मंगळवार, ३ मे, २०२२

मित्र


मित्र
*****

चमकती चार 
नक्षत्र सुंदर 
मैत्रीचा आधार 
सदा खांद्यावर ॥१

लाभणे हे मैत्र 
भाग्य खरोखर 
उधळती जीव 
जिथे जीवावर ॥२

ठरविल्याविन 
मित्र भेटतात 
अन आयुष्याला 
प्रकाश देतात ॥३

आपणा अंतरी
मित्र कळतात  
लिहल्यावाचून
शब्द दिसतात ॥४

मागणे न जिथे 
मैत्री असे तिथे 
किती सहज ते 
देणे परी घडे ॥५

भेटताच मित्र
जपावे सर्वदा  
कधी व्यवहार 
केल्याविन वादा ॥६

विक्रांता दुरस्थ 
मित्र अंतरात 
सदैव तयांचे 
सुयश चिंतित ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २ मे, २०२२

लळा


लळा
****

असा कसा लळा
तुझा रे विठ्ठला 
लागला जीवाला 
नच कळे ॥१

जरी भक्ती उणा 
जाणे तुझ्या खुणा
रूप डोळीयांना 
भिजवते ॥२

तुझ्या रावुळात 
होतो असा सान
मज आठवण 
नये माझी ॥३

तुझ्या दर्शनात 
कोण कुणा पाही
कोण कुणा घेई
हृदयात ॥४

ज्ञानोबाचे शब्द 
झरती मनात 
विक्रांत सुखात 
डोलतसे ॥५ .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


शनिवार, ३० एप्रिल, २०२२

एक मरण

मरण
*****

दाविलेस दत्ता एक ते मरण 
जेणे झाले मन कासावीस ॥१

खुराड्यात जन्म मृत्यू खुराड्यात
होत्याचा क्षणात नाही होय ॥२

सुखासाठी कण  गोळा जे करून 
ठेविले रचून  एक एक ॥३

जाहले ते व्यर्थ जाई ना सोबत
देहाचे ही काष्ट त्यात एक ॥४

यश कीर्ती धन अन् जीवलग 
सारा लागभाग क्षणी मिटे ॥५

घेतले जे ज्ञान वाचविण्या प्राण 
शून्यचि पै जाण झाले इथे ॥६

करावा जीवने कुणाचा भरोसा 
कसला भरोसा येथे आता ॥७

जाणे असे जरी मृत्यूच्याच दारी 
दत्ता हात धरी  तया वेळी  ॥८

दिवा पेटलेला असावा देव्हारी 
अन् फुलावरी ओला गंध ॥९

तरी ते गमन होय असे सार्थ
जाणतो विक्रांत पाहूनिया .॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

स्वामी

स्वामी
******

जरी दूरवर 
असे स्वामी फार 
प्रेमाची पाखर 
घालीतसे ॥१

जगण्याचे गाणे 
अजून झणाणे
फुलती तराणे
अंतरात ॥२

गुंतलेले मन 
तयात अजून 
काय ते म्हणून 
खेळू देती॥३

कधीतरी पण 
थबकतो क्षण 
कृपेचा तो कण 
डोळा दिसे ॥४

वेडावते मन 
तया आठवून 
येतसे धावून 
दारा वरी.॥५

तेव्हा ते हसून. 
जवळ घेऊन 
चित्तात भरून 
देती गाणे॥६

विक्रांत समर्था
विनवतो आता 
सोडू नका नाथा
भटकाया ॥७

घेई पदावर 
सुटू दे संसार 
तव प्रेमावर
जगु दे रे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

मैत्र

मैत्र
****

तुझ्या डोळ्यातले भाव 
मज कळत नाही 
गीत हिरव्या पानाचे 
कधी लहरत नाही ॥

वारा उधान पंखात 
नभ खुणावते काही 
पाय रोवले फांदीत 
का ग सुटत नाही ॥

जग नसते कुणाचे 
नाही आजचे उद्याचे 
शीड भरल्या वाचून 
नाव चालत नाही ॥

मी न नावाडी खलाशी 
सवे तुझ्या ग प्रवासी 
मैत्र क्षणाचे मनाचे 
वाट मोडत नाही ॥

रंग पुसून सुखाचे 
जरा हास खळाळत
क्षण वाहती काळाचे 
कधी थांबत नाही .॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

संसार

संसार
******

देह हा जाणार 
संसार जाणार 
सवे न येणार 
जरी काही ॥१

तरी खेळतो मी 
मांडलेला डाव 
सोडुनिया हाव 
जिंकण्याची ॥२

कळे मज आता 
एक हार जीत 
जीवनाची रीत 
व्यग्रता ही ॥३

दत्ता दावलेस  
मज माझे पण 
आकाशी फुलून 
आले फुल ॥४

दिसे बंधा विन 
बंदी हे जीवन 
दिलेले आखून 
रिंगण ही ॥५

रिंगणात दत्त 
बाहेरही दत्त 
पाहतो विक्रांत 
दत्त कृपे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

माय भगवती


माय भगवती
*********

आई तुझे नाव 
मुखी घेता घेता 
अन रूप चित्ता
आठवता ॥

ओघळले अश्रू 
थरारले मन 
काहीच कारण 
नसतांना ॥

आनंद विभोर
प्राण माझा झाला 
मनाचा थांबला
खटाटोप ॥

गदगदे तन 
सुखाचे कंपण 
गात्री ये दाटून 
अकस्मात ॥

प्रगाढ वात्सल्य
तुझिया डोळ्यात 
पाहिले मनात 
दाटलेले ॥

घनरूप झाले 
देही  उमटले
शब्द जडावले 
भिजुनिया॥

माय भगवती 
पावली विक्रांता
प्रकाशाची वार्ता 
कृपे  तिच्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...