शनिवार, २४ जून, २०१७

पथ (पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |)




पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |
कां नाहीं जेवीं तरुवरा | येणें जाणें ॥ ४९० ॥

चालतो पथिक परी नच पथ
वाट पावुलात वचेचिना ||

दिसतात वृक्ष चालले मागुती
परी त्या गती नाही जैसी ||

तैसा देवा ठेव मजला तटस्थ
येवोत जावोत सुख दु:खे ||

स्थैर्याची सखोल मुळे खोलवर
जावून जिव्हार स्तब्ध व्हावे ||

ज्ञानदेवी माय आन न मागणे 
शब्दांचे जगणे तुझ्या व्हावे ||

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २३ जून, २०१७

ध्रुव (भ्रमणचक्रीं न भंवे | ध्रुव जैसा ॥)




ध्रुव  (भ्रमणचक्रीं न भंवे | ध्रुव जैसा ॥)

फिरतेय चक्र नभी गरगर
ध्रुव असे स्थिर त्यात एक ||

मनाचे विकार अनंत विचार
दृष्ट्त्वा विसर पडू नको ||

पाहतोय कोण येवो त्याचे भान
राहो स्थिरावून जाणीव ती ||

विक्रांत क्षणिक पाहे मुग्धावून  
राहो वेटाळून रात्रंदीन ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २२ जून, २०१७

मनपवन (जातया अभ्रासवें | जैसें आकाश न धांवे |)


  

मनपवन  (जातया अभ्रासवें | जैसें आकाश न धांवे |)
**********



दाटले आभाळ अभ्राचा प्रवास
परी ते आकाश गतिहीन ||

ऐसे माझे मन करी दयाघन
धाव थांबवून पवनाची ||

अंतरी अथांग ह्रदय आकाश
पवनाचा ऱ्हास होवो तिथे ||

धरिला हव्यास पुरा करी देवा
विक्रांता या ठेवा हाच द्यावा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १९ जून, २०१७

देवा तुझा खेळ..




तुझा खेळ..
*********

तुझी चाल तुझा डाव
मला कधीच कळत नाही
मी खेळतो आहे अन
तू हरवतो आहेस   
कफल्लक न करता मला
दोन डाव जिंकू देतोस
चार डाव हरवतोस
सुखाची चटक लागलेला मी
पुन:पुन्हा खेळतोय
पुनःपुन्हा हरतोय

माझ्या नकळत
तू लुटत असतोस
माझी सर्वात मूल्यवान वस्तू
माझा वेळ
क्षण क्षणांनी रिकामी होणारी
माझी तिजोरी
पुन्हा कधी न भरणारी
तू पाहत असतोस गालात हसून
कदाचित छदमीपणे
कदाचित कीव करून

तुला कुणी तरी खेळायला
हवाच असते का सदा ?
अन या खेळाचा अंत
नव्या खेळात होतो का ?
माझ्या हरलेल्या क्षणांचे
तू काय करतोस ?
या कोट्यावधी खेळाडूंशी  
तू एकटा कसा खेळतोस ?

या अन अश्या असंख्य प्रश्नांचे
मोहळ उठू लागतच
तू जिंकू देतोस मला
पुन्हा एक मोहक डाव
अन त्या सुखाच्या इवल्या राशीत
रममाण होतो माझा जीव !!

तरीही निद्रेतून जागे होतांना
क्वचित भेटणाऱ्या त्या
अस्पर्श अव्यक्त क्षणाच्या
फटीतून तू दिसतोस मला
अन असे वाटते
हा खेळ तुच आहे
खेळणे तुच आहे
आणि मी ही तूच आहे !
पण दुसऱ्याच क्षणी होतो सुरु
तोच तुझा खेळ आणि माझे हरणे .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे













                                                                                                                                                 

गुरुवार, १५ जून, २०१७

घर माक्याचे..




येई प्रकाश दारात
उब घेवून कोवळ
उन सोनेरी केशरी
दिसे वेल्हाळ बाभूळ

थवे इवल्या पक्ष्यांचे
कलकलती फांद्यात
धूळ होवूनिया जागी
खेळू लागते खुरात

गार अजून पाषाण
ओट्या निजे बिलगून
खुळखुळते घुंगूर
संथ लयी जडावून

निळे आकाश मोकळे
मनी येई उमलून
वारा नितळ तरल
दूर ओल्या शेतातून

चूल पेटता कोन्यात
काड्या वाजती तडाड
नाद काकणाचा मंद
घुमू लागतो कानात

घर माक्याचे मातीचे
अर्धे उघड्या छताचे
चित्र उमटे मनात
जणू सारेच कालचे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



रविवार, ११ जून, २०१७

|| दत्त पाऊलांची याद ||






जीव अडतो रडतो
खाचखळगी पडतो
जीव हसतो खेळतो
त्याच डावात रंगतो

गेला मावळून दिन
भय आलेले दाटून
गंध येताच सुग्रास
सारे जातो विसरून

लाटा सुगंधी येतात
मन मोहुनी नेतात
सारे भासच तरीही
रंग लाख दिसतात

खाचा करुनी डोळ्यांच्या
शिसे ओतून कानात
वाजे पैंजण मनात
स्वप्न गिरक्या घेतात

जीवा सुटेना हा छंद
श्वास येवूनी संपत
दत्त पाऊलांची याद
कुठे हरवली आत

तोच विक्रांत अजुनी
होम करी या देहाचा
तोच आकांत हृदयी  
खेळ संपव मनाचा


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, १० जून, २०१७

करपला चंद्र माझा




करपला चंद्र माझा मी  
नुकताच उलथला आहे
तो गढूळ प्रकाश कालचा
विस्मृतीत गेला आहे

येतील लाटा जातील लाटा
वेळ कुणा मोजायला आहे
मी लाटांना झेलून देही  
सागर माझा केला आहे

चालू दे नाटक जगाचे
कोण कुठे रंगला आहे
आता पाहण्याचा डोळा  
रे माझा उघडला आहे

बाहेर असो मिट्ट काळोख
मी प्रकाश पहिला आहे
वाटा घनदाट निबिड जरी
दिवा आत लागला आहे  


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...