सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

डॉक्टर तांबे श्रद्धांजली

डॉक्टर तांबे श्रद्धांजली 
****
काही चेहरे काही व्यक्ती 
मनावर कोरल्या जातात 
अगदीच खास अशी जवळीक 
नसून सुद्धा आपल्या असतात 
डॉक्टर तांबे 
काही वर्षांपूर्वी ज्याच्या सेंड ऑफला 
मी कविता लिहली 
त्याच्यावर शोक संदेश पर कविता
लिहली जाणे हे अतिशय दुःखद आहे 
त्याच्या आकस्मित जाण्याने 
झालेली ही कटू जखम 
खोलवर सलत आहे 
त्याच्याशी तश्या फार गप्पा 
नाही मारल्या कधी 
त्याच्या खांद्यावर हात ठेवून 
चाललो नाही कधी 
जीवनातील घटना आठवणी 
व्यक्तिगत कौटुंबिक सुखदुःख 
शेअर केले नाही कधी 
पण रुग्णालयाच्या कंपाउंडच्या 
भिंतीमध्ये असलेली ही मैत्री  फक्त 
सहकारी या नात्यापुरतीच मर्यादित नव्हती 
त्याच्या बोलण्यात वागण्यात असणारा 
मैत्रीचा स्नेहाचा अंश 
समोरच्याला आपला करून टाकायचा 
आणि त्या आपल्याश्या केलेल्या त्याच्या
अगणित मित्रांमध्ये मी होतो 
तांबे च्या निवृत्तीनंतर 
आम्ही क्वचितच भेटलो
 काही कामे फोनवर झाली 
काही संवादही फोनवर झाले 
पण आवर्जून भेटावे तेवढे 
खास कारण झालेच नाही
कदाचित आणखीन काही वर्षेही 
आम्ही भेटलो नसतो 
पण ज्याच्या जाण्याने मनात खड्डा पडतो 
ज्याचे जाणे एक आघात ठरतो 
तो तुमचा खरोखरच 
जवळचा मित्र असतो 
आप्त असतो आणि आप्त जाणे 
यासारखी दुःख नसते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

तुच लिहतोस


तूुच लिहितोस
*****::::*****
तूुच लिहितोस दत्ता तुझे गाणी 
मज मोठेपणी मिरवतो ॥

माझी न साधना असे भक्ती उणा
कृपेच्या कारणा तुची होशी ॥

तुझा हा प्रसाद तुजला वाहतो 
आनंद भोगतो दिला तू जो ॥

आणि वाणू काय ठेविलेस पायी
ऐसिया उपायी करूनिया॥

शब्दो शब्दी दत्ता राहा उमटत 
जेणे मी मनात पाही तुज॥

शब्दासवे जावा विक्रांत हा होत
पाय धूळ फक्त तुझी दत्ता॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ५

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सांगावा

सांगावा
****:
धाडला सांगावा दत्तात्रय देवे 
भक्ताचिया सवे मजलागी ॥

दत्ताची कवणे ज्ञानदेव भक्ती 
येऊ देत पंक्ती सुंदरश्या ॥

माझिया सेवेचा खारीचा हा वाटा 
तुज भगवंता पोहोचला ॥

भक्तांच्या रुपी राही भगवंत 
होऊनिया मूर्त प्रेमळ ती ॥

स्वीकारी आदेश जोडोनिया कर
विक्रांत सादर सेवेलागी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ४


शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

आधीव्याधी


आधीव्याधी
*********
दिल्या आधीव्याधी जरी त्या प्रभुने 
प्रारब्धवशाने आल्या किंवा ॥
दवा हि प्रारब्ध पथ्य ही प्रारब्ध 
भोगणे प्रारब्ध बरे होणे ॥
वेळ येता नच पथ्य कामी येते 
दवा न लागते देहास या ॥
कुणाची काय ती असे वेळ इथे 
ठाऊक नसते कुणालाही ॥
नियमात सारे बांधलेले जग 
नियमात वाग सांगे ऋतू ॥
देह तो  टाकणे आज वा उद्याला 
मग ही कशाला चिंता उरी ॥
आधी व्याधी तना षडरिपू मना 
चालला सामना चालू दे रे ॥
हाती आला क्षण दे रे स्मरणाला 
आळवी प्रभूला पुन्हा पुन्हा॥
देह त्याचा आहे मन त्याचे आहे 
निसंगत्वे राहे जगतात ॥
देवे दिली वृत्ती ज्योतही पेटती 
सदोदित चित्ती आस त्याची ॥
जगतो विक्रांत जग राहटीत
 पथ्य नियमात खेळे उगा  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

कळेना

कळेना
*******

मजलागी जग हे कळत नाही 
कोण खरे खोटे उमजत नाही 

कधी पाहतो मी रावणात राम 
कधी पांघरून रावणास राम 

कुणी वाहतात कुण्या मोहनात 
कुणी हरवती कुठल्या भ्रमात 

कुणा काय हवे कधी न कळते
बोलणे साऱ्यांचे खरेचि वाटते 

टीचभर पोट  कुणाचे भरेना 
हवेपणा मोठा ठासलेला मना 

कोण कुठे जातो ते दिसत नाही 
हरवला कुठे सापडत नाही 

रूपाला साजऱ्या होतो वश कधी
पैशास चार नि जाणे यश कधी

पुढले पाढे तेच  पंचावन्नाचे 
सुख लाचावल्या लुब्धक जगाचे


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १



बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

जाणल्यावाचून

जाणल्यावाचून
************
जाणल्यावाचून 
जाणतो मी तुला 
पाहिल्या वाचून 
पाहतो मी तुला 

अर्थ ना शब्दात 
सुर ना श्वासात 
घडतो संवाद 
तरीही डोळ्यात

ओढ ही कसली 
तनाला मनाला 
तिढा हा कुठला 
कुण्या जन्मातला 

तुला न कळते 
मला न कळते 
ओठातले गाणे 
ओठात थांबते 

मौनात मनाच्या 
केशराचे रान 
कस्तुरी सुगंध 
धुंद माळरान 

देहात चांदणे 
निळे झिरपते 
सुरांच्या वाचून 
मन झंकारते


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कळते


कळते
****
जगलो जरी इथे मी 
कळते 
जगणे राहून गेले 

फुललो वसंतात इथल्या 
कळते 
उधळणे राहून गेले 

मारल्या  गाठी अनेक 
कळते 
उलगडणे राहून गेले 

चांदणे तुझेच होते 
कळते 
देणे राहून गेले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...