रविवार, १३ मार्च, २०२२

वेणू

वेणू  (उपक्रमास)
*****

दूर कुठे रानामध्ये 
स्वप्न साद घालते 
कणकण थरारून 
वेणू आत झंकारते 

उतरून उन्हं  गेली 
सांज दारी वाजू आली 
कुठे कशी जाऊ आता 
चूल माझी पेटलेली 

भलत्याच अशावेळी 
सय कोण काढते का ?
रीतभात विसरून 
साद कोण घालते का ?

हरवले भान पुन्हा 
प्राण माझे व्याकुळले 
नको नको जिवलगा 
तुला सारे ना रे कळे 

किती जन्म गेले तरी 
डोळियात तुझा ध्यास 
सांभाळून बावरीला
घेई आता ह्रदयास 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.



शुक्रवार, ११ मार्च, २०२२

सुटणे

सुटणे
*****

कुणात गुंतणे 
अन् न तुटता 
हळुवार सुटणे 
हे मी तुझ्याकडून शिकलो !

त्या सुटण्यात 
तेढ नसते  
खंत नसते 
कसकस नसते 
तगमग नसते 
असते ती फक्त 
शब्दात न उतरणारे 
धन्यवाद

सुगंध उधळून 
ओघळणाऱ्या 
आकाशजाईचे
विरक्त समाधान .

अनंत जीवनाच्या
पटावरील
इवलीशी घटना 
कुणाला न कळणारी
अगणित अपूर्णतेची
एक कडी
तरीही संपूर्णतेचे
समग्र सार 
घेवून आलेली.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

गुरुवार, १० मार्च, २०२२

दत्त सुटला

दत्त सुटला
*********

दत्त सुटला 
हातातला 
मी माझ्यातच 
बळे पकडला ॥

आता तेच 
कृष्ण विवर  
व्यापून आहे 
सारे अंतर ॥

दत्त बनवला 
दत्त सजवला 
फुंकरी वाचून 
उडून गेला  ॥

माझ्यातले 
माझे पण 
किती आतूर 
जाण्या हरवून ॥

आतुरतेला 
आणि चिटकून 
मीपण चिवट 
दिसे अजून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


बुधवार, ९ मार्च, २०२२

रिक्तता


रिक्तता 
*******

हि भयव्याकूळ रिक्तता 
घेरून आहे जीवनाला 
मी वाहतो आहे 
क्षणभंगुर माझेपण 
जलपृष्ठावर अनंताच्या !

क्षणाक्षणाने अनंत बनते ?
की क्षणातच अनंत असते ?
किंवा क्षण अन अनंत 
असे काहीच नसते ?
असणे फक्त असणे असते ?
अन नसणे ही 
असण्यातच अंतर्भूत असते ?

उसन्या उत्तरांच्या 
असंख्य लहरी 
हेलकावत आहेत 
अस्तित्व 

कुठल्यातरी लहरीवर 
आरूढ झाले तरीही 
अन साऱ्या लहरींना 
नाकारले तरीही 
अस्तित्वात 
काहीच फरक पडत नाही 

तर मग हा 
निखळ उत्तराचा हव्यास 
का व्यापून राहतो 
अस्तित्वाला?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

सोमवार, ७ मार्च, २०२२

माझे जगणे .


माझे जगणे
*********
दरवळतो मधुमास भोवती 
सरता सरत नाही
हि गोडी जीवनाची या 
मिटता मिटत नाही ॥१॥

ते वर्ख मनाच्या पंखाचे 
दिशात फाकती दाही 
रस रूप गंध टिपतांना 
मी माझा राहत नाही ॥२॥

या सुखे मृदू झंकारती 
मनी लक्ष लक्ष तारा 
कंपणे देह मनातील 
घेवून जातो वारा ॥३॥

फुलतात तराणे नुतन 
होताच ऋतुंचे आगमन 
हा कण कण भारावून
घेतो तया अलिंगून ॥४॥

जगण्यास भरून जे सर्व
ते सदा जाणवे स्पंदन 
उरी भक्ती प्रीती होवून 
शब्दांनी भरते अंगण ॥५॥

हे जगणे इतुके सुंदर की
वाटते जगास वाटावे 
होवून घनगर्द निळा मी
या अणुरेणूवर बरसावे ॥६॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘












रविवार, ६ मार्च, २०२२

बुद्धिवान अश्रद्धा


बुद्धिवान अश्रद्धा
************:

काय बुद्धिवान 
असते अश्रद्धा 
ऐकुनी प्रबुद्धा
प्रश्न पडे ॥
अहो तो काळोख 
मिट्ट दाटलेला 
डोळे झाकलेला 
हतभागी ॥
बुद्धीविन आण 
कोणी न फसवी
माया ही नटवी 
खरोखर ॥
देते अभिमान 
उंचावते मान 
मागते प्रमाण 
बापाचे जी ॥
करतसे गुंता 
सरळ सुताचा 
अणिक काळाचा 
अपव्यय ॥
होई बा अज्ञान 
फेकी ग्रंथ ज्ञान 
देव भावेविण 
भेटतो ना ॥
विक्रांत पदाचा 
मोठ्या पदवीचा 
जाणतो पोटाचा 
धंदा असे ॥
नको मज याद
दत्ता त्या बुद्धीची 
जेणे की भक्तीची 
तुटी होय ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, ५ मार्च, २०२२

नि‌‌र्बुद्ध भक्ती

नि‌‌र्बुद्ध भक्ती
*****

भक्ती काय कधी असते निर्बुद्ध 
टाळ ते कुटत मख्खपणी ॥१
भक्ती असे एक पेटलेली ज्योत 
कुण्या अंतरात प्रभू कृपे ॥२
कुठे नसे तेल भक्ती भावनांचे 
चारित्र्य वातीचे पिळदार ॥३
म्हणुनिया उगा दिसते ती क्षीण 
दीप्ती मीणमीण गमतसे ॥४
पेटविली ज्योत तोच देतो तेल 
आडोसा सांभाळ करीतसे ॥५
भक्तीचे आभाळ भक्तालाच‌ ठावे 
इतर पहावे आढा छत ॥६
विक्रांत भक्तीला मिरवितो माथा 
हेतू विन दत्ता आठवतो ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...