शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

पैलतीरी



पैलतीरी
*****

पैलतीरी  काठावरी कोण बाई उभा ग ॥
पाहीले मी स्वप्नी तेच रूप दिसे ग ॥
सावळाच रंग त्याचा केस कुरळे ग ॥
वनमाला शोभे गळा जणू देव भासे ग ॥
डोळीयात ओळखीच्या दाट खुणा ग ॥
हरपले भान माझे झाले तदाकार ग ॥
मनामध्ये वाहे  जसा ओघ आनंदाचा ग ॥
पुलकित काया आज जणू रूप सुख ग॥
सरे जणू तृषा माझ्या जन्मोजन्माची ग॥
माझ्यातली मीच दिसे मज दृश्य रूप ग ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

मौन



मौन

मी तुझ्या दारात मौन
तू माझ्या मनात मौन

जगण्याच्या नाटकात
विखुरल्या प्राक्तनात
मी तुझ्या सुखात मौन
तू माझ्या दुःखात मौन

अवकाळी पावसात
चिंब भिजल्या क्षणात
तुझिया डोळ्यात मौन
माझ्याही ओठात मौन

दुरावता वेड गेले
पापण्यात स्वप्न ओले
उमलते गीत मौन
उरीचे संगीत मौन

आता कुणा काय मागू
गुज अंतरीचे सांगू
दाटले नभात मौन
गोठले शब्दात मौन

मोकळेच हात होते
घेणे देणे सारे रिते
विरही स्पर्शात मौन
उरले मौनात मौन


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

तेच ते तरिही



तेच ते तरिहि

तेच जग तीच माणसे
तोच साचा तेच खेळणे
तरी किती वेगळे आहे
काळ जाता नवे जगणे

तीच माती तेच आकाश
तीच झाडे हिरवी पाने
परि मनी गुंजत नाही
तेच मुक्त सढळ गाणे

कुठे काही आलो ठेवून
निल नभातील चांदणे
व्रण दुखले तरी आत
आता गुमान कण्हणे

तोच तो एकांत इथेही
पण नाही सळसळणे
ती छाया औदुंबराची
नि कुणाचे मुग्ध हसणे

हे हि जगणे आहे बरे
पण ते होते हरवणे
झाल्यावाचून कुणाचे
दु:खात सुखे खंतावणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

दत्त कृपेची चादर


********
माझ्या भग्न मनावर 
दत्त कृपेची चादर 
आल्या भरून जखमा 
फुल नवे वेलीवर 

झाले आभाळ हे मन 
धरा इवली जीवन 
एक बिंदूला अफाट 
नाव घेई रत्नाकर 

कुणी बांधल्या घाटाला 
कृष्णा धावते निवांत 
डोळा पाहण्या रुपास
होते एकेक लहर 

तुवा दिधले तयास
जपे काळजाच्या आत 
मन सुख चांदण्यात 
चंद्र मण्याचा पाझर 

नको विचारूस मना 
आला विक्रांत कुठून 
नाव गावाचा आकार 
गिळे शून्याचे विवर 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

बाप्पा निघता



बाप्पा निघता
********

बाप्पा निघता गावाला 

डोळे पाण्याने भरले 
दहा दिसांचा सोहळा 
दहा निमिष गमले ॥

का रे येतोस तू असा 

वेड लावतो जनाला 
जातो जलात विरून 
घोर लागतो जीवाला ॥

पत्री फुलांच्या गंधात 

दीप कापूर प्रकाशी 
माझे धुंदावते मन 
चित्त जडते रूपाशी ॥   

रोज वाद्यांची वर्दळ 

खणखणती आरती 
नाद समाधीत मग्न 
माझी इवलीशी भक्ती ॥

आता आताच होतास 

गेला मिळून जलात 
रिता पाहूनिया पाट
दुःख दाटते मनात ॥

जरी असशी मंदिरी 

भेट तिथेही घडते 
जाशी येऊनिया घरी 
नाते अनोखे जडते ॥

भाव बंधांतून तया

सख्य अरुपाशी होते 
दिव्य दुःखाच्या स्पर्शाने 
ज्योत आतली पेटते ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

धागे तुटले तटाट


धागे तुटले तटाट

काल जुळल्या नात्याचे
पिळ काळजात होते
धागे तुटले तटाट
मौन पापण्यात होते

काही घडला निरोप
कुणी समोर नव्हते
काही सुटले जपले
जरी आपुले नव्हते

घडो विरह जन्माचा
सारी जळूनियां ज्योत
गीत काळोखाचे मौन
जप खोलवर आत

जन्म जगण्याची व्यथा
कोण घेऊनिया येते
कळ लागता जराशी
सारे आकाश फुटते

सरे मनातील भय
परी उदास  कोपरे
साऱ्या चिणल्यात फटीं
नाही झोंबणार वारे

नाव गाव न कुणाचे
कधी ओठात येणार
सय वाफ ती थेंबाची
कुणा नाही कळणार

काही घडेल कथा ही
नव्या जन्माच्या पानात
गाठ बसली अंतरी
असो सोबत जन्मात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

दरवर्षी विसर्जनी



दरवर्षी ॥विसर्जनी

फटाके फुटती 
नगारे वाजती 
पैसे ते जळती 
जनतेचे ॥
कोणी काय केले 
कुठून ते आले 
प्रश्न हे असले 
पडू नये ॥
आहाहा सेट तो 
असेल लाखांचा 
हिशोब तयाचा 
कोण सांगे ॥
डीजेचा आवाज 
ठणाणा वाजतो 
डोके उठावतो 
सारी रात्र ॥
कशासाठी चाले 
व्यर्थ हा गोंधळ 
ज्ञानी गावंढळ 
मौन का रे ॥
न कळे बाजार 
कधी हा थांबेल 
भक्तीचा कळेल
अर्थ जना ॥
देवा श्री गणेशा 
मागणी तुजला 
आवर चालला 
प्रकार हा ॥
कानात किटला 
विक्रांत थकला 
कापूस कोंबला 
कानी मग ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...