गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

माझे महाराज

माझे महाराज 
बोलता बोलता 
पाणी डोळ्यातून 
ओघळून येता ॥

लागते तहान 
अंतरी तयाची 
जशी की आठव 
लेकीला आईची ॥

त्यांनीच पेरले 
नाम हे अंतरी 
सुखद सुंदर 
अमृत वल्लरी ॥

दिधला जीवना 
सुंदर सुबोध 
अरे परमार्थ 
घडे संसारात ॥

धरणे सोडणे 
टाकने फेकणे 
काही काहीच ते 
येथे न करणे ॥

तार ती जुळावी 
अनुसंधानात 
देह मग कुठे 
का तो पडेनात ॥

लेकीच्या कानात 
सहज सांगते 
बोलता-बोलता 
शहाणी करते ॥

विक्रांत ओवाळी 
जीव तयावर 
ऋण कोटी कोटी 
त्यांचे मजवर ॥
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

श्वान

श्वान
****
येतात कुठून
जातात भुंकून
कारणावाचून
कुठल्याही ॥

एक भुंकताच
भुंकतो दुसरा 
लगेच तिसरा 
गुरगुरे ॥

पण मिळताच 
कुठलेसे हाड 
लाळ घोटतात 
तया दारी ॥

कधी तया मिळे 
मालकाचा दट्टा 
तोंडाचा तो पट्टा 
धारदार ॥

कुई कुई करत 
होते खाली मान 
चाटती गुमान 
पाय त्याचे ॥

तयाची लायकी 
घ्यावी ओळखून 
तयाच्या दुरून 
जावे मग ॥

कोण ते कुणाचे
कुठल्या गावाचे
जगणे तयाचे
अन्नासाठी॥

विक्रांत दत्ताला
शरण तो श्वान
गातो गुणगान 
दारी तया  ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

दादा (माझे बाबा)


दादा (माझे बाबा)
************
(फादर्स डे निमित्त पुन्हा पोस्ट करतो आहे.)

माझा हिमालय 
माझ्या पाठीवर 
प्रेमाची पाखर 
घालणारा ॥
महावृक्ष मोठा 
आकाशी भिडला 
मजसाठी झाला 
सुख छाया.॥
गहन गंभीर 
कृपेचा सागर 
परी लाटावर 
महानंद ॥
उन्नत उत्तंग 
जणू की पर्वत
स्मृतीत सतत 
असणारा॥
विचारी विरागी 
परी संसारात 
प्रारब्ध भोगत
सुखनैव ॥
सधीर गंभीर 
हाची असे थोर 
नाव मनावर 
कोरणारा ॥
उदार विशाल 
प्रेमची केवळ 
औदार्य सकळ 
भरलेला ॥
आम्ही तो भाग्याचे 
तया त्या प्रेमाचे
चाखतो कष्टाचे 
फळे गोड ॥
आम्हाला आधार 
सावली स्नेहाची 
कृपाच देवाची 
अहर्निश ॥
देई जन्मोजन्मी 
हाच पिता देवा 
विक्रांता या ठेवा 
येता जन्म ॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

पाय माघारी वळता


पाय माघारी वळता
***************
पाय माघारी वळता 
जीव खंतावला माझा 
का रे विठ्ठला रुसला 
मज दिलीस तू सजा 

जीवा उदार होऊन 
वाटे चालावे त्या पथी 
कोणासाठी जपू आता 
वाटे ओवाळावी कुडी 

माझे माऊली कान्हाई 
झालो बहुत हिंपुटी
जीव लागेना कुठेच
सहावेना ताटातुटी 

मन जाणे तुजवीण 
जरी रिता  नाही ठाव
देई भक्तांची संगती
डोळा दिसो तुझे गाव 

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

कांगावा

कांगावा
****
पोट भरलेले 
मन बिथरले
जग ते चालले 
जिंकायला ॥

द्वेष डोळीयात
दर्प धमण्यात 
धन खजिन्यात 
भरलेले ॥

आणि ते बिचारे 
अर्धपोटी मेले 
गळास लागले 
आमिषाच्या ॥

एक संकल्पना 
पूजनाची फक्त 
अन मरतात 
कोटी कोटी ॥

चालती बंदुका
चालती संगिनी 
रक्तात न्हावुनि
माणुसकी ॥

माणसा मारतो 
माणूस मरतो 
माणूस  उरतो
मेलेला तो ॥

विक्रांता कळेना 
कळपी कांगावा 
भाऊ म्हणे भावा 
मर आता॥

**:
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 


दत्त चंद्र

 

दत्तचंद्र


*****


संत शब्दांवरी 

आमुचा विश्वास 

म्हणुनि निघालो 

भेटण्या देवास ॥


आम्हा काय ठावे 

कसा काय देव 

निर्गुण असे वा 

लावण्याची ठेव ॥


नामाची ती काठी 

धरुनि हातात 

भर अंधारात 

चाललो ठोकत ॥


त्यांचे उजेडाचे 

गाणे या मनात 

देत असे बळ

माझ्या पाऊलात ॥


नाही कसे म्हणू 

कधी कंटाळतो 

चुकतो थकतो 

निराशही होतो ॥


परी बसताच 

कुठल्या वाटेला 

थोपाटतो कुणी 

सांगे चालायला ॥


सहज शब्दात 

पाजळतो दिवा 

न मागता मिळे 

आश्वासन जीवा ॥


पुन्हा तरारते 

मन पान पान 

नवे गाणे गाते 

अवघेच रान ॥


विक्रांत मनात 

सरू जाते रात 

दिसे मनोहर 

दत्त चंद्र आत 

***********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

उनाड कविता

उनाड कविता
**********

काही उनाड कविता 
येतात माझ्या मनात 
पण मी लिहीत नाही 
बांधून त्या अक्षरात 

येतात अशा धावत 
जातात उगा पळत
सभोवती पदरव 
त्यांचे राहती गुंजत 

सांगा कसे तरंगाना
जावे शब्दात गुंफत 
किणकिणती नुपुरे  
रेखाटावी अक्षरात

त्यांच्या त्या येण्यास कधी 
नसे धरबंध काही 
काळवेळ ताळमेळ 
कधीच बघत नाही 

त्या कधी उगवतात 
गंभीर चर्चा सत्रात 
तणतणत्या बॉसच्या 
डोक्यावरती नाचत 

त्या कधी हुंदडतात 
भर गर्दी बाजारात 
गाडीवर कधी कुठे 
जात असता वेगात 

त्या उनाड असतात 
त्या धमाल करतात 
त्या कधी सतावतात 
त्या कधी हसवतात 

कधी कधी पण खोल 
आत घेऊन जातात 
अन मनास एकटे
तिथे सोडून देतात 

जगणे उनाड होते 
मरणे सुटून जाते 
आकाशाचा तुकडाच
जीवन होऊन जाते 

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...