सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

आत्मघर (आळंदीत ...)




आत्मघर  (आळंदीत ...)

सुखाच्या माहेरी ।
आले गे मी माय ।
देखियले पाय । 
अरुपाचे ।।
गर्दीच्या लोटात ।
भेट दो क्षणात।
रंगले थेंबात । 
अमृताच्या  ।।
जाहले व्याकुळ ।
दुणावली आस ।
स्वरूपाचा ध्यास ।
दृढावला ।।
सासर माहेर । 
व्हावे आत्मघर ।
जाणिवेचे द्वार ।
उघडून ।।
माऊली तुजला।
एकच मागणे
सरो येणे जाणे ।
पुनःपुन्हा ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

शब्द
















शब्द
****


कुठली तरी एक कल्पना
कुठला तरी एक विचार
प्रकट होतो डोक्यात
उमलतो हृदयात
एक स्फुल्लिंग होत

शब्द जणू  असतात
वाट पाहत
अन पडतात
येऊन धडाधड
जणू समिधा होत

ज्ञानदेव नामदेव तुकाराम
समर्थ एकनाथ चोखोबा मुक्ताई
असे मायबाप उभे असतात
पाठीमागे
घेऊन आपली शब्दसंपत्ती
इतकी की
माझे दोन्ही हात अपुरे पडतात

पाडगावकर विंदा इंदिरा संत
शांताजी आरती प्रभू कुसुमाग्रज
वैद्य सुर्वे ढसाळ आणि बापट
आणि किती एक
परममित्र होत
दाखवतात मला वाट
उघडतात नवनवीन गुपित
कवितेच्या जगातील
शब्दांच्या विभ्रमाची
भावनांच्या प्रकटीकरणाची

खरंच या कवितेच्या जगात
खूप श्रीमंत आहे मी
असे क्वचित कुणी असतात
हे ही जाणून आहे मी

इयत्ता चौथीत लिहलेल्या
पहिल्या कवितेपासून
पन्नाशी उलटूनही तरीही
वाहणारा हा शब्दांचा प्रवाह
हि आकाशगंगा
मला टाकते भारावून
स्तिमित करून

भेटणारा प्रत्येक नवीन शब्द
वाटतो एक नवे नक्षत्र
अन मग मी त्याचा वेध घेत
पाहतो त्यास कुतुहलाने
राहतो निरखीत आनंदाने

हे वेड मला मिळालेय
वारसा म्हणून
माझ्या वाडवडिलांकडून
मुक्तेश्वरापासून
माझ्या छोट्या इशानपर्यंत
आलेले उतरून
म्हणूनच शब्द हेच माझं विश्व ,
वंश धर्म अन् जात आहे
हे मी सांगू शकतो अगदी ठासून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

दुआ



दुआ
****

इतनी सारी दुवाए लेकर
जाएंगा कहाँ साले
म्हटला मित्र हसत तेव्हा
मलाच नवल वाटले

करताच कुणाला मदत
थोडस सैल होत
नियमात राहूनच
नियमांतून वाट काढत

मिळते एक पोच
कृतज्ञ नजरेतून
सापडल्यागत तुळस
भांगेच्या झुडपातून

तेवढेच बस असते यार
जगताना माणूस म्हणून 
आपणहीआलेलो असतोच की
त्या जगात ठोकरा खाऊन

एक ठोकर कुणाची जर
चुकलीच आपल्याकडून
तेव्हा खरे तर आपणच
आपल्यात जातो आनंदून

त्या इवल्याश्या आनंदाच्या
इवल्याश्या लोभानं
येते हे सारे घडून
एकदा तरी बघ यार चाखून

कारण याची नशा जर
लागलीच कधी कुणाला
तर मग राहत नाही तो
त्या पत्थरांचा जगातला ।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

संत सुमन।



****

संताचिया द्वारी 
फुलले सुमन 
तयावरी मन 
माझे गेले ।।

पडावे पदरी 
ओढ लागे मोठी 
आसावली दिठी 
पाहण्यास ।।

किती त्यास वाणू 
करू गुणगान 
अवघा भारून 
जन्म गेला ।।

कुठल्या जन्माची 
असे ही ओळख 
विरह काळोख 
साहवेना ।।

भुक्ती मुक्ती सुख 
नका दावू कोड 
जीवीची आवड  
पुरवा जी ।।

देईल त्या मिठी 
ठेवेल अंतरी 
पाहील नजरी 
एकटक ।।

भक्तीचा ओढाळ 
विक्रांत नाठाळ 
करतो कल्लोळ 
रात्रंदिन ।।



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

दरी


दरी
****

लाल डोंगराच्या खाली
असे अंधार साचला
नसे वाटकरी कुणी
खाली गेला तो संपला

हा हा खेचतो उतार
वारा घेतसे ओढून
कुणी फेकल्या देहाचे
भान असे का अजून ?

युगे लोटली संपली
मौन संन्यस्त पत्थर
कुण्या मितीचे हे जीव
इथे करिती वावर ?

इथे असेल पुरले
सोने चांदी लुटलेले
कुणी केल्या कत्तलीचे
हात उजेडी धुतले

खाली कोसळे धबाबा
जग जिवंत हे सांगे
कुण्या वेड्या पावुलांची
आस कुणास का लागे ?


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

स्वानंद



स्वानंद

माझ्या मी पणात
प्रकाशाची ज्योत
राहते तेवत
स्वानंदाची ।।

मायेचे ओढाळ
मोहाचे वादळ
असून खळाळ
दुःखाचा ही ।।

तिला नसे वात
तेलाची वा साथ
तरी दिन रात
तेजाळली ।।

तिच्या प्रकाशात
जगण्याची वाट
राहते वाहत
अहो रात्र ।।

प्रभू गिरनारी
दावीयली युक्ती
स्थिरावली दृष्टी
अंतरात ।।

पाहता पाहणे
प्रकाश हे झाले
कुणी न उरले
पहावया

उसिटा विक्रांत
ठसा हा अस्पष्ट
श्रुतींच्या देशात
मौन झाला ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

तिचे चिडणे



तिचे चिडणे
*******

ते तिचे चिडणे
किती लोभस होते
फुलबाजीचे जणू
तडतडणे होते

जाळही होता त्यात
लोभही होता त्यात
रंगांची ती आरास
संतोष होता त्यात

काही क्षणांचे ते
होते तडीती येणे
दीपवून तनमन
पुन्हा विरून जाणे

म्हटले तर होते ते
कधी जीव जाणे
म्हटले तर होते
आयुष्य ओवळणे

प्रेमा तुझा रंग हा
किती दाहक सुंदर
जीव अधिक जडतो
तुझ्यामुळे प्रियेवर


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in






रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...