मंगळवार, २३ जुलै, २०१९

दत्त स्वप्न



दत्त स्वप्न माझ्या
पडे जगण्याला
अर्थ असण्याला
आणे काही

दत्त स्वप्न वांछी
स्वप्न सुटण्याला
स्पर्श नसण्याला
करण्यास

स्वप्नी मिसळून
जावे हरवून
सिंधूशी लवण
जैसे काही

स्वप्नी समर्पण
इंधन होऊन
जावे हरवून
स्वाहाकारी
पडो क्षणोक्षणी
स्वप्नाचे हे स्वप्न
पाहण्यास मन 
उताविळ

स्वप्न विक्रांतचे
काय असे त्याचे
काम  पाहण्याचे
दत्ता सुखे 



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



सोमवार, २२ जुलै, २०१९

त्यातीलच एक


त्यातलाच एक  
*********
जगत आधारा 
परम कृपाळा 
म्ह्णती  उदारा 
तुज सारे 

म्ह्णुनिया मग 
तीच ती अक्षरे 
ओठी मीही धरे  
आशेने रे 

जगतो सुखात 
चौकोनी घरात 
आखीव जगात 
नीटपणे

परि का मनात 
उदास आकाश 
अतृप्ती आभास  
कोंडलेला 

कितीक जणांचे 
असेच जगणे 
आणून उसने 
वसान 

त्यातीलच एक   
करू नको मला 
किनारी बसला 
भयभीत 

विक्रांत तयार 
बुडाया तराया 
येण्यास तुझिया
तीरास त्या 


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 


रविवार, २१ जुलै, २०१९

चंदन शेजार






चंदन शेजार
***********
पाहीला मळला
झर्‍याचा ओघळ
पापाचे काजळ
लेऊनिया ॥

पाहिले निर्व्याज
जळलेले मन
अहंता भरून
वाहणारे ॥

सुखाच्या शोधात
हरवून पथ
धावते सैराट
भोगी मन

नको देऊ मज
अशी अधोगती
सदा अवधूती
वृती ठेव ॥

विक्रांता शेजार
देई चंदनाचा
संत सज्जनांचा
सर्व काळ ॥

मग मी निर्धास्त
पंकज पंकात
राहिन स्मरत
तुज दत्ता॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

शनिवार, २० जुलै, २०१९

तृषार्थ पथिक




अवधुता विना
काहीच सुचेना
मन हे रमेना
अन्य कुठे ॥
चातकाची चोच
जाहले जगण
भेटावे जीवन
तया कैसे ॥
कासावीस जीव
लागली तहान
थिल्लर सेवन
घडेचिना ॥
कोसळ बा दत्ता
होय दयाघन
मज तुजविण
अन्य नाही ॥
विक्रांत युगाचा
तृषार्थ पथिक
आसरा क्षणिक
हृदयी दे ॥



शुक्रवार, १९ जुलै, २०१९

चिंचा

चिंचा
*****
चिंचा चावता चावता
जीभ वेडावली काही
दात आंबले तरीही
नाही म्हणवत नाही

काही मधुर गोडस
कण रेंगाळती कुठे
असे विचित्र मिश्रण
जीव तयावरी जडे

लाल तपकिरी रंग
एक वेगळा सुगंध
तया स्मरता मनात
जीभ टाळूत हो बंद

वृक्ष थोराड प्रचंड
कोटी पानांचे जगत
तिथे असतात भूत
कधी खरं न वाटतं

फळ आम्र चिकू केळी
जरी मधुर चविष्ट
चिंच सम्राज्ञी रसांची
करी स्मरणे प्रकट
**
दत्त तसाच तो माझा
साथी सदैव सुखाचा
बाळ तारुण्य वार्धक्यी
असे रसनेचा राजा

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १८ जुलै, २०१९

जीवन पाहावे दत्त रुपे




मरणा आधीचे मरण

****************





मरणाचे वाटे

जगणे चालते

कधी ना थांबते

चक्र तिथे ॥



राजाही धावतो

त्याच त्या पथाने

साधूंचे चालणे

घडे तैसे  



रंकही संपतो

धनिक मरतो

वाट्याचा सरतो

काल तेव्हा ॥



मरण थोरले

भरून राहिले

जगाने पाहिले

जरी इथे ॥



मरण शब्दही

ओठां न आणती

कैफात जगती

लोक इथे



मरणा आधीचे

मरण कळावे

जीवन पाहावे

दत्त रुपे ॥



म्हणूनी विक्रांत

अवघे सोडतो

पावुला धावतो

दत्ताचिया ॥



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍



००००००






बुधवार, १७ जुलै, २०१९

खुंटली रे धाव




आता या मनाची

खुंटली रे धाव

मिळवण्याची हाव

धन मान ॥



हौस भोगण्याची

देवे पुरवली

जपून वाढली

सुखे सारी ॥



दिले ना तुपाशी

अथवा देहासी

ठेविले उपाशी

कधी काळी ॥



अनित्य ती नीट

दावियेले दिठी

वळवली दृष्टी

अंतर्यामी ॥



आता त्या दारात

विक्रांत हा शांत

मिळे जे हातात

घेतो सुखे ॥

०००



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...