सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

वृंदा



वृंदा
***** 
वृंदा तुला करायचं होतं का
लग्न विष्णूशी कधी
जालिंदरचा मृतनंतर ?
तू सती गेली 
त्याच्या प्रेमासाठी 
देहा चे बलिदान करून 
प्रेमाचा तात्कालीन 
अंतिम उद्गार 
वास्तवात आणून
पण तुझ्या मृत्यूनंतर 
बलिदानानंतर ही 
त्यांनीतोडून टाकला
तुझा अन् जालिंदरचा संबंध 
कायमचाच
त्यावर घालून 
प्रभू प्रेमाचा आवरण 
आणि आम्ही मिरवतो आहोत 
देवाचे दुष्कृत्य पुन्हा पुन्हा
आणि करतो आहोत 
विटंबना तुझी पुन्हा पुन्हा 
हे पतिव्रते प्रेम सरिते 
तुळसे माये 
त्याबद्दल आम्हाला क्षमा कर
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मौन 2



मौन
*****

वक्त्या विन बोले
श्रुती विन डोले
मौनाला फुटले
धुमारेच

वृक्ष सळसळ
काही काकरव
तृणांचे पालव
दिसे आत

वाटे घडू आले
वाटे कळू आले
दोनच पावले
फक्त आता

येता गंध कळे
दडले सुमन
स्थिरावता मन
मौन गळे

मी आणि मन
दृष्य नी दर्शन
प्रवाह दाटून
एक झाले

दत्ताचा प्रसाद
झरे अंतरात
विक्रांत नभात
शून्य झाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

माझेपण



माझेपण

माझेपण मीच
पाही एकटक
उठले बालक
जैसे काही

नवल जगाचे
नवल स्वतःचे
नसल्या पणाचे
उमटले

स्वप्न जागे झाले
स्वप्नी हरवले
स्वप्नात चालले
सारे  काही

जाहलो तटस्थ
चालल्या दृश्यात
थेंब पाण्यात
तैल एक

क्षणी स्थिरावून
उगे जागेपण
क्षणाचे चलन
क्षणी पाहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

षडदर्शन





षडदर्शन

शब्दांचे हे ज्ञान
घनदाट रान 
संताचे वचन
असे साच

एकेक दर्शन
करती भांडण
कळल्यावाचून
मुढ मीच

सांख्यांची प्रकृती
पुरुषाचा भेद
खुळावती वेद
जाणूनया

योगाची ती वाट
बहु अनवट
जातो घसरत
पदोपदी

वेदांताचा रस
गमतो अद्भुत
हाता न लागत
काही केल्या

न्याय दर्शनात
तर्काची तलवार
चाले तयावर
कोण बाबा

वैशेषिक मांडे
नीती भेद थोर
लोक इहपर
उठा ठेव

सांगे मिमांसा ती 
धर्म करणीय
यज्ञ गहणीय
आचराया

वाचून कृपेच्या
व्यर्थ खटपट
धरे गुरुपद
म्हणोनिया

ठेव रे दातारा
शब्द मूढ मन
भक्तीचे भोजन
करावया

शब्दांनी वाकला
विक्रांत थांबला
सांगतो जगाला
दत्त भजा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

पैलतीरी



पैलतीरी
*****

पैलतीरी  काठावरी कोण बाई उभा ग ॥
पाहीले मी स्वप्नी तेच रूप दिसे ग ॥
सावळाच रंग त्याचा केस कुरळे ग ॥
वनमाला शोभे गळा जणू देव भासे ग ॥
डोळीयात ओळखीच्या दाट खुणा ग ॥
हरपले भान माझे झाले तदाकार ग ॥
मनामध्ये वाहे  जसा ओघ आनंदाचा ग ॥
पुलकित काया आज जणू रूप सुख ग॥
सरे जणू तृषा माझ्या जन्मोजन्माची ग॥
माझ्यातली मीच दिसे मज दृश्य रूप ग ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

मौन



मौन

मी तुझ्या दारात मौन
तू माझ्या मनात मौन

जगण्याच्या नाटकात
विखुरल्या प्राक्तनात
मी तुझ्या सुखात मौन
तू माझ्या दुःखात मौन

अवकाळी पावसात
चिंब भिजल्या क्षणात
तुझिया डोळ्यात मौन
माझ्याही ओठात मौन

दुरावता वेड गेले
पापण्यात स्वप्न ओले
उमलते गीत मौन
उरीचे संगीत मौन

आता कुणा काय मागू
गुज अंतरीचे सांगू
दाटले नभात मौन
गोठले शब्दात मौन

मोकळेच हात होते
घेणे देणे सारे रिते
विरही स्पर्शात मौन
उरले मौनात मौन


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

तेच ते तरिही



तेच ते तरिहि

तेच जग तीच माणसे
तोच साचा तेच खेळणे
तरी किती वेगळे आहे
काळ जाता नवे जगणे

तीच माती तेच आकाश
तीच झाडे हिरवी पाने
परि मनी गुंजत नाही
तेच मुक्त सढळ गाणे

कुठे काही आलो ठेवून
निल नभातील चांदणे
व्रण दुखले तरी आत
आता गुमान कण्हणे

तोच तो एकांत इथेही
पण नाही सळसळणे
ती छाया औदुंबराची
नि कुणाचे मुग्ध हसणे

हे हि जगणे आहे बरे
पण ते होते हरवणे
झाल्यावाचून कुणाचे
दु:खात सुखे खंतावणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...