माझे निवले अंतर
रूप पाहून सुंदर
दिव्य दिसता पावुले
डोळा सुखाचा पाझर ॥
फडफडती पताका
घोष जय गिरनार
मंत्र जागर मनात
ऊठे दत्त दिगंबर ॥
भाग्ये विनटलो थोर
धुनी पाहिली प्रखर
प्रभू दिव्य वैश्वानर
होये स्वयं दिगंबर ॥
थोर संतांच्या पाऊली
होय पुलकित माती
तया लावतो मी भाळी
पुण्ये फळुनिया येती ॥
वारा करीत झंकार
जणू फिरे गरगर
नाथ गोरक्ष लाडका
भाव भक्तीचे शिखर
होय पुलकित काया
गळा हुंदका दाटला
मायबाप दत्तात्रेय
जीवे भावे ओवाळीला ॥
नच उरला विक्रांत
मुद्रा मनात नामाची
गिेरनारच्या पाषानी
एक गणना खड्याची ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा