सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

तो



तो .

येताच ती जीवनात
हरवले त्याचे सारे
यम नियम ध्येय 
प्रतिष्ठा वगैरे

तिच्या डोळ्यांच्या 
निळ्या आकाशात
गेला तो हरवत
पाखरू होत

घन गर्द गूढ
कलापांच्या डोहात 
स्वतःला विसरत
बंदिस्त करत

तिच्या हळव्या स्पर्शात
त्यांची राकट काया
गेली विरघळत
दुधातील साखरेत

त्याला नव्हते भय
नव्हती फिकीर कसली
संयम अन् संस्काराची
घडी बांधून ठेवली 
 
स्वीकारत 
दुराचारी अनाचारी
पदव्यांची मिरास  
बहाल केले स्वतःला
कुण्या एका वादळास

तिच्या रूपात 
रंगात केसात
मिसळले रंग 
जणू क्षितिजात 

कवटाळले जिणे 
त्याने बेगुमानपणे
समाजाची चौकट 
हवी तशी वाकवत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

हव्यास


हव्यास
********


एका बाण रुतलेला
काळजात घुसलेला
आवळून प्राण पिसा
वेदनेत उसवला


ध्यास सुखाचा हा जुना
करी प्राणांचा पाचोळा
जन्म सोसत ठोकरा
करे कणकण गोळा


नसा आखडून साऱ्या
हात मागे हा येईना
शाप हव्यास युगांचा
दुःख जीवाचे सरेना


घेऊ पदरी निखारा
जीवा देण्यास उबारा
वेड्या बेभान ओढीचा
देह मनात भोवरा


गंध चाफ्याच्या श्वासात
उटी चंदनी देहात
भान निसटूनी चाले
खळखळत्या गाण्यात.


देह विक्रांत मनाचा
ठोक ठोकून बांधला
तटबंदीत कापुरी
वडवानळ कोंडला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अर्थ




हरवून जावा अर्थ
मज वाटते रे आता
कुहूरात नसण्याच्या
मी हरवावे सर्वथा ।।

ही ओडंबरीची माया
मज लागली छळाया
उसवून बुजगावणे
लागे मातीत मिळाया ।।

मी म्हणतो माझे मला
नाहीच अर्थ इथला
वाटेवरी सांडलेला
दानाच रुजून आला ।।

सरला ऋतू भराचा
मधू काळ तो जळाचा
वाचून ठरले काही
भार खाली सोडायचा  ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blobspot.in

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

गिरनार स्मृती



गिरनार स्मृती

माझे निवले अंतर
रूप पाहून सुंदर
दिव्य दिसता पावुले
डोळा सुखाचा पाझर ॥

फडफडती पताका
घोष जय गिरनार
मंत्र जागर मनात
ऊठे दत्त दिगंबर ॥

भाग्ये विनटलो थोर
धुनी पाहिली प्रखर
प्रभू दिव्य वैश्वानर
होये स्वयं दिगंबर ॥

थोर संतांच्या पाऊली
होय पुलकित माती
तया लावतो मी भाळी
पुण्ये फळुनिया येती ॥

वारा करीत झंकार
जणू  फिरे गरगर
नाथ गोरक्ष लाडका
भाव भक्तीचे शिखर

होय पुलकित काया
गळा हुंदका दाटला
मायबाप दत्तात्रेय
जीवे भावे ओवाळीला ॥

नच उरला विक्रांत
मुद्रा मनात नामाची
गिेरनारच्या पाषानी
एक गणना खड्याची ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

तर काही घडे




जे नव्हते ते गेले
तेव्हा हाती जे नुरले
कुणी तयास हरवले
म्हणावे का ।।

इया ग्रहणाचिया काला
चंद्र हरवून गेला
ऐशा दुःखाने व्यापला 
तो शहाणा काय ।।

धावे उदंड हे मन
जागा सोडल्यावाचून
जागा पाहता शोधून
मरे शोधणारा ।।

वृत्ती निवृत्तीच्या मागे
भान क्षणभर जागे
तया स्मृतीचे ते धागे
होय फास पुन्हा ।।

बोलू जातो ते सारे
आहे अज्ञानचे वारे
होई विक्रांत उगा रे
तर काही घडे।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

॥ श्री ज्ञानेश्वर माऊली ॥



‍ॐ नमो ज्ञानेश्वराय ।
दिव्य स्वयंप्रकाशाय।
महानंदस्वरुपाय।
चिद्घनमुर्ते॥

मी बालक तुझा नेणता ।
ना कळे मार्ग चालता।
धरुनिया तू हाता ।
ने ई गे माय॥

घोर या संसार वनी ।
पडलो मी येऊनी ।
कडेवर घेऊनी ।
नेई गे माये ॥

कर्म काही कळेना ।
स्वधर्म हाती येईना ।
अंधकार मिटेना ।
सांभाळ गे माय ॥

भक्तीची वाटा।
नेई मज आता ।
पांगुळ मी पडता ।
चालवी गे माये ॥

विक्रांत हा भ्रमाला।
मायेत या अडकला ।
तव प्रेमा आसावला।
धाव गे माये ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

तेव्हा दारात

तेव्हा दारात

तेव्हा तुझ्या दारात मी
असाच उभा नग्न होतो
लेवून साज सर्व सुखांचा
तसाच तेव्हा भग्न होतो

मोडून पाय गेले तरीही
चढलो सहस्त्र पायऱ्या
पाहशील तू कधी तरी
स्वप्नात फुका मग्न होतो

सरून तपे गेली किती
बदलून हि जगरहाटी
घेऊन हाती कटोरी मी
जणू की पाषाण होतो

म्हणती दयाघन ते तुज
येतो स्मरता क्षणात तू
म्हणतो निष्ठुर परि कुणी
अन उदास उद्विग्न होतो

बोलाविले भले तसे तू
दर्शनही जड दिले जरी
घडले ते खरेच का वा
पाहत ते एक स्वप्न होतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...