रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

तुझी आठवण




तुझी आठवण
किती विलक्षण
मजला सोडून
जात नाही ॥
मनी भरलेले
झुकलेले डोळे
स्मरणी भिजले
येत राही ॥
तुझे बोलावणे
तुझे थांबवणे
तुझे ओढावणे
मुग्ध किती ॥
धुक्यात दडले
दवात सजले
अर्थ नसले
वेडे गाणे ॥
तरीही म्हटले
देही आसावले
अतृप्ती सजले
पुन्हा पुन्हा ॥
जरी आता नाही
घेणे गाठी भेटी
मन तळवटी
फुलांची तू ॥
००००००

© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

दत्त दिसो मज


दत्त दिसो मज
भरला जगात
अवघ्या रूपात
नांदणारा ॥
दत्त स्मरणात
जाऊ माझा दिस
विषयाचे विष
स्पर्शू नये ॥
नांदावा सकल
संतांचे संगती
उलटून दिठी
पाहण्याची ॥
वाहती प्रवाह
तमाचे भ्रमाचे
व्हावे नच त्यांचे
कधी काळी ॥
आणखी विक्रांता
नलगेच काही
सदैव तू राही
हृदयात ॥


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

. . .ना चि





. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि

आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि

काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि

कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि

इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि

निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि

आजचा उद्याला
देऊन हवाला 
प्रश्न जडावला
मिटेनाचि

०००००००


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

दत्ता येई रे





दत्ता येई रे
मज पाही रे
पदी देई  रे
ठाव आता ॥
 कर घाई रे
वेळ नाही रे
प्राण जाई रे
मम आता ॥
जन्म सरला रे
यत्न चुकला रे
देह थकला रे
भवरोगी ॥
नच लायक रे
मूर्ख बालक रे
तरी दुर्लक्ष रे
करू नको
घट फुटू दे रे
नभ सुटू दे रे
प्रश्न सुटू दे रे
मुळ रुपी ॥
येई धावत रे
कृपा विक्रांत रे
असे मागत रे
स्मर्तृगामी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com
०००००००

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

वस्त्र




वस्त्र
*****

वस्त्र विटले
वस्त्र फाटले
अस्तित्वास हे 
प्रश्न पडले

नवे कालचे
आज जुनेरे
उद्या होईल
बघ पोतेरे

तर मग हा
व्याप कशाला
अर्थ काय रे
या जगण्याला

प्रश्न असले
वांझ मनीचे
पुन्हा उठले
शांत तळीचे

शोध घेऊन
जीव थकला
दत्त पदाशी
येत थांबला

दे बा उत्तर
येत सत्वर
होणे मग ते
होवो नंतर

तुझा विक्रांत
उभा तिष्ठत 
तव दारात
तुज स्मरत 

© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

श्रीपाद गणेश



श्रीपाद गणेश
**********

आकाश प्रकाश
माझा देव गणेश
श्रीपाद वल्लभ
घेऊनिया वेष ॥
येई भादव्यात
चतुर्थीला थेट
मंगल सुखाची
करी लयलूट ॥
काय काय मागू
माझ्या दैवताला
जय लाभ तर
असती नखाला ॥
धन मान रूप
नको बाबा मला
सदा राहू दे रे
तुझिया पदाला ॥
बघू दे रूपाला
स्तवू दे गुणाला
ओठ करू देत
नाम गर्जनेला ॥
याहून अधिक
नच उरो चित्ता
म्हण रे तू बाप्पा
तुझा या विक्रांता ॥

(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in‍

सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

श्रीपाद वल्लभा


श्रीपाद वल्लभा
************
श्रीपाद वल्लभा
प्रभू दत्तात्रया
माझिया हृदया
वास करा ॥१॥
जैसी कृपा केली
भाबड्या रजका
तैशी या बाळका
वरी करा ॥२॥
परी नका देऊ
जन्म यवनाचा
धनाचा मानाचा
कधी काळी ॥३॥
जैसे ज्ञानी केले
मूढ ब्राह्मणाला
तुझिया कृपेला
प्रार्थी तैसा ॥४॥
जेणे तुझे प्रेम
सदा लागे वाढी
संसार आवडी
सुटूनिया ॥५॥
विक्रांत भक्तीचा
दारात मुकाट
पडावा दृष्टीत
तुझ्या प्रभू ॥६॥
.
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in‍

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...