गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

उधारी

   


उधारी
 *******

दत्ता जीवनाचे 
कर काहीतरी 
अवघी उधारी 
मिटव  रे

कधीची ही किती 
मज ना माहिती 
नको चक्रवाढी 
गुंतवू रे

तसा तर कधी 
नव्हतो पुढारा 
मिरविता दारा 
देवा तुझ्या 

पण कधी तरी 
असेल पाहिले 
चित्ती ठसविले 
दासासी या 

तसा फार काही 
नच उपयोगा
आलो तव योगा 
दया घना

म्हणूनिया रुष्ट 
होणार तू नाही 
खात्री मज ही 
आहे पूर्ण 

श्रीदत्त माऊली 
प्रेमे तू ओतली 
विक्रांत जवळी 
घेई आता



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

दत्त ओळख

 
 
 
दत्त ओळख
********

दत्त भरल्या डोळ्यात
जग अंधारले काळे
मोह सर्पिनीचे मुख़
झाले जहर सांडले .
.
दत्त स्मरता मनात
तुटे मुद्द्ल पटाचे
पोटी सुखावती लाटा
किती उमाळे हर्षाचे
.
दत्त ओळख अंधुक
गळा घालतसे मिठी
गंध चाफ्याचा मधूर
झाला शहराची उटी
.
दत्त वाटेने चालता
काटे पथाने गिळले
माय अंथरी पदर
कैसे सोनुले चालले
.
स्वप्न सत्यात पहाट
ओली जाहली डोळ्यात
थेंब विक्रांत सांडला
दत्त पदी सुमनात
*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

आमिषे


आमिषे
******
फोनवर फोन
 येती दणादण
नकोसे जीवन
होत असे ॥
नाही देणघेण
नाहीच मागण
जीवा भणभण
तरी होय ॥
ऎसे मुर्खपण
डोक्यात शिरते
व्यर्थ कुणाकडे
सांगावे का ?॥
अहो मज नको
तुमचे ते काही
सुखात मी राही
माझ्यातल्या ॥
नसे लागभाग
कसली हवाव
अंतरात देव
सदा तृप्त॥
नको ती आमिषे
नको भलावण
दत्त राये मन
भरलेले ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

दान


दान
****
कृपाळू होऊन
दिले तू जे दान
सुखाने भरून
पावलो मी ॥
दिलीस ती शांती
मनो गाभाऱ्यात
प्रेम प्रकाशात
नांदतो मी ॥
झालास सोयरा
भार वाहणारा
कृतज्ञ दयाळा
जाहलो मी ॥
आता कुठे जावे
वाया वणवण
दत्ताचे चरण
पाहिले मी ॥
उमजून माया
मैत्रीत रुजलो
अवघा राहिलो
भरून मी ॥
विक्रांत सुजान
करुनी सोडला
पायी बसविला
सुटून  मी ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दत्ता भार माझा



दत्ता भार माझा
********* ***
दत्ता भार माझा
किती रे वाहसी
सदा सावरीसी
पडताना ॥
काय माझे पुण्य
केवढे से तप
परी सुखरूप
ठेवीसी तू ॥
भक्त सागरात
कुण्या कोपऱ्यात
तुजला स्मरत
राहतो मी ॥
परि त्या स्मरणी
जाहला तू ऋणी
देतो किती देणी
भरूनिया ॥
मायबाप माझा
सखा तू सोबती
जडली रे नाती
तुझ्या ठायी ॥
कळे ना मजला
तुझी कृपा दत्ता
लोळतो मी पदा
सदा तुझा ॥
ठेव दृढ पायी
तुझा तू विक्रांत
नच उधळत
जावो कुठे ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

येशील ना?



येशील ना
*******:

लोहाचे सुवर्ण
करिसी तूं देवा
देई ज्ञान ठेवा
मुढासही ॥
मृतासी दातारा
देई संजीवन
अभाग्य मोडून
कुणाचे ते ॥
विकारी मरतो
तया वाचवीशी
दया दान देसी
कृपा करे ॥
यवन संकटी
पडे प्रिय भक्त
तया अलगद
सोडविशी ॥
अनाथा सनाथ
भक्तांची तारक
दुर्जना मारक
सदोदित ॥
ऐसी तुझी कीर्ती
म्हणूनिया आर्ती
उरि या विक्रांती
उठे मोठी ॥
येशील ना दत्ता
कधी माझ्यासाठी
संपण्याच्या आधी
श्वास माझे ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मिनाक्षी झांजे मावशी




मिनाक्षी झांजे मावशी
**************
प्रसन्न चित्त
निर्मळ स्मित
कामात  सत त
मग्न अशी ॥

मीनाक्षी मावशी
सर्वांची लाडकी
सर्वांशी भावकी
असे तिची

नाही बडिवार
नाही अहंकार
नम्र व्यवहार
सदा असे

फुलांचा गंधात
छान गजऱ्यात
करे सभोवत
प्रसन्नसे

कष्टाचे दिवस
सदा स्मरणात
वदे धन्यवाद
दया घना

अशा या व्यक्ती
जीव लावतात
मनी राहतात
विक्रांतच्या


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...