गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

खेळ सावल्यांचा


खेळ सावल्यांचा
**********
सुख साठवणे
दुःख आटवणे
देवा हे मागणे 
नाही माझे ॥१

जोवरी हा देह 
तोवरी सोसणे
पडणे धडणे 
घडेची गा ॥२

जोवरी हे मन 
रिपुंचा तो मारा 
साहणे जीवाला 
घडेची रे ॥३

चालता या रानी
व्यथा वेटाळूनी 
दत्त हा सोडूनी 
जाऊ नाही ॥४

ह्रदी प्रकाशात 
राहावा तेवत 
दीप तो सतत 
मांगल्याचा ॥५

चालो चाललेला 
खेळ सावल्यांचा 
विक्रांता तयाचा 
लाग नको॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

या दुनियेत


या दुनियेत
***:***

आता मन सुखाने उगाच हरखत नाही 
आता मन दुःखाने स्वतःत हरवत नाही 

आता मनास कळते होरपळते ऊन जरी सावलीसाठी तरीही ते  धाव घेत नाही 

आता मन भिजते पौर्णिमेच्या चांदण्यात
पण तो आल्हाद अणुरेणूत उतरत नाही 

सुख आहे दुःख आहे जगणे वाहत आहे 
तेल आहे वात आहे पण जळणे होत नाही 

आता माझे मन मलाच सदैव पाहत आहे 
बघणारा अन खाणारा अन एक होत नाही

चिडण्यात चिडणे नसते हसण्यात हसणेही 
दुनिया अशीच असते पण मी दुनियेत नाही

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

ज्ञानियाचा राजा


ज्ञानियाचा राजा 
************

ज्ञानियाचा राजा 
वसे माझ्या मनी 
जीवाच्या कोंदणी 
शब्दा सवे ॥१

मिरवीते वाणी 
शब्द मंत्र त्यांचे 
रोमांच सुखाचे 
मिरवित ॥२

मागील जन्मासी 
बहु पुण्य केले 
म्हणून लाभले 
निधान हे ॥३

मिरवितो पथी
नाथांच्या अनंत 
गुरु आदिनाथ 
दत्तात्रेय ॥४

जेथे जातो तेथे 
येती ओघळून 
मनास कळून 
कृपा त्यांची ॥५

कृपा केली देवे
पायाशी ठेविले 
बांधून घेतले 
मूढास या ॥६

देवा हा विक्रांत 
तुझिया दारात 
राहू दे प्रेमात
रंगलेला ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

भर्तृहरी मन


भर्तृहरी (मन)
*****
ती नाही येणार परत आता 
मना दार बंद कर 
हे वाट पाहणे निरर्थक आहे 
हे रात्रभर जागणे व्यर्थ आहे 
आठवांच्या रानात भटकणे व्यर्थ आहे 

मध्यरात्री चिते समोर 
लवलवत्या अग्निरेखा समवेत
बसला होतास तू  रात्रभर जागत
ती रात्र अजून जळते आहे 
ती आग अजून भाजते आहे 
विझू देत आग ती 
होऊ देत राख ती 
आणि मग कर विसर्जित तिला
काळाच्या जल लहरीवर 

सुमनातली सुमने ती 
इथे अजूनही धूमसती 
जाऊ देत विरघळून मनातून ती
जशी गेली हरवून वास्तवातून

खरंच मना दार बंद कर

सगळे परत गेले होते 
सोबत आलेले 
समजूत घालून सांत्वन करून 
बराच वेळ थांबून 
हा तुझा अट्टाहास पाहून 
आपापल्या घरी अन 
निद्रेची चादर ओढून 
जगाला विसरून 
तसा तुही परत फिर 
वास्तव अंगिकार

ती का गेली कशी गेली ?
पुन्हा पुन्हा विचारून 
आक्रंदन करून 
परत कोणी येते का ?
कुठल्या फळाने कधी पडायचे 
असे कोण ठरवते का?
तुला माहित आहे सारे 
तरीही का राहिलास बसून ?
अरे  स्वतःला सावर
शोक आवर 
मना दार बंद कर 

दार बंद करणे म्हणजे 
पाप करणे नसते 
विस्मृतीच्या डोहात 
झिंगून बुडणे नसते 
प्रेमाचे सोनेरी क्षण 
विसरून जाणे नसते 
लाव्हेचा निर्मम 
दगड होणे नसते .

