सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

तूझिया वाचून




|| तूझिया वाचून ||
**************

आता मी माझ्यात
तूझिया वाचून
क्षणांची बांधून
मोट चाले ||

कोरडे नयन
कोरडे मन
कोरडे जगणं
उदासीन ||

आटला धावा
आटली तहान
तमी हरवून
संवेदना ||

मिटली पाकळी
सुटली अंजुळी
हरवून गेली
प्रार्थना ही ||

दाटला अंधार
मिटला हुंकार
प्राक्तना सादर
अधोमुख ||

मनाच्या खेळा
होवून आंधळा
फिरलो गरारा
वाटे आता ||

विक्रांत पेटली  
जाणीव विझली
काळोखी गिळली
कुणी कैसी  ||

डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

होत नाही





होत नाही

*******

मनीचे आस्वाद विषाद
मिटता मिटत नाही
म्हणून ज्योत निरंजनाची
दिसता दिसत नाही

ओल्या काडी प्रमाणे
येई एक एक विचार
पडतो आगीत पण
जळता जळत नाही

धूर धूर आणि धूर
व्यापून सारे अवकाश
निर्मळ क्षण प्राणात
भरता भरत नाही

दबते गुदमरते ठिणगी
जळता जळत नाही
पेटायची इच्छा आतील
शांत होता होत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

दिप लाव डोळियात




नवी विटी नवे राज
तोच खेळ चाले आज

येतो अन जातो श्वास
जगण्याचा गमे भास

वाहतेय पाणी फक्त
उभा राहे उगा तट

आणि किती रातदिस
सारे ठाव अंधारास

खोलवर खुळी आस  
जन्म जणू गळफास

जोखडाचा अर्थ काय
कळण्यात वय जाय

आता तरी बांध तोड
ओला कर तुझा माठ

जीवनाशी पैज घेत   
दिप लाव डोळियात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

चिंता


चिंतेचे चिंतन
*******

असे म्हणतात 
मनातल्या चिंतांचा गुंता 
कधीच सुटत नाही 
जेवढा तुम्ही सोडवायचा 
प्रयत्न कराल 
तेवढा अधिकच गुंतत जाई 

चिंतेचे जाळे 
नेहमी पकडू पाहते 
ओसाड तळ्यातील 
चकाकती मासोळी 
आपल्या नॉयलनी धाग्यात 
पण येते परत परत
गवत अन् पालकुट
घेऊन सोबत 

काळजी वाटणे 
किती साहजिक असते
प्रेमाच्या महा वस्त्राची 
जणू ती एक सुंदर किनार असते 
पण त्या काळजीची 
जेव्हा चिंता होते तेव्हा 
त्या वस्त्राची रयाच घालवते 

खरं तर चिंता करणे 
हे मनाचे एक 
नको तेउपद्व्यापी 
खेळणे असते
आकाशातील ढगात जणू
बागुलबुवा पाहणे असते

मनातील चिंतेचा गुंता 
न सोडविणे
हाच त्यापासून सुटण्याचा 
सर्वात सोपा मार्ग असतो 
कारण चिंतेचे चिंतन 
हेच चिंतेचं वाढवणें असते
अन आपण चिंता करतोय 
हे जाणवणे यातच 
चिंतेचे विरघळणे सुरू होते

चिंता देऊ शकत नाही संरक्षण 
चिंता बदलत नाही भवितव्य 
चिंता असते फक्त एक भणभण
कुस्करणारी आपले स्वर्गीय क्षण

पण या चिंतेच्या अलीकडील 
मी माझे हरवले तर 
ती चिंता जगताची होते 
अन् जगताची चिंता करणारा 
हा समर्थ होतो 
हेही तेवढेच खरे 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

जखम



जखम
****

माझे असणे
ही माझ्या अस्तित्वावर
असलेली
सर्वात मोठी जखम आहे
माझे काहीतरी असणे
माझे काही तरी करणे
माझे कुणीतरी असणे
माझे कुणीतरी होणे
हे घावांवर होणारे घाव आहेत
ही जखम मिटावी
ही व्यथा सुटावी
म्हणून केलेल्या
साऱ्या आटाअाटी
जखम भरायचे सोडून
विस्तारित करीत आहेत
पण ही जखम देणाऱ्या
त्या शस्त्राचे
त्या वस्तूंचे
त्या हाताचे
कारण काय कारक काय
या अनुत्तरित प्रश्नांच्या
वेदना लहरी
पुन्हा पुन्हा त्या जखमाकडे
चित्त घेऊन जात आहेत
ही जखम माझा अंत करेल
कि घेऊन जाईन मला
त्या महावैद्यांकडे याचे उत्तर
तर काळच देईल
पण तोवर या जखमाचे
अस्तित्व स्वीकारत अन् सांभाळत
जगणे क्रमप्राप्त आहे मला .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

तुझ्या कारणे



तुझ्या कारणे
*********

शब्द ओले
रुजून आले
रंग झाले
डोळ्यात

कानावरती
नाद नाचती
ऐकू येती
रंध्रात

नाच नाचतो
गीत रचतो
सूर गुंफतो
कैफात

मन दिवाने
गाय तराने
होत चांदणे
पाण्यात

इथले जगणे
स्वप्न साजणे
तुझ्या कारणे
घडे ग

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

अवधुती भागवत

अवधुती भागवत

जर सुटणारच असेल
हा देह
असाच अकाली कधीही
तरी काही हरकत नाही
कारण माझी श्रद्धा आहे
आत्म्याच्या अमरतेवर
अन पुनर्जन्मावर
या जन्मातील काहीही
पुढे स्मरणार नाही
जसे मागील आता
काहीच आठवत नाही
त्याचा स्वीकार आहे मला
नाव गाव नाती धन संपत्ती
यांचे तुटलेले पाश
नाही जुळू पाहणार मी पुन्हा
पण मला हवी आहे 
एक स्मृती
दत्तात्रेया
तुझ्या परमपवित्र चरणांची
अन ज्ञानदेवांच्या कृपेची
अंतरी अवधुती रंगलेला हा भागवत
तसाच राहू दे हीच प्रार्थना

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...