा असू शकेल ? असे विचारले जाते. ज्या वेळेला भगवान शंकराकडून  गणपतीला हत्तीचे डोके आणून लावले जाते त्या वेळी हत्तीच्या डोक्याची आणि मनुष्याच्या देहाची तुलना करूनही तिथे पुन्हा हसले जाते 

आणि अशाप्रकारे वरवर योग्य वाटणारे पण आत खच्चीकरण करणारे प्रश्न करून या देशातील हिंदू तरुणांचा बालकांचा बुद्धिभेद केला जातो आणि श्रद्धेला हात घातला जातो .

तर अश्या ज्या गोष्टी आहेत . हे जे तथाकथित विज्ञानावादी लोक आहेत, त्यांना हे कळत नाही (किंवा मुद्दाम नकळल्याचा आव आणून) की पुराण कथा या एक प्रकारच्या  रूपक कथा असतात. त्याचे बाह्य स्वरूप वेगळे असते आणि अंतरंग वेगळे असते.

 लक्षात घ्या की भगवान श्री शंकर आणि माता पार्वती यांचे संबंध हे प्रथम गुरु आणि प्रथम शिष्य असे आहे.आणि मळ म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे .  भगवती माता ही आपल्या अंगावरच्या मळापासून म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या  अज्ञान मळा पासून या पुत्राची निर्मिती करत आहे (आपल्या मनात प्रसवणारे विचार हे आपले पुत्रच तर असतात) म्हणजे काय तर हा अंधार अज्ञान रुपी जो पुत्र आहे जो मातेने तयार केलाय तो तिच्या न्युनामुळे  निर्माण झालेला आहे आणि हा अज्ञानरूपी पुत्र तिने आपल्या दारात ठेवलेला आहे आणि ज्या वेळेला भगवान शिव तिच्या घरात प्रवेश करू पाहतात म्हणजे अंतकरणात येऊ पाहतात मनात प्रवेश करू पाहतात त्यावेळेला हा अज्ञान रुपी मुलगा  त्यांना आत येवू देत  नाही .त्यावेळेला तो दयाळू परम कल्याणकारी महादेव त्या अज्ञानाचा वध करतो, त्याला नष्ट करतो जेणेकरून आपली परम शिष्य भगवती माता पार्वती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल किंवा तो तिच्यापर्यंत पोहोचू शकेल ,अशी योजना ते करतात परंतु मातेचा अज्ञान जरी गेला असला परमेश्वर भेटला असला तरी मोह अजूनही गेलेला नाही, ती मोहवश आहे म्हणून तिला त्या अज्ञानातही सुख वाटत होते, आनंद होत होता. त्यासाठी तिने पुन्हा त्या अज्ञानाचा हट्ट धरला आहे अशा वेळेला तो ज्ञानी अन कणवाळू भक्त वत्सल महादेव या अज्ञानाचे रूपांतर ज्ञानामध्ये करत आहेत त्या अज्ञानापासून तयार झालेल्या पुत्राला ज्ञानामय करत आहे आणि हत्ती हे आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे .म्हणुनच गणपती हा बुद्धीचे प्रतीक आहे. तो सार विचार करून विवेकाने निर्णय घेतो त्याच्या त्या निर्णयाने कार्यात येणारे विघ्न आपोआप नष्ट होते . तो विघ्नांतक आहे. तो म्हणूनच सुखकर्ता आणि दुःखहर्ता आह. हे त्याचे खरे स्वरूप आहे असे मला वाटते .
अन हा या कथेतील गूढ अर्थ आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

रिक्त

रिक्त
*****

हा शब्दांचा पसारा 
आता सरत आहे
 हा भाव कोंडमारा 
आता विझत आहे 

तुझे चित्र मनातून 
आता हरवत आहे 
काळाच्या धुक्यामध्ये 
जन्म विरत आहे 

काय कसे सुरू झाले
मन आठवत आहे 
स्मृतितून आयुष्य ही
आता पुसत आहे 

जोडलेला हरेक बंध
सहज सुटत आहे 
एकल प्रयाणा प्राण
आतुर होत आहे

ऐकून खुळी गाणी 
मनी दत्त हसत आहे 
फेकून झोळी कुठे 
मी ही रिक्त होत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...