बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

देह मन






 देह मन

**

खादल्या अन्नाची
उभी असे रास
म्हणतो तयास
देह तरी

येते जातेअन्न 
घडते पचन
पाहते कोण 
असे तया

झाले अवतीर्ण
कुठून हे मन
अहंची घेऊन
खोळ एक

तेच ते नर्तन
घडेआवर्तन
चालवतो कोण
तया इथे

सदा असे दत्त
तया विचारात
आतील पाहात
वाट नवी

विक्रांत अडला
परत फिरला
रित्या घटातला
अवकाश
**

++
  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

मनाच्या भ्रमरा


मनाच्या भ्रमरा 
**********
मनाच्या भुंग्याला
फार भुणभुण
थांबते सुमन
पाहूनिया
.
मनाचा हा भुंगा
करे वणवण
मधाचे सेवन
करण्याला
.
मनाचा भुंगा रे
बहु मिरवतो
सुखाला कष्टतो
रात्रंदिन
.
मनाचा भुंगा न
जुमाने कुंजर
मद गंडस्थळ
चाखायला
.
मनाचा भुंगा
मरे कमळात
थोर आसक्तीत
दबूनिया
.
मनाच्या भ्रमरा
जाय दत्त पदी
काय तू ते अंती
कळण्यास
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

श्री गहिनीनाथ


खेळता गोरक्ष 
घडली करणी 
उद्भवे गहिनी
मातीमध्ये 

भिवून बालके 
भूत त्या म्हणून 
बसले लपून 
घरामध्ये  

तो करभाजन
मच्छिंद्रे जाणून
 
हृदयी धरुन
प्रेम दिले 

घडवून याग
देव संगतीत 
गहिनी पंथांत 
नाथ केले 

गहनीने थोर 
निवृत्ती तो केला 
ज्ञानेश दिधला 
महाराष्ट्रा 

 नाथपंथाच्या या 
गहिनी फांदीला 
बहर हा आला 
वारकरी 

मराठी देश हा 
ऋणी गृहिनीचा 
जिव्हाळा जीवाचा 
पुरविला 

विक्रांत गहिनी
पदास नमतो 
पायधुळ  घेतो 
माथ्यावरी

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

ढोर




ढोर
*****

भरल्या पिकात 
घुसलेली ढोर 
जाळी तोंडावर 
बांधलेली 
.
हवाव डोळ्यात 
खाण्याचा आकांत 
उदंड यत्नात 
व्यर्थ गेली
.
तैसे या जगात 
सुखाच्या शोधात 
जन धावतात 
भाग्यहीन 

पाहून यातना 
जनाच्या मनाच्या
विक्रांत दत्ताच्या 
पायी आला 

हरवली जाळी
सरले वावर 
मनाला आवर 
घालणे ही  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***

जग .अपघात की परमेश्वर संकल्प?

जग .अपघात की परमेश्वर संकल्प?
******::****

या विश्वाची निर्मिती ही कुणी परमेश्वराने केलेली नसून तो केवळ एक अपघात आहे असे मानणारा एक वर्ग या पृथ्वीतलावरती आहे .या मताचा स्वीकार केला असता, एक भयानक पोकळीचा जन्म आपल्या जीवनात होतो .निरर्थका मध्ये जगणारे एक निरर्थक बंडल आपण होवून जातो आणि मग जगणे म्हणजे केवळ भौतिक सुख अनुभवने, आहे ते उपभोगणे आणि मजा करणे .एवढेच त्याचे स्वरूप उरते .
असे असेल तर मग आपल्या मनामध्ये उमटणारी, सर्व जग सुखी व्हावे हि जी कल्पना आहे, इच्छा आहे त्याचे मूळ काय असेल ? सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामया असे जे आपल्याला वाटते ते कुणामुळे आणि कशामुळे? ही सुखाची, प्रेमाची ,आनंदाची, सहकार्याची जी प्रेरणा आपल्यामध्ये आहे ती काय अपघाताची परिणीती आहे काय ?
परमेश्वराचे अस्तित्व कळणे  यांचे सानिध्य जाणवणे व त्याप्रमाणे जीवन जगणे  ही अत्यंत व्यक्तीगत बाब असल्यामुळे ती कोणाला दाखवता येत नाही किंवा तिचा पडताळा हि कुणाला करून घेता येत नाही .तर मग सिद्ध करणे तर अशक्यच.
त्यामुळे या अपघाताचा दावा करणाऱ्या कोर्टामध्ये, साक्षी पुरावे उपलब्ध न होऊ शकल्याने, परमेश्वर नाकारणाऱ्यांच्या नेहमीच जय होतो असे दिसते .
दुसरे असे की आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण देव संकल्पनेपर्यंत जाऊन पोहोचलो कि मग पुढे तो देव शोधणे एवढे एकच काम उरते .अर्थात हे काम मग प्रत्येकालाच झेपतेच असे नाही अगदी पटले तरीही !
त्यामुळे अपघात संकल्पांना मांडणाऱ्यापुढे तू तुझे धरून ठेव नि मी माझ्या मार्गाने जातो अशीच भूमिका घ्यावी लागते  .

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

दत्ता माझ्या भाळावर





दत्ता माझ्या भाळावर 
कृपेची अक्षर 
रेखाटली अपार 
दया तुझी ॥

दत्ता माझ्या जगण्यात 
दाटलेल्या काळोखात 
पेटवली फुलवात 
प्रेमे तूची

अगदीच हट्ट नव्हता 
परी तूच हवा होता 
हळूवार या चित्ता 
आलास तू ॥

सदा पायी असू दे रे 
तुझ्यासाठी जगू दे रे 
गांजल्यांना दाऊ दे रे 
तव पायवाट ॥

सुखावला विक्रांत 
दत्त आला जगण्यात 
राहे आता गाणे गात
तयाचिच मी॥

  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

अपघात



अपघात
******

सकाळपासून रात्रीपर्यंत
लोक असतात धावत

कुणीही कुणाला
नाही ओळखत
या शहरात

नाही म्हणजे
तरीही सगळी
माणसे असतात
शिकलेली सुसंस्कृत
उच्च पदस्थ
पण आता फक्त
गर्दी असतात

एका मागून एक
गाड्या येत असतात
पुढे जायचे असते
प्रत्येकाला
केवळ पुढे
पण कसे जणू याच चिंतेत
सारे अस्वस्थअसतात

अन मिळताच सिग्नल
सारे सुसाट पळत सुटतात


रस्ताही हरवत नाही
गाड्याही संपत नाहीत


होतो अचानक एक अपघात
अन् चाके सगळी थांबतात
आई गं बाप रे अर्रेरे
चित्कार जिवंत उमटतात

सुन्न होतात काही
तर काही
पुन्हा चालू लागतात

बंद दरवाजे काही मनाचे
उघडणे विसरले असतात


तास काही मिनिटांतच
रस्ता साफ होऊन जातो
तोच धूर तीच धूळ
पुन्हा श्वास बधीर होतो


अन त्या गदारोळात
जीवन मरणाच्या या संघर्षात
कुणासाठी कुणी तरी
आपला जीव धोक्यात घालतो
मरणाच्या दारातून
कुणी कुणाला खेचून आणतो

मानवतेचा मंगल एक
प्रकाश सर्वत्र पसरतो
एका अनाम ऊर्जेचा
स्पर्श प्रत्येक मनास होतो

तेव्हा
...

फूटपाथच्या सिमेंटी रुजलेला
एक पिंपळ हळूच हसतो

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...