दार बंद करणे म्हणजे 
स्वीकारणे असते 
जे आहे ते 
वास्तव अन वर्तमान
आणि तिथूनच पुन्हा 
नवीन सुरू करणे असते

हा शोकव्याप्त धूर 
विस्कटणारे भगभगणारे 
बेभान  विचार काहूर 
तुला ध्वस्त करण्यापूर्वीच 
विवेक जागव सावर 
मना दार बंद कर 

तुला तुझ्यातून घेऊन जाणारा
जगापासून तोडणारा
आहे नाही च्या भ्रमात 
छिन्नभिन्न करणारा
मनस्कतेचा अंधार
दाटण्या पुर्वीच मना दार बंद कर


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

शब्द आवर्त

शब्द आवर्त
*********

शब्दाच्या पलीकडे गेलेली तू 
अन् शब्दाच्या आवर्तात अडकलेला मी 
कोण सुखी आहे कुणास ठाऊक
आता तुझ्या जगात मी नाही 
माझ्या शब्दात तू नाही 
तरीही शब्दाच्या जगात प्रवेश करताना 
दाराशी दिसतेच तुझी सावली.

तो तुझा भास असतो का अदृश्य सहवास
माझ्या कविता रेखाटणारा
आता माझ्या शब्दात नसतेच 
तुझे रंग रूप 
नसतातच तुझ्या भावना 
नसतात घेतलेल्या आणाभाका 
किंवा निरोपाचे क्षण 
रेखाटलेले कधी काळी

त्या आदी अन्
अंत नसलेल्या अस्तित्वाला 
वाहिलेले असतात माझे शब्द 
त्याला नाम रूपात गुंतवून रेखाटून
भजत असतात
स्मरण असतात  
स्वत:ला सजवून 
सर्व काळ

पण का न कळे कधी कधी वाटते 
असावीस तू शेजारी 
माझ्यासोबत
ही प्रार्थनेतील शब्द फुले 
त्या सर्वव्यापी सनातनवर 
अर्पण करीत असताना 
भक्तीच्या चिंब भावनात भिजलेली 
मला अन सार्‍या जगताला विसरलेली

ती तुझ्यातून उलगडणारी 
भावभक्तीची आभा 
मला अस्तित्वाच्या
सुगंधी गाभ्यापर्यत नेणारी
 
अन् हे काय 
पुन्हा मला पाहतो मी 
त्याच शब्द आवर्तात
जरी की तू नसतेस कधी
माझ्या शब्दात.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

निराकारा

निराकारा
****

ओठातला दत्त 
पोटातला व्हावा 
भुकेचा मिटावा 
टाहो माझा ॥१॥

सुखाचा हा घोट 
जीवा गिळवेना 
जाणिवेच्या वेणा
आठवेना ॥२॥

चटावला जीव 
देवा तुझ्या नामा 
शब्दातीत प्रेमा 
भेटेचिना ॥३॥

आकारा वाचून 
गळेचिना डोळा 
हुंदक्याच्या माळा 
माझ्या गळा ॥४॥

अष्ट सात्विकाचा 
दाटे जरी मेळा 
त्याहून निराळा 
भाव तुझा ॥५॥

विक्रांत शिणला
वाहुनिया ओझे 
रूपाचे शब्दाचे 
निराकारा॥६॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

पाहिली आळंदी

पाहिली आळंदी
************
पाहिली आळंदी 
इंद्रायणी काठ 
जाहलो निवांत 
येणेवरी ॥

ऐकीयला घोष 
राम कृष्ण हरी 
मिटली काहिली 
जीवाची या ॥

भरला डोळ्यात 
सोन्याचा पिंपळ 
मऊ तळमळ 
झाली काही  ॥

दिसता समाधी 
चैतन्य चांदणे
देहात या गाणे 
सुरावले ॥

भावना कल्लोळ 
भरून मनात 
पाझर डोळ्यात 
दाटू आला ॥

माऊली माऊली 
पडे मिठी जाड 
बहरले झाड 
मनातले ॥

नुरले विक्रांता
जगताचे भान
तुळसीचे पान 
जीव झाला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...