बुधवार, १६ जून, २०२१

अनुभव कृपा


माय ज्ञानदेवे
केला उपकार 
विश्वाचा अंकुर 
दावियला 

फुटला अंकुर 
विश्वचि तो झाला 
भरुनी राहिला 
चराचर 

नव्हता अंकुर 
नव्हते फुटणे 
केवळ कळणे 
करण्याला 

परी पाहू जाता 
दृष्टीचिये दृष्टी 
कळण्याच्या गोष्टी 
मावळल्या

म्हणतो कळला 
परी न कळला 
म्हणे जो कळला 
तोचि नाही 

देह मनाचा या
सुटला आधार 
जाणीवेच्या पार 
पार गेला 

दृश्याचिया सवे
हरवला दृष्टा 
दर्शनाच्या वाटा
मावळल्या 

झाला अनुग्रह 
खुंटल्या शब्दांचा 
क्षणिक भासाचा 
भास गेला 

तुडुंब शून्यात 
शून्य बुडबुडे 
असण्याचे कोडे 
नसण्याला 

विक्रांत पाहतो 
शब्द खळबळ 
तरण्याचे बळ 
नवजाता

 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

सोमवार, १४ जून, २०२१

भित्रे प्रेम

भित्रे प्रेम
*******

पाना फुलात सजले 
प्रेम घाबरेच होते 
पाहिले रे कोणीतरी 
मन कापरेच होते 

हलकेच स्पर्श काही 
कंप सुखाचेच होते 
गालावरी उतरले 
रंग लाजेचेच होते 

धडधड होती काही 
शब्द अर्थहीन होते 
थरथर होती काही 
खुले गुपितच होते 

ठरलेले बहाणे ही 
सारे खोटे खोटे होते 
सुटणार धागे हळू
बघ ठरलेच होते 

येणार तो राग काही
तुज ठाऊकच होते 
पुन्हा विद्ध होण्यास हे
मन तयारच होते

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, १३ जून, २०२१

सगुण निर्गुण


सगुण निर्गुण

***********

पाणी तिच वाफ
वाफ तेच पाणी
एक एकाहुनी
भिन्न नाही॥

सोहं तेच दत्त
दत्त तेच स्वामी
भेदाचि कहाणी
नाही तेथे ॥

आवडी धरूनी
करी जी उपास्ती
तिच स्वामी देती
दिसू येते  ॥

राम कृष्ण हरि
म्हणजेच सोहं
हरविता देह
भाव जेव्हा ॥

सगुण निर्गुण
मनाची धारणा
मुक्कामाचा पेणा
एकचि पै ॥

एका पाखराचे
जेैसे दोन पंख
आकाशाचे अंक
पहुडाया ॥

संताच्या कृपेने
जाणतो विक्रांत
म्हणुनि मनात
भ्रम नाही 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १२ जून, २०२१

प्रारब्ध गती

 

प्रारब्ध गती
*********:

सुटली आसक्ती 
देहाची या प्रीती 
प्रारब्धाची गती 
चालतो  मी ॥

ठेविले दत्ताने 
तैसाची राहतो 
जीवनी वाहतो 
उदास मी ॥

परी लसुणाची
आहे रे ही वाटी 
गंध ना सोडती 
अजूनही ॥

तैसे काही आहे 
उरले विकार 
देहाचा आधार 
घेऊनिया ॥

रंग काही गंध 
येती ओळखीचे 
बोल आग्रहाचे 
मांडतात ॥

तया सांगतो मी 
आता सारी खाती
दिली दत्ता हाती 
सोपवून ॥

विक्रांत सुटला 
दत्तासी वाहीला
मालकी तयाला 
सारी आता ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ११ जून, २०२१

वही


वही
*****

भरत आली वही ही
सरत आले पाने ही
आजवरी लिहले मी
तुझ्यासाठी शब्द काही 

तुझे गीत लिहिण्याची 
हौस ही  मिटत नाही
तुझी प्रीत मिळण्याची 
इच्छा ही  सरत नाही

माझे गीत माझ्या हाका 
तुला साद घालणाऱ्या 
माझे शब्द माझे भाव 
मूर्ती तप करणाऱ्या

तुला डोळा पाहूनिया 
पापण्यात शब्द यावा
शुन्यातील अक्षरांचा 
अर्थ ह्रदयी भरावा 

शब्दातित गुणातित 
मज कैसा आकळावा
भावबळे प्रेमबळे 
कळण्याचा अंत व्हावा 

तसे तर नाव आहे
पहिल्याच पानावर 
जाणतो विक्रांत परी 
दत्त पाना पानावर

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, १० जून, २०२१

साधु निंदा

साधू निंदा
*******

थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो 
मारता पवना काठी काय त्या मार लागतो 
चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच दुःखी होतो 

साधुसंता जो दोष देतो गुरूशी नावे ठेवितो  
अभागी तोच जगती खड्डा स्वतःचा खणतो
हिताहित नेणे मुर्ख दुश्मन कुळाचा होतो

नावडे जिव्हेस अन्न सारे उलटी करतो 
अन्नाचे काय जाते त्या धाताच भुके मरतो
जीव क्षुधेने गांजतो वमनाचा त्रास होतो 

कळताच चुक त्या उपाय एकच उरतो 
अनुतापाविन दुजा मार्ग मुक्तीचा नसतो 
अनुताप हाच चित्ता पुन्हा पवित्र करतो

लज्जा अहंकार सारा सोडुनिया लीन व्हावे
जोडुनिया हात दोन्ही लोटांगणी त्या पडावे 
क्षमस्व मे म्हणत त्या पायी पडून राहावे


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ९ जून, २०२१

देव चोरला


देव चोरला
*********

देव हा थोरला 
तयांनी चोरला 
हृदयी ठेवला 
गुपचूप ॥

रूप न तयाला 
नाव न तयाला 
तरी सापडला
पूर्णत्वाने ॥

अन घेऊ जाता 
सताड ते उघडे 
दार ते ही होते
आत घेते ॥

कुणी अडवला 
नच थांबवला 
अरे त्या चोराला 
कुणी कुठे ॥

भेटता समर्था 
शिकवती कला
हवी का तुम्हाला
तरी देती ॥

नसल्या देवुळी 
जाणीव पाऊले
अस्तित्वा आपुले 
हरविता ॥

योग ध्यान भक्ती
घेवून औजार 
विना त्या वापर 
काम व्हावे ॥

सोप्याहून सोपे 
वाटे अवघड 
मना लुडबुड 
करू देता ॥

करणे थांबता
केवळ  उरता 
दाविला विक्रांता 
देव पथ  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...