सोमवार, १७ जानेवारी, २०२२

चहा टँनिन अन न्युरॉन


चहा टँनिन अन न्युरॉन
************

कडवट गोड काळा चहाही 
मी आवडीने पितो
उतरतांना घशातून तो 
काना डोळ्यालाही कळतो

अन जो असतो केवळ 
दुधाचाच स्पेशल असा तो
कितीतरी वेळ जीभेवर 
उगाचच रेंगाळत राहतो 

हि दोन्हीहि विरुद्ध रूपे
एकाच चहाची असतात 
पण न्युरॉनला परफेक्ट 
असे टँनिन पोचवतात

न्यूरॉन्स ला कुठे कळतो 
रंग गंध त्या चहाचा 
त्याला फक्त हवा असतो 
डोस रोजच्या मात्रेचा 

सुखही तशीच अन 
दुःख तशीच असतात 
त्या आपल्या अहंकाराला 
छान फुलवत बसतात 

सुख ही त्यालाच 
दृढ करत असते
दु:ख ही त्यालाच 
खोलवर रुजवते

हे खरं आहे की गोडी 
हरवते पटकन इथं 
पण कडवटपण राहते
खूप वेळ  रेंगाळत 

बाकी त्यात काहीही टाका 
प्रेम भरा हवे तसे हवे ते 
ग्रीन करा लेमन करा 
मध गूळ काय मिळेल ते 

पण टँनिन मिळाले नाही 
तर सारेच अर्थहीन होते
कारण हेच  केवळ त्या 
चहाचे प्रयोजन असते

रोज सकाळी 
म्हणूनच की काय 
शंकर महाराजांना मी 
अर्पण करतो ती चाय 

म्हणतो घ्या हा प्याला 
घ्या हे टँनिनच व्यसन 
जे सुख दु:खातून 
आले दाटून 
मला मुक्त करा यातून .

पण चहा मला आवडतो 
तो खेचून नेतो
अन बुडवून टाकतो 
कुठल्या एका कपात

तपकीरी काळ्या 
गडद डोहात
जणू कुणाच्या डोळ्यात 
चकाकत्या विभ्रमात

चहाचा तो कप राहतो
सदैव आवतन देत
मला अधीर करत

अन ते सारे न्युरॉन 
असतात हसत
आपल्या कोषिकात 
मला
माझ्याही नकळत.
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १६ जानेवारी, २०२२

वाट


वाट
*****

कैसी धावे वाट
दिशाहीन अशी 
होऊनिया पिशी 
मुक्कामाच्या ॥

सारे सुख जरी 
बाजू घुटमळे
सुमनांचे मळे 
सजलेले ॥

वाटेला वाटेचे 
वाटपण टोचे 
कणोकणी काचे 
अस्तित्वाच्या ॥

वाटेवीन वाट 
काय ती होवावी 
मुक्कामास जावी 
सोडुनिया 

पाऊलांची नाती 
चाकोरीची गती 
उठती धावती 
युगे युगे ॥

प्रत्येक पाऊली 
असे सुरुवात 
आणिक तो अंत 
तेव्हाच ना ॥

ऐसा उमजेचा 
दगड मैलाचा 
सद्गुरु तियेचा 
सांगी होय ॥

तिजला कळले 
तिचे ते नसणे 
भूमी रेखाटने
काल पदी ॥

जाणून तियेचे
थांबणे धावणे
मैलाचे बोलणे
बोलावीन ॥

विक्रांत तटस्थ
जाहला क्षणस्थ
पथ आकाशात
हरवला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

