सोमवार, २६ जुलै, २०२१

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता .

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  .
*****



आषाढी एकादशीला
संपूर्ण हा झाला 
अभ्यास चालला 
लिहूनिया॥१

योगायोग बरा
जुळून हा आला 
तेणे या मनाला 
तोष झाला ॥२

काय किती कळले
आत उतरले  
जरी न उमजले 
मज लागी ॥३

परी झाली सोबत 
ज्ञानदेवा संगत 
शब्दांशी खेळत 
अनायसे ॥४

येणे सुखावलो 
भुके व्याकुळलो 
दारी मी पातलो 
मावूलीच्या ॥५

पांडुरंगा दत्ता 
विक्रांत हा चित्ता
स्वरुपात आता
वास करो  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



)



रविवार, २५ जुलै, २०२१

चालावी ती वाट


चालावी ती वाट
************

भक्तीविना देव 
न पवे सर्वथा 
सांगूनिया संता 
ठेवियले  ॥१

म्हणूनिया तीच 
चालावी रे वाट
जेणे  भगवंत 
प्राप्त होई ॥२

सरोनिया जावो
भूक नि तहान  
तयाचे स्मरण 
ऐसे व्हावे ॥३

असू देत घर 
मुल आणि दारा 
परी सरो सारा 
व्यवहार ॥४

राहावे घरात 
जैसी धर्मशाळा 
नच रे जीवाला 
गुंतवावे ॥५

मना दृढ धरी
हाच उपदेश
सद्गुरू आदेश 
जीवापाड  ॥६

विक्रांत सदैव
राहो संतदारी
बोध निरंतरी 
ह्रदयात  ॥७


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २४ जुलै, २०२१

वेढून गाणं



वेढून गाणं
*********

जीवाला वेढून 
आहे तुझं गाणं 
अक्षरांचं दान 
अपार हे ॥

लिहविता तूच 
जाणतात सारे 
तुझीच अक्षरे 
ओळखती ॥

ओळखती संत 
आणि भक्त जन 
म्हणून प्रेमानं 
डोलतात

तुझ्या शब्दावर 
तुझ्याच नामाचा 
अभिषेक साचा 
करतात

येणे सुखी होय 
विक्रांतचे मन 
करते वहन 
प्रेम भ‍ाव 

अहो भक्तजन 
दत्त प्रियकर 
व्हावे कृपाकर
दीनावर 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

कधी येशील?


कधी येशील?
**********

माझ्या रित्या ह्रदयात
कधी येशील तू दत्ता
रूप तुझे रुपातीत
भरशील या चित्ता ॥१

शोध शोधले तुजला
रूप दिसले नाही रे 
लाखो गुरूदेव जगी
कुणी आपले नाही रे ॥२

जगणे माझे बदल 
मागत हे मी नाही रे 
दे मोठेपण जगती
सांगत ही मी नाही रे ॥३

एक कण दे कृपेचा
विष वा दे अमृताचा 
अन मला कळू दे रे 
अर्थ या रे जगण्याचा ॥४

सुख भरले भोवती
पण मी सुखात नाही 
जळे आग अंतरात 
मिटता मिटत नाही ॥५

हे ही बरे केले म्हणा 
पाश सारे सुटले रे 
गृहसौख्य प्रेमबिम 
नावालाच उरले रे ॥६

सुटला एक किनारा 
दुजा मिळत नाही रे 
प्राण कंठात येवून 
श्वास सरत जाई रे ॥७

वाहिल्या वाचून तुला
जन्म निर्माल्य झाले रे
जाय ओघळून खाली
पदी पडले नाही रे ॥८

गेला जन्म फुका तर 
दत्ता खंत असणार 
किती जन्म कसा पुढे 
आम्हा कसा कळणार ॥९

प्राण ठेवून डोळ्यात
जेव्हा मरेन मी इथे
आशा बांधून तयात 
पुन्हा येईन मी इथे॥१०

नाव नसेल विक्रांत
देह नसेल विक्रांत 
आस तझीच कृपाळा 
पण राहील तयात ॥११
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

 


















गुरुवार, २२ जुलै, २०२१

दत्त दातार

 

दत्त दातार
********

दत्त हा दातार 
माझिया व्यथेचा 
घास प्राक्तनाचा
भरविता ॥

दत्त हा लोहार 
माझिया मनाचा 
घाव तो घणाचा
घालणारा॥

दत्त हो कुंभार 
अहं तुडविता 
मज रडविता 
जागोजागी ॥

दत्त हा  सुतार 
मज तासणारा 
अन कापणारा 
डोंगेपणी ॥

भोगतो मी बापा 
वेदना देहात 
कण्हतो मनात 
नामी तुझ्या ॥

असो आधीव्याधी 
जावो मृत्यूपंथी
तुझी कृपा अंती 
पण लाभो ॥

विक्रांत सादर
आलिया जीवना 
जाणतो करूणा 
पायदळी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २१ जुलै, २०२१

वादळी मेघ

वादळी मेघ
*********

मी  रे मेघ वादळाचा 
ठाव मला न ऋतूचा 
येतो काळी अवकाळी 
संग बेभान वाऱ्याचा 

भय कंपित हे जग 
जरी रावण कुणाचा 
देतो अन्नपाणी कुणा
मित्र दुष्काळी जगाचा

मज छंद रे वेगाचा 
अभिमान या बळाचा 
मी रे दुश्मन थोरला 
मार्गी येईल तयाचा 

म्हणा बेपर्वा उद्दाम 
असे राजा मी मनाचा 
येण्या गतीत विशिष्ट 
नाही गुलाम वर्षेचा 

झाडे तुटणार मोठी 
छते पडणार थोडी 
माज माणूस मनाचा 
येतो मोडण्यास खोडी 

खेळ चार दिवसाचा 
जातो खेळुनिया जरा 
साथी निसर्ग देवाचा 
सांगे सांगावा सावरा

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १८ जुलै, २०२१

वॉल कोल्याप्स


वॉल कोल्याप्स
********::::

घर असून मरतात कोणी 
घर नसून मरतात कोणी 
जीवनाची खेळी असली
समजते ना कधी कोणी 

आई मरे बाप मरे
बाळ छोटे तेही मरे
नुक्तीच सुकली नाळ 
तरीही जीवन सरे 

दोष हा कुणाचा 
दरिद्री जनाचा 
विषमते पिचलेल्या
फाटक्या घराचा
कि गाव सोडून धावलेल्या 
उपाशी त्या पोटाचा 

इथे प्रेत सांडलेली 
गुदमरून मेलेली
उघड्या सताड डोळ्यात
स्वप्न काचा फुटलेली 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...