शनिवार, १२ जून, २०२१

प्रारब्ध गती

 

प्रारब्ध गती
*********:

सुटली आसक्ती 
देहाची या प्रीती 
प्रारब्धाची गती 
चालतो  मी ॥

ठेविले दत्ताने 
तैसाची राहतो 
जीवनी वाहतो 
उदास मी ॥

परी लसुणाची
आहे रे ही वाटी 
गंध ना सोडती 
अजूनही ॥

तैसे काही आहे 
उरले विकार 
देहाचा आधार 
घेऊनिया ॥

रंग काही गंध 
येती ओळखीचे 
बोल आग्रहाचे 
मांडतात ॥

तया सांगतो मी 
आता सारी खाती
दिली दत्ता हाती 
सोपवून ॥

विक्रांत सुटला 
दत्तासी वाहीला
मालकी तयाला 
सारी आता ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ११ जून, २०२१

वही


वही
*****

भरत आली वही ही
सरत आले पाने ही
आजवरी लिहले मी
तुझ्यासाठी शब्द काही 

तुझे गीत लिहिण्याची 
हौस ही  मिटत नाही
तुझी प्रीत मिळण्याची 
इच्छा ही  सरत नाही

माझे गीत माझ्या हाका 
तुला साद घालणाऱ्या 
माझे शब्द माझे भाव 
मूर्ती तप करणाऱ्या

तुला डोळा पाहूनिया 
पापण्यात शब्द यावा
शुन्यातील अक्षरांचा 
अर्थ ह्रदयी भरावा 

शब्दातित गुणातित 
मज कैसा आकळावा
भावबळे प्रेमबळे 
कळण्याचा अंत व्हावा 

तसे तर नाव आहे
पहिल्याच पानावर 
जाणतो विक्रांत परी 
दत्त पाना पानावर

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, १० जून, २०२१

साधु निंदा

साधू निंदा
*******

थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो 
मारता पवना काठी काय त्या मार लागतो 
चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच दुःखी होतो 

साधुसंता जो दोष देतो गुरूशी नावे ठेवितो  
अभागी तोच जगती खड्डा स्वतःचा खणतो
हिताहित नेणे मुर्ख दुश्मन कुळाचा होतो

नावडे जिव्हेस अन्न सारे उलटी करतो 
अन्नाचे काय जाते त्या धाताच भुके मरतो
जीव क्षुधेने गांजतो वमनाचा त्रास होतो 

कळताच चुक त्या उपाय एकच उरतो 
अनुतापाविन दुजा मार्ग मुक्तीचा नसतो 
अनुताप हाच चित्ता पुन्हा पवित्र करतो

लज्जा अहंकार सारा सोडुनिया लीन व्हावे
जोडुनिया हात दोन्ही लोटांगणी त्या पडावे 
क्षमस्व मे म्हणत त्या पायी पडून राहावे


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ९ जून, २०२१

देव चोरला


देव चोरला
*********

देव हा थोरला 
तयांनी चोरला 
हृदयी ठेवला 
गुपचूप ॥

रूप न तयाला 
नाव न तयाला 
तरी सापडला
पूर्णत्वाने ॥

अन घेऊ जाता 
सताड ते उघडे 
दार ते ही होते
आत घेते ॥

कुणी अडवला 
नच थांबवला 
अरे त्या चोराला 
कुणी कुठे ॥

भेटता समर्था 
शिकवती कला
हवी का तुम्हाला
तरी देती ॥

नसल्या देवुळी 
जाणीव पाऊले
अस्तित्वा आपुले 
हरविता ॥

योग ध्यान भक्ती
घेवून औजार 
विना त्या वापर 
काम व्हावे ॥

सोप्याहून सोपे 
वाटे अवघड 
मना लुडबुड 
करू देता ॥

करणे थांबता
केवळ  उरता 
दाविला विक्रांता 
देव पथ  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, ७ जून, २०२१

शेवटचे स्वप्न


शेवटचे स्वप्न
**********

शेवटचे स्वप्न माझे 
जेव्हा गळून पडले 
आभाळ रिते मोकळे 
येऊन कुशीत बसले 

मागे-पुढे भरलेले
अथांग हे निळेपण 
जाणिवेला वेटाळून 
होते एक रितेपण 

हवे पणाचा कल्लोळ
नको पणाचा गोंधळ 
कवड्यात मोजणारा 
सरला होता बाजार 

सोबतीला फक्त होता 
श्वास एक संथ मुक्त 
कणाकणात स्वागत 
अज्ञाताचे बिनशर्त 

होतो मी म्हटले तर 
म्हटले तर नाही ही
वाऱ्याचे असणे होते
नव्हत्या कुठे दिशाही


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आतली वाट


आतली ती वाट 
मज दावी दत्त 
प्रकाश पहाट 
होऊनिया ॥

साधने चालता 
अंधार दाटता  
प्रकाश दिवटा 
देऊनिया॥

सुखाची चढणं 
दुःख उतरण 
एकटा चालून
कळू येई॥

टोचती न काटे 
जाणती न खड्डे 
मग ओरखडे 
कैसे काय ॥

कुठून मी आलो 
कुठे मी चाललो 
सारे विसरलो 
दत्तानंदी ॥

आणले तू बापा 
नेशिल तू बापा
कशाला मी धापा 
टाकू उगा॥

विक्रांतची वाट 
वाटेचा विक्रांत
दत्त संकल्पात 
पडलेली ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, ६ जून, २०२१

शककर्ता

🌷॥ शककर्ते शिवराय ॥🌷
*********
हिंदुभूमीच्या भाळावरती  
आज लागला टिळक 
उभा राहिला तट बुलंदी 
होऊनिया दीन रक्षक 

छत्रपती शिवराय जाहले 
उठली मोहर नभात 
उराउरातील घोष उमटला 
इथल्या कणाकणात 

रायगडावर आज जाहली 
सुवर्ण मंगल पहाट 
परवशतेच्या मिटला अंधार 
दिसू लागली नवी वाट

शतकांचे ते रक्त सांडले 
रणवेदी वर होत आहुती
तर्पण झाले त्या पितरांचे 
पाहता पटी शिवछत्रपती 

ठसा उमटला काळ पटावर 
शककर्त्याचा जय जयकार 
आनंदाचे अन अभिमानाचे 
अजून गारुड मनामनावर


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...