गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

अंत व्हावा




अंत व्हावा
******

तुझ्या पायांवरी
देहाचा या अंत
व्हावा भगवंत
मागणे हे ॥॥

सरो ही कहाणी
तुझ्या स्मरणात
प्राणांची ही ज्योत
विझूनिया ॥

बहु मोजले मी
श्वास जगतात
तव विरहात
दत्तात्रया ॥

वाहिले रे ओझे
प्रारब्ध कर्माचे
किती वाहायाचे
अजून हे ॥

मालवून टाक
दीप तू स्वहाते
शून्याच्या पहाटे
हलकेच ॥

विनवी विक्रांत
पुरे झाले जीणे
देवा लाजिरवाणे
तुजविन ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

टेंबे स्वामी


॥ टेंबे स्वामी ॥
***********

शिकवली भक्ती
करुनिया कृती
वैराग्याची मूर्ती
टेंबे स्वामी ॥
तुम्ही दिले भक्ता
मधु शब्द ओठी
आळविण्यात प्रीती
दत्त प्रभू ॥
महाराज स्वामी
महाकृपा केली
शब्दांत रचली
भाव मूर्ती ॥
व्हावे उतराई
तरी शक्य नाही
खरे तर नाही
इच्छा ती ही ॥
तुमच्या भक्तीचा
कण  व्हावा माझा
हीच एक वांच्छा
मनी असे ॥
नमितो विक्रांत
वासुदेवानंदा
दत्त भगवंता
पुनःपुन्हा 
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

वेडी बया



वेडी बया
*******
ती एक वेडीच
अति मूर्ख बया
नाचे थयथया
डोक्यावरी ॥
काय तिज हवे
कळेना मजला
घोरची जीवाला
लावितसे ॥
उधळिते जन्म
गरज नसून
येतसे धावून
भ्रमात चि .॥
करीतसे हट्ट
हक्क तो नसून
जाते बजावून
काही बाही ॥
कुणीतरी सांगा
तिला वेडाबाई
मूढ घरी राही
अज्ञानाच्या॥
बोलावितो  जिस
तिचा न हुंकार
हाक हाके वर
हिचे असे ॥
अशी अवधूता
करशी का थट्टा
अडव रे वाटा
तिच्या आता ॥
कोंडुनिया घाली
हवे तर बळे
मजला मोकळे
राहू दे रे ॥
ऐकू दे मनात
निजलेले गाणे
शारद चांदणे
लपेटून ॥
स्मृतींच्या पखाली
साठवली गाणी
गुढ आळवणी
सदोदित ॥
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

मच्छिंद्र नाथ



मच्छिंद्र नाथ
**********
काठावरती तडफडती
मत्स्य पाहुन द्रवला जती

क्षणभंगुर हे जीवन किती
आले त्यांच्या क्षणात चित्ती

सुवर्ण क्षण तो मग वेचूनी
चालू लागला साधना पथी

घोर कष्टाला तपात बहुती
होय अर्ध्वयु  मग नाथपंथी

आदिनाथबीज हृदयी पडले
अवधुताने त्या प्रेमे सिंचले

वटवृक्ष ये आकार बीजाला
अगणित जीवा ठाव मिळाला

जातीभेद ते सारे मिटले
 वर्णपंथ अन एक जाहले

मानवतेच्या पायावरती
देवुळ एक उभे राहीले
**
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दत्ताची ती गोडी



दत्ताची ती गोडी
************
दत्ताची ती गोडी
नसे साखरेला
नसेच मधाला
कण भरी॥

दत्ताचा सुगंध
नसे गुलाबाला
नयेच चाफ्याला
काही केल्या॥

 दत्ताचा प्रकाश
 लाजवी चंद्राला
 शिणवी सूर्याला
 क्षणमात्रे ॥

दत्ताच्या कीर्तनी
विमुक्त रागिनी
गंधर्व गायनी
लाजतात ॥

दत्ताच्या प्रसादी
अमृत थोकडे
रस होती वेडे
सारे जणू ॥

सुखाचा सोहळा
दत्त माझा झाला
इंद्रियांचा गेला
बडीवार ॥

विक्रांत सुखाने
पुष्ट हा जाहला
दत्तात निमाला
आवडीने ॥

(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

धाड बा मुळाला




धाड बा मुळाला
***************

रोज किती पत्र
धाडावी तुजला
त्याच त्या शब्दाला
गिरवावे
रोज किती हाका
माराव्या तुजला
शिणल्या कंठाला
सुकवावे
काय तो तुजला
ये ना कंटाळा
विषम स्वराला
ऐकताना
किंवा तुजला का
लागलीसे गोडी
अक्षर हि वेडी  
आवडती   
जीव परि माझा
जाई दत्तात्रेया
धाव रे कृपया
जीवलगा
विक्रांत थकला
वाटेला बसला
धाड बा मुळाला
लवकरी

००००००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

म्हातारा

म्हातारा
******

भयान राती
उजाड पथी
टाळून वस्ती
जाई म्हातारा

कंदील हाती
लाकूड काठी
देहावर ती
घट्ट कांबळी

खोल डोळे
गुहे मधले
ओठावरले
जंगल मोठे

कुठे चालला
या वेळेला
भय सांडला
नच कळे

झपझप झाले
कंदील हले
खडखड बोले
पायी वाहाण

वाट तयाची
जणू रोजची
युगायुगांची
असावी ती

डोळे चिमुकले
खिडकी मधले
होते जुळले
त्यास कधी

गूढ आकृती
कंदील स्मृती
अजून मना ती
रुंजी घाले

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...