मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

अंकुरे विचार

विचार
*****

अंकुरे विचार 
कारणा वाचून 
मनाला देवून
माझेपण ॥

मावळे विचार 
वाहून वाढून 
दुज्याला देऊन 
जन्म एका ॥

सुखाला होकार 
दु:खाला नकार 
आनंदा अपार 
लोभ धरी ॥

आनंद विचार 
नसतो आनंद 
सुखाचा तो कंद 
वेगळाच ॥

घडता पाहणे 
विचारी वाहणे
भेटते जगणे 
कधी कुणा ॥

विचारा वाचून 
निखळ मीपण 
विचारा पाहून 
उरे एक ॥

पुढची कथा 
विचारा वाचून 
आहे रे जाणून 
जाणणारे ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

चालविले दत्ता


चालविले दत्ता
************

चालविले दत्ता
म्हणून चालतो
थांबविले दत्ता 
म्हणून थांबतो 

घडणे घडते
हरेक क्षण तो
केले मी म्हणतो 
वेडाच असतो

अंकुरले बीज 
मी का शिकविले 
कणसात दाणे
मी का भरियले 

चालू द्या गमजा
चालल्या कोणाच्या 
विक्रांत पाहतो 
सत्तेला दत्ताच्या 

आता माझे काय 
आणिक कशाला
पडून राहतो
दत्ताच्या पायाला



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

बेड रिडन

बेड रिडन 
*********

दहा वर्ष 
बिछान्याला खिळलेली
बेडसोर अन मॅगेट्सनी भरलेली 
आई 
जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये आणली 
अस्पष्ट अडखळत 
तो म्हणाला काही 
मला तिला घरी न्यायची नाही 

खंगून खंगून वृद्धत्वाने 
आजाराने 
दुर्लक्ष केल्याने 
ती ग्लानीत गेलेली 
मलमूत्र खाणेपिणे 
या पार झालेली 
फक्त हालचाल सापळ्याची 
वर खाली होणारी 
खूण  जिवंतपणाची 
तेवढीच उरलेली 

चार दिवस नळ्या घालून 
तरीही ती जगली 
हाताबाहेरची केस 
तरी बराच काळ टिकली 
विझत विझत तिच्याही  
नकळत मग निमाली 

अधून मधून येणारा तो 
बोलावून आला 
दुःख त्रागा सुटका 
चेहऱ्यावर नसलेला 
तिथूनच ते मुटकुळे
स्मशानात घेऊन गेला 

अन प्रतिक्षेतील नव्या रुग्णासाठी 
बेड साफ होऊ लागला


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

मनाची चादर

चादर
*****
मनाची चादर 
मनाला पुरेना 
अंग हे झाकेना 
अज्ञानाचे ॥

भुक्ती मुक्ती कीर्ती 
चवीचे खादणे
जन्म जीभ म्हणे
देई पुन्हा ॥

रंग कामनांचे
अनंत छटांचे 
रंजन मनाचे 
सदा चाले ॥

सापडेना दत्त 
तापल्यावाचून 
पेटल्या वाचून 
काडी जैसी 

विक्रांत भक्तीची 
नको वाताहात 
सांज ही पायात 
जीवनाची

****


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  



शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

मी

मी
***

माझ्यातले मी पण 
पाहते मला 
भयचकित होऊन 
जे मी ठेवलेय जपून 
कणाकणाने पारखून 
निघून जात आहे आता 
इथे विखरून 
मातीची मूर्ती तशी जाते
जलात  विरघळून 

पर्याय स्पष्ट आहे 
पुन्हा किनारा गाठून 
आपले
क्षणभंगुर अस्तित्व 
ठेवायचे जपून
सुरक्षितपणे  
(कुठवर?)
अन घ्यायचे पुजून 
आपणच आपल्याला

किंवा 
त्या संपूर्ण सर्वव्यापी 
अस्तित्वात 
जायचे मिसळून

मिसळल्याची जाणीवही 
विसरून
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

नुरावे

नुरावे 
*****
आपले आपण 
नुरावे जगाया 
ओवाळून काया 
दत्ता वरी 

मग सुखदुःख 
मानावे कुठून 
येती ती वाहून 
दैवगती 

माझेपण मला 
नको मिरवाया 
सारे दत्तराया 
वाहुनिया 

रोगाची भोगाची 
करावी वाहणी
देह सांभाळूनी
देव काजा

पडे ओंजळीत 
प्रेमाने झेलावे
दत्ताला म्हणावे 
कृपा तुझी 

विक्रांत जाणीवी
बसला खेटून 
दत्ताला स्मरून 
सर्वकाळ

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

आहे मी

आहे मी
******:

आहे मी रे 
आहे मी  
कोण सांगते 
कुणास कळते 

वृक्षा वाचून 
बीज जन्मते 
ठिणगी वाचून 
आग जळते 

शब्द कशाला
भाव कशाला 
अन रूपाला 
कोण पाहते 

आहे मी रे 
स्फुरण घडते 
मूळ तयाचे 
कुठून येते 

शून्याला का 
शून्य सृजते 
आकाशाला 
काही दिसते 

आहे मी रे 
आहे मी 
फक्त एवढे 
आहे असते


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...