अजात पक्षी

 अजात पक्षी

***********

आस जागल्या मनात
येते दत्ता तुझे गाणे 
जन्म निष्फळ चालला
कधी घडेल दिसणे  ॥

 जरी प्रकाश आंधळा
 ऊब जाणवते काही
 जरी लागतात ठेचा 
 स्पर्श बोलतात देही ॥

 जग अफाट असीम
 संख्या शून्यात विलीन
 माझ्या रांगेचा हिशोब
 काय  फायदा करून॥

 माझे  मोजले दिवस
 क्षणी सापडत नाही
 मन खुळे अट्टाहासी
 डोळे उघडत नाही ॥

 देई पांघरून पंख
 मज दिसल्या वाचून
 सारे घडते कश्याने
 मज कळल्यावाचून ॥

पक्षी अजात विक्रांत 
दृष्टी उघडल्या विन
ऊब अंधार रेशमी
वाहे सर्व अंगातून ॥

 🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

आठवत नाही (उपक्रमासाठी)

आठवत नाही ( उपक्रमासाठी)
***********

वादळ तू मला दिलेले 
आज तुला आठवत नाही 
सारे काही शांत शांत 
झुळूकही आत येत नाही 

झाली उलथापालथ सारी 
तुला मुळीच याद नाही 
विखुरले जग मोडले हे
जणू अस्तित्वात नाही

पान पान वृक्षाचे या 
दुखावले गेलेय पाही
बेपर्वा जाण्याने तु़झ्या 
घाव पण भरत नाही

हिंदोळुन फडफडून
त्राण वेलीचे या गेले 
लाख सावरले तिला 
जीव पण धरत नाही

होतीस मेघ सावळी तू
स्वागता मन उत्सुकही 
जाणे असे लाथाडूनी
तुज पण शोभत नाही

तरी तुझ्या साठी मनी
शापवाणी येत नाही 
वेदनांत नांदताना 
तुझे गीत हरवत नाही
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

पोटासाठी


पोटासाठी
******::
पोटासाठी चाले
कुठे ही नोकरी 
कुठे ती पथारी
 देवा दारी ॥

पुण्य कुणाच्या 
पडते पदरी 
कुठल्या उदरी 
शांती क्षुधा ॥

अवघे जीवन 
करते नर्तन 
भुकेस घेवून 
हातावरी ॥

राजा रंक आणि
पथीचा भिकारी 
सत्ता नि चाकरी
त्याच दारी ॥

विक्रांत उपाशी
हातात कटोरी
फिरे जन्मभरी
पोटा साठी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .



दाखवी चरण


दाखवी चरण
**********
माझी थकलेली 
हाक तुझ्या कानी 
पडेना अजुनी
काय दत्ता ॥

जळलेले प्राण 
सरे सारी शक्ती
अनामिक भीती
 फक्त पोटी ॥

हरवलो रानी
धावे अनवाणी 
तुटलेल्या वाटांनी 
निशिदिन ॥

बापा अवधूता 
किती कष्ट देशी 
परीक्षा पाहसी 
दीनाची या ॥

मूर्ख शिरोमणी 
उद्दाम अडाणी
विक्रांत जाणुनी 
क्षमा करी ॥

नको धनमान
नको यशोगान 
दाखवी चरण 
एकवेळ ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


अभय


अभय
******
दिस सरला रे दत्ता 
आता जाऊ कुण्या वाटा 
माझे सरले चालणे 
तुझ्या दारी येता-येता 

क्षीण झाली रे चेतना 
दीप मंदावे डोळ्यात 
नच कळे माझ्यासाठी 
काय होईल पहाट 

डाव सरल्या वाचून 
पट गुंडाळून जाता 
कोण कवड्या कुठल्या 
काय आठवे स्मरता

 पुन्हा चालणे धावणे 
सुख-दुःखात वाहने 
तेच आखीव चौकोन 
तीच चाकोरी जगणे 

असे किती कुठवर 
नवे वस्त्र देहावर 
पुन्हा पुन्हा मिरवावे 
शाप जीर्ण तयावर 

तुझी करूणा केवळ 
तोडी मोडी भवभय 
ऐसे जाणून विक्रांत 
तुज मागतो अभय

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...