शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

तह


तह
***

हळूहळू जीव खूळा 
गुंतला सखी तुझ्यात  
अन पुन्हा हरवली  
तारकांची वाट तळ्यात 

कुण्या गूढ सुमनांचा 
तोच गंध धुंद आला
अन पुन्हा डंख झाला 
आडवाटे पावुलाला

उतरले नभ खाली 
होत ओढाळ शामला 
निग्रहाचा तट खारा 
मग तो वाहून गेला 

स्पर्शावाचून स्पर्श ते 
लाख मोरपीस झाले 
विजेचे संघात शुभ्र 
दिपवून डोळा गेले 

जिंकलीस कधीच तू 
हात माझे बांधलेले 
पराभूत जीत तुझी 
तह तेच ठरलेले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

प्रारब्ध

प्रारब्ध?
*******
लक्ष लक्ष लाटा तुझिया जगाच्या 
सुखाच्या दुःखाच्या पांडुरंगा ॥ 

कुणाला मायेचा देतोस उबारा 
कुणा न सदरा हिवाळ्यात ॥

कुणी वाळवंटी कुणी महालात 
का रे भोगतात  आयुष्य हे ॥

यत्न शोधण्याचे होउनिया व्यर्थ 
प्रश्न राहतात खिळलेले ॥

कळता कळेना तुझी विषमता 
तेव्हा होय चित्ता क्लेश बहू  ॥

मग प्रारब्धाच्या मारुनिया माथा 
गुमान विक्रांता करतो मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

गीताच्या मिषाने


गीताच्या मिषाने
*********

गीताच्या मिषाने दत्त या मनात 
असतो नांदत शब्दासवे ॥१

शब्दाचेही सुख दत्ताचे ही सुख
करतो कौतुक लाडक्याचे ॥२

आकार उकार वेलांटी नि मात्रा 
अवघीच जत्रा दत्तरूपी ॥३

भाव हीच पूजा भाव प्रदक्षिणा 
भावाची दक्षिणा देहासवे ॥४

शब्दी लागे ध्यान शब्दी समाधान 
समाधीस्थ मन शब्दातील ॥५

विक्रांत पाखरू दत्ताच्या आकाशी 
शब्दाच्या प्रकाशी हरवला॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

मित्र मृत्यू

मित्र मृत्यू 
********

कालपर्यंत शेजारी बसलेला 
मित्र साथीदार कलीग 
आज जेव्हा होतो फोटो हार घातलेला 
 क्षणिकतेची शून्य अवकळा 
येथे आपल्या मनाला 

त्याची मिश्किल प्रेमळ नजर 
उमटत असते पारदर्शी 
पण अस्पर्श काचेतून
मनात साठले त्याचे शब्द
ऐकू येत असतात 
फक्त आपल्याला आपल्या आतून 

असंख्य स्मृती चित्रांची
मालिका उलगडत असते
निरंतर एक एका मागून

येण्या जाण्याचे सनातन  सत्य 
माहित असते मनाला 
माहीत असते की कढ दुःखाचा 
विसरून सामोरे जायचे जगण्याला 

शोक सभेतील भंते सांगत होते 
जगणे तोवरच असते 
जोवर कारण असते जगण्याला 
हे कारण अकारणाचे अकालनीय कोडे 
उलगडत नव्हते मनाला 
शेवटी तत्त्वज्ञान म्हणजे तरी काय 
मलम लावणेच असते शोकाकुल मनाला 

तुटलेल्या नात्याच्या विद्ध दशा
हातात घेऊन बसलेले प्रियजन 
सुखदुःखात साथीदार असलेले मित्रगण 
जगणार असतात एक पोकळी घेऊन 
जी असते गिळून 
अनंत सुखाच्या प्रेमाच्या 
आनंदाच्या संभावनांना

फुलं तर सारीच पडतात 
फळही गळून पडतात 
पण कुणाचे अकाली ओघळणे 
विद्ध करते मनाला कारण
त्या मित्रासोबत 
आपणही असतो 
खाली ओघळत 
त्याच्यातला अंश होत.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुद्वादशी

गुरुद्वादशी
*********

वाडीचा तो वारा येऊन भरारा 
स्पर्शतो मजला हळुवार ॥
तिथला तिथे तो बोचरा तिखटच जरा 
सोसवतो बरा या देशात ॥
करतसे वार्ता तिथल्या भक्तांची
पूजा पालखीची प्रसादाची ॥
आणतसे गंध तिथल्या फुलांचा 
कर्पूर धुपाचा पाजळल्या ॥
जाणवतो पाया स्पर्श त्या घाटाचा 
प्रदक्षिणा पथाचा वारंवार ॥
म्हटलो देवाला यावे भेटायला 
तुम्हीच जीवाला एक वार ॥
मग दरवळ दाटला भोवती 
मनोहर मूर्ती नयनात ॥
कानी खळखळ कृष्णेचा आवाज 
हृदयात गाज भजनाची ॥
घणाणली घंटा गुरुदेव दत्त 
अद्भुत हा नाद रोमरोमी ॥
विक्रांत मनात द्वादशी पहाट 
उतरलो घाट कृष्णाईचा ॥
सरले संकल्प मोडले विकल्प 
मन निर्वीकल्प दत्त पदी॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

भेटलेला माणूस


भेटलेला माणूस
******

खूप खुप दिवसांनी 
सारे काही असूनही
त्यात कुठे नसलेला
एक माणूस मी पाहिला 

जणू की कुठल्यातरी 
गूढ देशातून आलेला 
देण्यासाठी जणू काही
जगा उत्सुक असलेला 

तरी आणि कुठेतरी 
कसा काही गुंतलेला 
लोकेषणा असावी का 
असावा धर्म जागला

कुणास ठावुक पण
हा माणूस आवडला 
खोल खोल त्याच्या आत 
एक साधू मज दिसला .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

गाडीवान

गाडीवान
*******

रिकामी रिकामी धावते ही गाडी .
जरी बैल जोडी बलवान ॥

रिकाम्या गाडीला नाही गाडीवान 
नाहीच सामान आत काही ॥

अवघा उतार जीवन अपार 
नाही पैलपार काही कुठे ॥

कुणी ही जोडली कुठे ती चालली 
आठव राहिली नाही कुणा ॥

बैल थकतील रस्ता चुकतील 
किंवा उलथेल गाडी कुठे ॥

विक्रांत नावाची दिसतेय पाटी 
बाकीची माहिती गुलदस्त्यात ॥

दत्ता होई आता तुच गाडीवान 
मुक्कामाचे ठाण दावी मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...