शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

जखम



जखम
****

माझे असणे
ही माझ्या अस्तित्वावर
असलेली
सर्वात मोठी जखम आहे
माझे काहीतरी असणे
माझे काही तरी करणे
माझे कुणीतरी असणे
माझे कुणीतरी होणे
हे घावांवर होणारे घाव आहेत
ही जखम मिटावी
ही व्यथा सुटावी
म्हणून केलेल्या
साऱ्या आटाअाटी
जखम भरायचे सोडून
विस्तारित करीत आहेत
पण ही जखम देणाऱ्या
त्या शस्त्राचे
त्या वस्तूंचे
त्या हाताचे
कारण काय कारक काय
या अनुत्तरित प्रश्नांच्या
वेदना लहरी
पुन्हा पुन्हा त्या जखमाकडे
चित्त घेऊन जात आहेत
ही जखम माझा अंत करेल
कि घेऊन जाईन मला
त्या महावैद्यांकडे याचे उत्तर
तर काळच देईल
पण तोवर या जखमाचे
अस्तित्व स्वीकारत अन् सांभाळत
जगणे क्रमप्राप्त आहे मला .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

तुझ्या कारणे



तुझ्या कारणे
*********

शब्द ओले
रुजून आले
रंग झाले
डोळ्यात

कानावरती
नाद नाचती
ऐकू येती
रंध्रात

नाच नाचतो
गीत रचतो
सूर गुंफतो
कैफात

मन दिवाने
गाय तराने
होत चांदणे
पाण्यात

इथले जगणे
स्वप्न साजणे
तुझ्या कारणे
घडे ग

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

अवधुती भागवत

अवधुती भागवत

जर सुटणारच असेल
हा देह
असाच अकाली कधीही
तरी काही हरकत नाही
कारण माझी श्रद्धा आहे
आत्म्याच्या अमरतेवर
अन पुनर्जन्मावर
या जन्मातील काहीही
पुढे स्मरणार नाही
जसे मागील आता
काहीच आठवत नाही
त्याचा स्वीकार आहे मला
नाव गाव नाती धन संपत्ती
यांचे तुटलेले पाश
नाही जुळू पाहणार मी पुन्हा
पण मला हवी आहे 
एक स्मृती
दत्तात्रेया
तुझ्या परमपवित्र चरणांची
अन ज्ञानदेवांच्या कृपेची
अंतरी अवधुती रंगलेला हा भागवत
तसाच राहू दे हीच प्रार्थना

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

श्रावण आल्यावर



श्रावण आल्यावर
******:***

श्रावण आल्यावर मी
पुन्हा शिवालयी जातो
पायरीवर त्या उगाच
उगा बसून राहतो

ती येणार नसतेच
बेल फुले वाहायला
तिरपा कटाक्ष धुंद
दैवी कुणास द्यायला

तीच घंटा खणाणते
नि गाभारा दणाणतो
बं बं भोले बंबं जय
टाळ्या नाद घुमतो

तेच चाक तेच चित्र
पट पुढे सरकतो
तसाच तयात मी ही
परी तोच तो नसतो

हसतो मग उठतो
येतो बाप्पास म्हणतो
वाहिल्या विना पडली
पत्री पथात पाहतो

विस्कटल्या त्या पानांना
सहज हातात घेतो
नि सांगतो प्रत्येकास
का कधी देव भेटतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २९ जुलै, २०१८

दुरावता



दुरावता 
*****

दुरावले स्मित तुझे 
नुर सारा हरवला 
उसनेच हासू अन् 
उसनाच शब्द झाला 

समजलो वादळ त्या 
हळुवार झुळकीला 
थरारले पान अन् 
वृक्ष पुन्हा शांत झाला 

गहिवरल्या रात्रीचा 
तो आवेग मंद झाला 
मुक्या उग्या आकाशाचा 
प्रवास पुढे चालला 

भेटू पुन्हा कधीतरी 
लेऊन नव्या नावाला 
पुरातन पिर्‍यामिडी 
शब्द काही उमटला 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २५ जुलै, २०१८

होवू नये कधीही



होवू नये कधीही
*********:
इंद्रधनुष्य पूल
*********:


अनपेक्षित अचानक ती भेटली त्याला
जणू आली होती आकाश रिते करायला

आयुष्याच्या मध्यावर सारे काही असून
सुख समृद्धी नाती आली असता फुलून

क्षणभर भांबावला तो खूपसा सुखावला तो
उधानल्या वाऱ्यागत स्वतःभोवती फिरला तो

त्या ओढीत नकळत बरेच वाहत गेल्यावर
का न कळे पण तिची झुकू लागली नजर

अरे मी हे करते काय म्हणू लागले अधर
अडखळू लागले पाय ते झालेले अनावर


त्या तिच्या शब्दांनी तो ही जागा झाला
सावरून स्वतःला जणू भानावर आला

अन येवू घातल्या वादळाला चुकवत
तो पुन्हा परतला आपल्या रिक्त घरात

आठवून ते सारे पुनःपुन्हा चकीत झाला 
जड झालेल्या शब्दांनी वदला नि स्वतःला

होवू नये कधीही ऊध्वस्त घर कुणाचे
कोसळून  पूल कुठल्या इंद्रधनुष्याचे

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*********
अनपेक्षित अचानक
ती भेटली त्याला
जणू आली होती
आकाश रिते करायला

आयुष्याच्या मध्यावर
सारे काही असून
सुख समृद्धी नाती
आली असता फुलून

क्षणभर भांबावला तो
खूपसा सुखावला तो
उधानलेल्या वाऱ्यात
स्वतःभोवती गरागराला तो
त्या ओढीत नकळत
बराच वाहत गेला तो

पण मग तिचे का न कळे
अडखळू लागले पाय
झुकू लागली नजर
अरे मी करते आहे काय
म्हणू लागले थरथरत अधर

त्या तिच्या शब्दांनी
तो ही जागा झाला
सावरून स्वतःला
जणू भानावर आला

अन येवू घातल्या
वादळाला चुकवत
पुन्हा परतला त्या
आपल्या रिक्त घरात

आठवून कधी ते सारे
वदतो स्वतःला
होवू नये कधीही
ऊध्वस्त घर कुणाचे
कोसळून  पूल
कुण्या  इंद्रधनुष्याचे

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २१ जुलै, २०१८

मन



मन

मन म्हणून रे काही
असे नसते मुळात
एक बुडाडा पाण्यात
येतो जातो रे क्षणात

मन विचाराचा कण
भले मोठे वाळवंट
नसे अंतपार त्यास
खेळ मांडला शून्यात

मन मारता न मरे
मन कोंडता न कोंडे
मन जिंकले म्हणती
ते तो खचित थापडे

मन शोधता शोधता
मन कासावीस होते
येते उसळून वर
नवे विश्व घडविते

मन चांगले वाईट
मन दयाळू कठोर
रंग काचेचेच सारे
आत प्रकाश अपार


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...