शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

उगमी


उगमी
*****

चाललो उगमी 
माघारा मी आता
धरूनिया हाता 
दत्ताचिया ॥

थांबलेले मन 
जगाचे चलन 
अहंचे स्फुरण  
एक मात्र ॥

पाही एकटक 
जाणिवेचा डोळा 
होवून आंधळा 
जगताला ॥

नादान जगणे 
सहज कळले 
मेंदूत पेरले 
कार्यक्रम ॥

विक्रांत नमितो 
विक्रांता लवून 
विक्रांत मरून 
जात आहे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

आदी शक्ती

आदिशक्ती
*********

चित्ताची जाणीव 
चैतन्य राणीव 
जिवाचीही जीव 
आदिशक्ती ॥

खेळे महाभूती 
माय कुंडलिनी 
रूप रस गुणी 
साकारूनी ॥

प्राणाची वाहणी 
करे माऊली ती 
निरपेक्ष रीती 
भूत मात्री ॥

मनपवना च्या 
राहुनिया संधी 
पांघरुनी गुंथी 
अज्ञानाची ॥

माय मी आंधळा 
आलो तुझ्या दारा 
डोळीयांचा सारा 
दूर करी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

बरे मोडले


बरे मोडले
*******

बरे मोडले दयाळा 
माझ्या घराचे छप्पर 
उंच बांधल्या माडीची
झाली कौले चूर चूर

झाला उजाड हा वाडा 
बघ संपली फिकीर 
कर झोळी तव पुढे 
सवे निघाला फकीर 

होते जमवले सारे 
गेले क्षणात लयाला 
हर्ष दाटला मनात 
देवें कलंदर केला 

तुच अपार एकटा 
मज व्यापून उरला 
तुच झालो मी रे दत्ता 
कुणी शोधाया नुरला


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

घरी

घरी
***********
नाव तुझे आहे 
आईची कविता 
सहज ऐकता 
भान आले 

कृपाळू संतांनी 
हळू थोपटले 
मन स्थिरावले 
आत्मरुपी 

आहे पणी चित्त 
जाणवे साक्षात 
निश्चळ निश्चिंत 
होई ज्योत 

कुणी जिवलग 
दुरावला भेटे 
स्वानन्दाचे दाटे 
लोट जैसे

संतराज उक्त 
माझिया मनात 
झाला घनदाट 
वर्षा ऋतू 

सोलीव सुखाचे 
जाहले दर्शन 
निरभ्र गगन 
अंतर्यामी 

विक्रांत कवाड 
आत उघडले 
दत्तानी आणले 
दत्ता दारी


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

आता मी जगतो

(चित्र : आंतरजाला वरून साभार)

आता मी जगतो
***********

आता मी जगतो 
नाटक म्हणून
स्वतःला ठेवून 
सुखदुःखी 

आले गेले धन 
झाले वापरून
हिशोब ठेवून 
विसरतो 

परी माझे इथे 
आता काही नाही 
ध्यान नित्य राही 
चित्तात या 

लेक आणि बाळ 
सांभाळतो खरं 
शिक्षण संस्कार 
देऊनिया 

परी ती पाखरे 
जातील उडून
चित्तात म्हणून 
अडवेना 

मित्र गोत्र सारे 
घडीची पाहुणे 
आपण वाहणे 
आपणाला 

विक्रांत बुडाला
दत्ताचा या झाला 
पूर्ण सुखावला 
आहेपणी
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

माझेपण


माझेपण 
*******:
मी पेलू शकतो का 
हे माझे मी पण 
ईश्वरा वाचून 
प्रेषिता वाचून 
वा तशाच कुठल्याही 
संकल्पनेवाचून 

आत्म्याचे अमरत्व 
देहाचे नश्वरत्व 
वगैरे 
मनात बिंबलेल्या 
संस्कारावाचून 

पुन्हा पुन्हा वाचून 
आत ठसवुन ठेवलेल्या 
प्रमेयांची ती 
पुरातन मांडणी मोडून 
राहू शकतो का मी 
माझ्या अस्तित्वात 
निखळ असलेपण होऊन

भूतकाळाच्या विचारांची 
जळमटे झटकून
भविष्यातील कल्पनांची
दिवास्वप्ने टाकून 

जिथे काही मिळवणे नसते 
जिथे काही सोडणे नसते 
त्या तृप्त निश्चळ जाणिवेत 
नित्यनूतन जळणारा 
क्षण पांघरून
एक दिवा होऊन

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

निवांत

निवांत
*****:

पायावरी डोके 
ठेवाया मी जाता 
हरवली वार्ता 
पाऊलांची ॥

देऊळी शोधले 
तीर्थ धुंडाळले 
परी ना मिळाले 
काही केल्या ॥

मिटुनिया डोळे 
ध्याईले ध्यानात 
प्रार्थले शब्दात 
आळवून ॥

मग कळू आले 
मीच पाऊलात 
पाय ह्रदयात 
एकरूप ॥

ऐसे दत्तात्रये 
मज काही केले 
आतून गिळले 
जगत्रय ॥

आता मी निवांत 
भक्ति विसरला 
ज्ञान हरवला 
कृपा झाली ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...